एलआयसी या सर्वात बलाढय़ विमा कंपनीची पांरपारिक पॉलिसींमधील एन्डाऊमेंन्ट प्रकारामध्ये मोडणारी ही पॉलिसी. नऊ वर्षांपूर्वी; २००४ च्या पूर्वार्धात, बाजारामध्ये आलेली ही पॉलिसी आज लोकप्रियतेच्या बाबतीत अतिशय वरच्या स्थानावर आहे..
‘जीवन सरल’ची ठळक वैशिष्टये :
१.    विमा इच्छुकाला फक्त प्रीमियमच्या रकमेची निवड करायची असते, आणि त्यावर विमाछत्राची रक्कम अवलंबून असते.
२.    प्रीमियमचा भरणा करण्यासाठी मासिक, त्रमासिक, षण्मासिक किंवा वार्षकि यापकी कोणताही पर्याय निवडता येतो, आणि तो पूर्ण टर्मसाठी भरायचा असतो.
३.    ही नफ्यासकटची पॉलिसी असल्याने विमाधारकाला कंपनीच्या नफ्यामध्ये सहभागी केलेले असते.
पॉलिसीचे लाभ
१.    मासिक प्रीमियमच्या २५० पट विमाछत्र.
२.    पॉलिसीच्या मॅच्युरिटीला विमाधारकाला विमाछत्राची रक्कम आणि त्याचबरोबर त्याने त्या पॉलिसीवर दाखविलेल्या निष्ठेपोटी लॉयल्टी म्हणून काही रक्कम देणार.
३.    प्रत्याभूत समर्पण रक्कम (वॉरेंटेड सरेंडर व्हॅल्यू) – कमीत कमी तीन वर्षांच्या प्रीमियमची रक्कम भरलेली असेल तर पॉलिसी कंपनीला परत देण्याची सोय आहे. अशा परिस्थीतीत विमाधारकाला त्याने भरलेल्या एकूण प्रीमियमपकी पहिल्या वर्षांचे प्रीमियम वजा करून बाकी राहिलेल्या रकमेच्या ३०% रक्कम कंपनी त्याला परत देणार.
४.    विशेष समर्पण रक्कम (स्पेशल सरेंडर व्हॅल्यू) – विमाधारकाने तीन वष्रे प्रीमियम भरलेले असेल तर त्याला समानुपाती (Proportionate) विमाछत्राच्या ८०% रक्कम प्राप्त होणार. चार वर्षांनंतर ९०% आणि पाच वष्रे किंवा त्यापेक्षा जास्त काळ प्रीमियमचा भरणा केलेल्या व्यक्तीला १००% इतकी रक्कम देणार.
५.    पॉलिसीच्या पहिल्या 9 वर्षांमध्ये विमाधारकाचा मृत्यु झाला तर त्याच्या नामनिर्देशकाला विम्याची रक्कम आणि त्याने जमा केलेले प्रीमियम इतकी रक्कम प्राप्त होणार. १० वर्षांनंरच्या मृत्यूच्या संभावनेमध्ये वरील रकमेमध्ये ज्याची हमी नाही अशी लॉयल्टीची रक्कम जमा होणार.
चिंतन
या पॉलिसीबाबत वेबस्थळांवरून आणि प्रत्यक्ष पॉलिसीधारकांकडून माहिती गोळा करताना त्याबाबत काही स्पष्ट चित्र उभे राहण्यापेक्षा, गोंधळ हा प्रकार जास्त अनुभवास आला. पारंपारिक प्रकारच्या पॉलिसींमध्ये सर्वसाधारणपणे प्रीमियमची रक्कम ही विमा इच्छुकाच्या वयावर (आणि शारिरिक स्वास्थ्यावर) अवलंबून असते. २५ वर्षांच्या व्यक्तीने ३० वर्षांच्या टर्मची १५ लाख रुपयांच्या विमाछत्राची एखादी पॉलिसी घेतली तर तिला जितके प्रीमियम लागू पडते, त्यापेक्षा ३० वर्षांच्या व्यक्तीला त्याच निकषासाठी जास्त प्रीमियम द्यावे लागते. या पॉलिसीमध्ये मात्र या दोन्ही व्यक्तींना सारखेच म्हणजे मासिक ६०००/- रु. प्रीमियम द्यावे लागते. वार्षकि प्रीमियमची रक्कम ७२,००० रु. याच कंपनीची दुसरी एक लोकप्रिय पॉलिसी आहे. ‘जिंदगी के साथ भी मिलेगा और जिंदगीके बाद भी’, अशी त्याची जाहिरात केली जाते. त्यामध्ये वरील दोन्ही व्यक्तींना त्याच निकषांसाठी पडणारे वार्षकि प्रीमियम आहे, ४७,२७०रु. आणि ४९,२३४ रु. ४५ वर्षांच्या व्यक्तीसाठी लागू पडणारे प्रीमियम आहे ५९,७०७ रुपये. याचा अर्थ जीवन सरल ही पॉलिसी विमा छत्रापेक्षा गुंतवणुकीचा पर्याय या दृष्टीकोनातून बनविलेली असावी असे समजण्यास हरकत नसावी.
आता या पॉलिसीपासून मिळणाऱ्या आर्थिक लाभांचा विचार करूया. कंपनीच्या वेबस्थळावरील माहितीनुसार पॉलिसीच्या १० व्या वर्षांपासून वार्षकि लाभ ६% ते १०% या कक्षेमध्ये असणार. या कोष्टकाखाली एक लहानशी टीप दिलेली आहे. हे लाभ गृहीत धरलेले आहेत. कंपनी त्याची हमी देत नाही.
ही पॉलिसी निवडण्याचे कारण काय? अशी या पॉलिसीच्या विमाधारकांकडे चौकशी केली असता एक नवीनच प्रकार उघडकीस आला. या पॉलिसीपासून मिळणाऱ्या आर्थिक लाभांबाबत विवरण करताना प्रत्येक पॉलिसीधारकाला त्याच्या विक्रत्याने एक झेरॉक्स केलेले कोष्टक दाखविलेले आहे. त्यामध्ये कंपनीचा लोगो आहे. त्यापुढे पॉलिसीचे नाव (जीवन सरल) आहे आणि त्यानंतर लिहिले आहे-PLAN. त्याखाली एक कोष्टक आहे. आडवे रकाने २५०; ४००; ५००;…. ५०००; ६००० वगरे मासिक प्रीमियमचे आकडे दर्शवितात. उभ्या रकान्यांमध्ये पहिल्या वर्षांपासून ते ३५ व्या वर्षांपर्यात विमाधारकाच्या खात्यात किती रक्कम जमा होते त्याची आकडेवारी दाखविलेली आहे. उदाहरणार्थ जो पॉलिसी धारक महिना ६,००० रु.चे प्रीमियम भरतो (विमाछत्र २५० पट म्हणजे १५ लाख रु.), त्याच्या खात्यामध्ये १० व्या वर्षी १२,७७,४२४ रु. जमा होतात, २० व्या वर्षी ४८,०८,८८०रु.जमा होतात. आणि ३५व्या वर्षी २,२०,२६,६१०/- ही रक्कम त्याला मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून दिली जाते. या कोष्टकाखाली छोटया अक्षरांमध्ये एक टीप दिलेली आहे- ‘‘रकमेबाबत दसादशे १०% परताव्याचा दर गृहीत धरून हिशेब केलेला आहे.’’ सर्वसाधारण ग्राहक ही टीप वाचायचे कष्ट घेत नाहीत, आणि कोणत्या पारंपारिक विमा पॉलिसीने १० टक्क्यांचा परतावा दिला आहे, हे पडताळून पाहण्याची त्यांना गरज वाटत नाही. कारण विक्रेता त्यांच्या विश्वासातला असतो. विमाधारक फक्त कोष्टकामधील आकडेवारी पाहतो आणि पॉलिसी घेतो. पॉलिसीच्या लोकप्रियतेची मेख बहुधा या कोष्टकामध्ये आहे.
आता या १०% परताव्याच्या शक्यतेबाबत विचार करू या. विमाधारकाने जमा केलेल्या प्रीमियममधून विक्रत्यांचे कमिशन आणि मॉरटॅलिटी चार्जेस वगरे अनेक खर्च वजा जाता जी रक्कम बाकी राहते त्यापकी कमीतकमी ५०% रक्कम सरकारी रोख्यांमधे गुंतवावी लागते आणि बाकी रक्कम सरकारने प्रमाणित केलेल्या कर्ज रोख्यांमधेच गुंतविली जाते (आयआरडीएच्या नियमांनुसार). अशा परिस्थतीत प्रिमियमच्या रकमेवर १०% परतावा कंपनी कसा काय देऊ शकतो हे विक्रेताच जाणे.
आज पॉलिसीला नऊ वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि कंपनीच्या वेबस्थळावरील माहितीनुसार १० वर्षांच्या काळासाठी २ % लॉयल्टी अ‍ॅडिशन घोषित करण्यात आलेली आहे. या पॉलीसीधारकांना भविष्यात काय मिळणार आहे; त्याबद्दल कंपनीतर्फे कोणतेही संकेत नसताना विक्रेते मनमानी परताव्याचे आमिष दाखवून ही पॉलिसी विकतात; ही अतिशय गंभीर बाब आहे.
प्रत्यक्षात कंपनीच्या पाच लाख रु.च्या विमाछत्राच्या ३५ वर्षांच्या टर्मच्या पॉलिसीच्या कागदपत्रांवर मॅच्युरिटी सम अ‍ॅशुअर्ड या मथळयाखाली नमूद केलेली रक्कम आहे- १०,०३,१६० रुपये. विमाधारकाच्या ‘डी.ए.बी.’ या लाभासकट वार्षकि प्रिमियमची रक्कम आहे २४,०२० रुपये. ही रक्कम विचारात घेऊन त्या पॉलिसीमध्ये दर्शविलेल्या १०,०३,१६० रु. या मॅच्युरिटी सम अशुअर्डच्या दुप्पट; म्हणजे २०,०६,३२० रु. इतकी रक्कम जरी कंपनीने त्याला देऊ केली तरी परताव्याचा दर होतो दसादशे ४.४१%
या पॉलिसीमधील विमाधारकाचे वय आहे ३० वर्षे. त्याने जीवन सरल या पॉलिसीऐवजी त्याच कंपनीची १० लाख रु. विमा छत्राची (दुप्पट) २५ वर्षांच्या टर्मची (कमाल टर्म) प्युअर टर्म पॉलिसी घेतली असती तर वार्षकि प्रिमियमची रक्कम होते ३,८२१ रुपये. २५ वर्षांमधील एकूण प्रीमियमची रक्कम होते ९५५२५ रुपये. ‘जीवन सरल’मधील एकूण प्रीमियमची रक्कम होते ८,४०,७०० रुपये (२४,०२० गुणिले ३५). बचत ७,४५,१७५ रुपये. ही रक्कम वार्षकि २१,२९० रुपयांप्रमाणे गुंतवणुकीच्या सेफ पर्यायामध्ये (आयकर लाभासकट) ३५ वष्रे गुंतविली तर विमाधारकाला ३५ वर्षांनी ४७,७५,६४८ रु. इतकी आयकरमुक्त रक्कम प्राप्त होते.
त्या विमाधारकाने जर इतर कंपन्यांची १० लाख रुपयांची २५ वर्षांची ऑनलाईन प्युअर टर्म पॉलिसी घेतली आणि प्रीमियमच्या बचतीची रक्कम दरवर्षी, वरील सेफ पर्यायामध्ये गुंतविली तर ३५ व्या वर्षी त्याच्याजवळ सुमारे ४९,१०,२३७ रु. इतकी आयकमुक्त गंगाजळी तयार होते.
(सदर लेखामधील माहिती कंपन्यांच्या वेबस्थळांवरुन घेतली आहे आणि उद्देश पूर्णत: समीक्षात्मक आहे.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा