एसबीआय लाईफ फ्लेक्झी स्मार्ट अॅश्युरन्स प्लॅन
योजनेच्या जाहिरातीमध्ये एक सुटाबुटातला मध्यम वयाचा माणूस दोन्ही हात आपल्या बाजूला पसरुन, जग आवाक्यात घ्यायच्या अविर्भावात, बिनधास्त उभा राहिलेला दाखविला आहे. आणि ब्रीद वाक्य ठळकपणे येते- ‘नो पेन, ओन्ली गेन’. तथापि योजना घेणाऱ्या विमेदारांनी विम्याची २० वष्रे पूर्ण झाल्यावर त्याची ‘नो गेन, ओन्ली पेन’ अशी अवस्था होऊ नये, हीच सदिच्छा.
भारतातील अग्रगण्य भारतीय स्टेट बँक आणि ‘ब्लूमबर्ग’च्या निकषांनुसार २०१२ मधील जगातील तिसऱ्या क्रमांकाची, फ्रान्समधील बीएनपी परिबा बँक यांच्या सहयोगाने २००१ मध्ये स्थापन झालेल्या एसबीआय लाईफ या विमा कंपनीची ‘इन्श्युरन्स कम सेव्हिंग’ या प्रकारातील ही विमा योजना आहे.
ठळक वैशिष्टय़े
१. विमा छत्राबरोबरच संपूर्ण योजनेच्या कालावधीमध्ये २.५ परताव्याची हमी दिली जाते.
२. दर वर्षांच्या सुरुवातीला अंतरिम व्याजदरही जाहिर केला जातो आणि तो त्या-त्या वर्षांपुरता मर्यादित असतो.
३. वर्षांच्या अखेरिस (३१ मार्च) अतिरिक्त व्याजदरही जाहीर केला जातो.
४. विमा छत्र वाढविणे किंवा कमी करणे याचीही तरतूद आहे.
५. गुंतवणुकीची रक्कम वाढविण्याची सोय आहे.
६. वार्षकि हप्त्याच्या १० पट किंवा २० पट विमाछत्र मिळते.
७. विम्याची मुदत १० ते २० वर्षे आहे.
८. विम्याचा हप्ता भरावयाचा कालावधी योजनेच्या कालावधी इतकाच असतो.
९. विमाधारकाचा योजना कालावधीत मृत्यु झाला तर नामनिर्देषकाला विमाछत्राची रक्कम आणि त्याच्या खात्यामधील जमा रक्कम मिळते.
१०. विमाधारक पूर्ण योजना कालावधीत हयात राहिल्यास खात्यात जमा असलेली लागू रक्कम प्राप्त होते.
उदाहरण :
विमाधारकाचे वय : ३० वष्रे
विम्याचा कालावधी : २० वर्षे
हप्ता भरण्याचा कालावधी : २० वष्रे
विम्याची रक्कम : २ लाख रुपये
वार्षकि हप्ता : २०,००० रुपये
विम्याचे लाभ :
१. विम्याच्या २० वर्षांच्या मुदतीत विमाधारकाचा मृत्यु झाला तर त्याच्या नामनिर्देशकाला विमाछत्राचे २ लाख आणि वेगवेगळया प्रकारच्या वार्षकि व्याजानुसार त्याच्या खात्यामधील जमा रक्कम मिळणार.
२. विमाधारक जर योजना कालावधीत हयात राहिला तर त्याला विमाछत्रा व्यतिरिक्त वार्षकि २.५%व्याज. तसेच आणखी किती रक्कम प्राप्त होणार याची हमी नाही. संकेतस्थळावरून ८.२३ लाख रुपये (६% प्रमाणे) किंवा १२.०७ लाख रुपये (१०% प्रमाणे) प्राप्त होणार, असे दर्शविते.
विश्लेषण :
ही योजना ‘नॉन पार्टीसिपेटिंग’ प्रकारामधील पारंपरिक विमा योजना आहे. त्यामुळे १०% परताव्याची अपेक्षा ठेवणे विसरलेलेच बरे. कंपनीने २.५% टक्के परताव्याची हमी दिलेली आहे. त्या हमीच्या साधारणपणे दुप्पट म्हणजे ५% परतावा मिळाला तर एकूण रक्कम होते ६.९४ लाख रुपये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या कालावधीत २ लाख रुपयांचे विमाछत्र ही खरोखरच हास्यास्पद बाब आहे. ती इतकी क्षुल्लक रक्कम आहे की त्यापेक्षा हप्त्याच्या रकमेची योग्यप्रकारे गुंतवणुक केली तर किती जास्त प्रमाणात गंगाजळी तयार करता येईल.
एसबीआय लाईफ या कंपनीचा ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ (२०१०-११) ८२.२४% आहे. भारतातील विमा कंपन्यांच्या क्रमवारीत या कंपनीचा क्रमांक ११ वा आहे.
या बाबतीत पहिल्या दोन क्रमांकाच्या कंपन्यांच्या ३० वर्षीय व्यक्तीने १५ लाख रुपयांच्या (७.५ पट विमाछत्र) प्युअर टर्म विमा योजना घेतल्या तर काय होऊ शकते, त्याचा आढावा घेऊया.
कंपनी १ : ‘क्लेम सेटलमेंट रेशो : ९७.१%
वार्षकि हप्ता ४,८४१ रुपये
‘एसबीआय लाईफ फ्लेक्झी स्मार्ट’च्या तुलनेत बचत १५,१५९ रुपये (रु. २०,०००-४,८४१) समजा १५,१६० रुपये ही रक्कम गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायामध्ये गुंतविली. (ज्यामध्ये प्राप्तीकरात सूट आहे आणि परतावा करमुक्त आहे) तर २० वर्षांनी ८,२५,१३३ रुपयांची खात्रीलायक गंगाजळी तयार होते.
कंपनी २ :
वार्षकि हप्ता : ३,४४७ रुपये
बचत : १६,५५३ रुपये (रु. २०,०००-३,४४७)
ही रक्कम दरवर्षी वरील सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतविली तर २० वर्षांनी ९ लाख रुपयांपेक्षा अधिक गंगाजळी तयार होते.
एसबीआय लाईफ फ्लेक्झी स्मार्ट अॅश्युरन्स विमा योजनेच्या एका जाहिरातीमध्ये एक सुटाबुटातला मध्यम वयाचा माणूस दोन्ही हात आपल्या बाजूला पसरुन (जग आवाक्यात घ्यायच्या अविर्भावात) बिनधास्त उभा राहिलेला दाखविला आहे. आणि ब्रीद वाक्य आहे ‘नो पेन, ओन्ली गेन’ देव करो आणि विम्याची २० वष्रे पूर्ण झाल्यावर त्याची ‘नो गेन, ओन्ली पेन’ अशी अवस्था होऊ नये, ही सदिच्छा.
(सदर लेखाचा उद्देश समीक्षात्मक आहे. योजनेसंबंधी माहिती कंपनीच्या संकेतस्थळावरून घेतली आहे.)
तुलनात्मक कोष्टक : (गुंतवणुकीची वार्षकि रक्कम रु. २०,०००)
विवरण एसबीआय कंपनी क्रमांक १ कंपनी क्रमांक २
विमा छत्र २ लाख रु. १५ लाख रु. १५ लाख रु.
मृत्यु २ लाख रु.+ जमा रक्कम १५ लाख रु. १५ लाख रु.
मॅच्युरिटी २ लाख रु.+ जमा रक्कम ८.२५ लाख रु. ९.०२ लाख रु.
‘क्लेम सेंटलमेंट रेशो’ विमा कंपन्यांची सेवा गुणवत्ता दर्शवितो. ‘एसबीआय लाईफ’बाबत हा रेशो (२०१०-११) ८२.२४% आहे. भारतातील विमा कंपन्यांच्या क्रमवारीत या कंपनीचा क्रमांक ११ वा आहे.