बचत, कर्जमुक्ती, गुंतवणूक व संरक्षण या चार खांबांवर येत्या वर्षभरात उज्ज्वल आर्थिक भवितव्याची इमारत उभारण्यासाठी आवश्यक ती दशसूत्री..
१ तुमचा मासिक खर्च समजून घ्या
बचत म्हणजे जमा वजा खर्च. उत्पन्नातून खर्च वजा केल्यावर हाती उरते त्यालाच बचत म्हणतात. पण बऱ्याच लोकांची तक्रार की, महिनाअखेरीस हाती काहीच उरत नाही. पण असे का होते याचे उत्तर त्यांच्याजवळ नसते. त्यासाठीच आपण आपले खर्च तपशीलवार लिहून काढले पाहिजेत. उत्पन्न लगेच वाढणे केवळ अशक्य आहे पण खर्च कमी करणे शक्य आहे. त्यामुळे खर्चावर लक्ष केंद्रीत करा. बऱ्याचदा महिन्याचा खर्च लिहिल्यास आपण महिना ५,००० रूपये हॉटेलात खाण्यात खर्च करतो किंवा रिक्षाने फिरताना आपले दरमहा १५०० रूपये संपतात हे व असे अनेक वायफळ खर्चाचे साक्षात्कार होतात.
२ बजेट बनवा
एकदा मासिक खर्चाचे तपशील समजले की, अंदाजपत्रक बनविणे सोपे जाते. आपल्या सवयी एका दिवसात बदलत नाहीत. त्यामुळे एका दिवसात चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवू नका. गेल्या महिन्यात हॉटेलिंगवर ५,००० रूपये खर्च केले असतील तर या महिन्यात अजिबात हॉटेलिंग करणार नाही असे ठरवू नका. असे होणे अशक्यप्राय असते. निदान त्यावरील खर्च १०-१५% कमी झाला तरी आनंद मानावा. हळूहळू असे खर्च आटोक्यात येतात. एकदा बजेटला चिकटून रहाण्याची सवय लागली की बचत वाढू लागते.
३ बचतीला का माला लावा!
काही वेळा चांगली बचत करणारी मंडळीदेखील तितक्याशा चांगल्या आर्थिक स्थितीत नसतात. याचे कारण म्हणजे त्यांचा पसा त्यांच्यासाठी योग्य मेहनत घेत नाही. योग्य गुंतवणूक सापडेपर्यंत किंवा कुणीतरी यांना धक्का देऊन यांच्या गळी एखादी योजना उतरवेपर्यंत या मंडळींचा पसा बँकेच्या बचत खात्यात अक्षरश: पडून असतो. हे योग्य नाही. एका ठराविक रक्कमेपेक्षा अधिक रक्कम जमल्यास त्यावर मुदतठेवीप्रमाणे व्याज देणारी बँक बचत खाती आज उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ घ्या. उच्च उत्पन्न गटात असाल तर हे पसे बचत खात्यात न ठेवता लिक्विड फंडात ठेवा. यामुळे बचत रकमेवर देखील चांगले करोत्तर उत्पन्न मिळेल.
४ कर्जाचे हप्ते वेळेवर भरा
कर्जमुक्तीचा पहिला टप्पा आहे – सध्या असलेली कर्जे वेळेवर फेडणे. हप्ते चुकवू नका. विशेषत: क्रेडिट कार्डाची बाकी रक्कम विहित तारखेच्या आधीच भरा. उशिरा पसे भरल्यास तुम्हाला दंड होतोच पण तुमचा क्रेडिट स्कोअरदेखील खाली येतो. कर्जाचे हप्तेदेखील वेळेत भरून व शक्य तेव्हा कर्जाचा मुदतपूर्व भरणा करावा. त्यामुळे लवकर कर्जमुक्ती शक्य होते. विशेषत: गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा कर्जाचा व्याजदर जास्त असेल तर कर्ज फेडायला प्राधान्य द्यावे. उदाहरणार्थ ८% व्याजाने पसे मुदत ठेवीत ठेवण्यापेक्षा १४% व्याजाचे कर्ज फेडावे. वेळेवर कर्जफेड केल्यास क्रेडिट स्कोअर लक्षणीय सुधारतो तो वेगळाच.
५ योग्य कर्जाची निवड करा
एका बाजूला कर्जमुक्ती म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला योग्य कर्जाची निवड करा असे म्हणणे दुटप्पीपणाचे वाटेल. पण जीवनात कर्ज नाकारणे नेहमीच शक्य होते असे नाही.अशा वेळी योग्य कर्जाची निवड करावी. क्रेडिट कार्डावर उधार खरेदी करणे टाळावे. पण काही वेळा पसे चुकते करण्यासाठी, विशेषत: मोठ्या मॉलमध्ये, बिले भरताना किंवा ऑनलाईन व्यवहार करताना, क्रेडिट कार्डाचा वापर सोय म्हणून करावासा वाटतो. अशा वेळी ठराविक रक्कम परत देणाऱ्या (कॅश बॅक) क्रेडिट कार्डाचा वापर करावा. अशी कार्डे साधारणत: वीज, फोन बिलात ५% पर्यंत सूट मिळवून देऊ शकतात.
६ क्रेडिट रिपोर्ट
सिबिल कडून तुमचा क्रेडिट रिपोर्ट मागवा. हा रिपोर्ट ऑनलाईन पसे भरून मागविता येतो. यामुळे तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर कळेल. बँका कर्ज देण्याचे निर्णय क्रेडिट स्कोअर पाहूनच घेतात. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. तुम्हाला वाटेल की कर्जमुक्तीचे ध्येय ठेवा म्हणताना आता कर्ज घेताना बघायचा क्रेडिट रिपोर्ट कशाला बघायला सांगत आहेत. कर्जमुक्ती म्हणजे कर्जाच्या विळख्यातून सुटका. पण तुम्हाला घर खरेदी किंवा वैद्यकीय गरजेकरिता किंवा घरातील मुलांच्या शिक्षणाकरिता कर्जाची गरज पडू शकते. अशा प्रसंगी चांगला क्रेडिट रिपोर्ट फारच आवश्यक ठरतो.
७ लवकर निघा, सावकाश जा
घाटात असा बोर्ड नेहमीच दिसतो. गुंतवणुकीच्या विश्वात हा नियम लागू पडतो. आयुष्यात जितक्या लवकर गुंतवणुका सुरूकराल तितके बरे. त्यात सातत्य असेल तर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने सहज मार्गक्रमणा कराल.
८ योग्य गुंतवणूक
बरीच मंडळी सध्या कोणती गुंतवणूक फॉर्मात आहे ते विचारतात. जास्त व्याज – जास्त उत्पन्न कमवायला वाटेल तिथे पसे गुंतवायला कमी करत नाहीत. जास्त जोखीम घेताना अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे आपण किती जोखीम घेऊ शकतो, आपल्याला किती पसे हवे आहेत, त्याच प्रमाणे आपल्या समोर कोणते पर्याय आहेत याची योग्य माहिती घ्या. त्यामुळे तुमचे गुंतवणूक निर्णय अधिक अचूक ठरतील.
९ आणीबाणीची बेगमी
आयुष्यात संकटे काही सांगून येत नाहीत. त्यांचा सामना करायला आपण तयार असणे आवश्यक आहे. जीवनात आíथक बाजू भक्कम करण्यासाठी आपण एक आकस्मिक निधी उभा केला पाहिजे. साधारणत: आपल्या कुटुंबाची सहा महिने काळजी घेत येईल इतकी रक्कम या निधीत ठेवायचे ध्येय ठेवावे. हा निधी दोन ते तीन वर्षांत तयार करावा व तो अल्प मुदतीच्या मुदत ठेवीत किंवा अल्प मुदतीच्या बॉण्ड फंडात ठेवावा.
१० विमा
आयुर्विमा आणि गुंतवणूक यांची गल्लत करू नका. यावर्षी एक प्युअर टर्म आयुर्विमा व अपघात विमा जरूर घ्या. तुमची विम्याची गरज किती आहे ते ठरविण्यासाठी अनेक वेबसाइट आज उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ घ्या. संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विमा घ्यायला विसरू नका.