सोन्याच्या आकर्षणाबाबत तर आपली ख्याती आहेच. परंतु गेल्या पाच सहा वर्षांपासून सोने खरेदीबाबत लोकांचा दृष्टीकोनही बदलत चालला आहे. बरेचजण दागिन्यांच्या पलिकडे जाऊन गुंतवणूक म्हणून सोन्याचा विचार करायला लागलेले आहेत. त्यासाठी बाजारात अनेक पर्यायही उपलब्ध आहेत आणि त्यापकी सर्वसाधारण गुंतवणूकदार ज्याबाबत अनभिज्ञ आहेत तो पर्याय आहे ई-गोल्ड.
२००८ च्या ऑक्टोबर महिन्यात फायनान्शियल टेक्नॉलॉजीज आणि नाफेड यांच्या सहयोगाने नॅशनल स्पॉट एक्स्चेंजचे (एनएसईएल) कामकाज सुरू झाले. हा वस्तू बाजार कमॉडिटीच्या वायदा सौद्यासाठी नव्हे तर त्यामध्ये फक्त डिलिव्हरीचे सौदे होतात. एक दिवसाची सेटलमेंट असल्याने त्यामध्ये वायदा या प्रकाराला थारा नाही. शेअर बाजारावर जसा सेबीचा अंकुश असतो, त्याप्रमाणे हा बाजार स्टेट अग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड, फॉरवर्ड मार्केट कमिशन आणि वेअरहाऊस डेव्हलपमेंट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी यांच्या संयुक्त नियंत्रणाखाली चालतो.
मार्च २०१० मध्ये या एनएसईएलवर ई-गोल्डचे सौदे सुरू झाले. सर्वसाधारण गुंतवणूकदाराला परवडेल इतक्या छोटया परिमाणामध्ये हे सौदे होतात. खरेदी केलेले सोने घरामध्ये किंवा बँक लॉकरमध्ये सांभाळत बसायची गरज नाही. ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात खरेदीदाराच्या डिमॅट खात्यामध्ये जमा होते. अगदी शेअर बाजारातील पध्दतीप्रमाणे. या ई-सिरीजसाठी (सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम वगरे) वेगळा डिमॅट अकाऊंट मात्र उघडावा लागतो. शेअर्ससाठीचा डिमॅट अकाऊंट चालत नाही. सौदे ई-गोल्डच्या युनिट मध्ये होतात आणि १ युनिट म्हणजे १ ग्रॅम. सोन्याची शुध्दता असते ९९५ टक्के आणि भाव भारतातील बाजारभावानुसार असतो. (गोल्ड ईटीएफ या तत्सम गुंतवणूक पर्यायाचे भाव सोन्याच्या जागतिक भावाशी निगडित असतात.) ई-गोल्ड खरेदी एनएसईएलचे अधिकृत दलाल किंवा त्यांच्या उप-दलाला मार्फत होते. वैयक्तिरित्या किंवा अविभक्त हिंदू कुटुंब किंवा कंपन्या ही खरेदी विक्री करू शकतात. खरेदी केलेले सोने डिमॅट खात्यामध्ये जमा झाल्यावर त्याचे प्रत्यक्ष सोन्यामध्येही रूपांतर करता येते. सध्या ही सुविधा भारतातील १३ शहरांमध्ये उपलब्ध आहे. भविष्यामध्ये त्यामध्ये बरीच वाढ होण्याचे संकेत आहे.
ई-गोल्ड साठी होणारा खर्च :
१. एनएसडीएलशी संलग्न असलेल्या डिपॉझिटरी पार्टििसपन्ट्सकडे डिमॅट खाते उघडण्यासाठी लागणारा खर्च ३६० रु.
२.    हे खाते चालू ठेवण्यासाठीचा वार्षकि खर्च सुमारे २२० रु.
३.    खरेदी-व्रिकीवरील दलाली सुमारे ०.५ टक्के
४.    प्रत्यक्ष सोन्यामध्ये रूपांतर करण्यासाठीचा खर्च
५.    व्हॅट, जकात वगरे इतर खर्च.
कर :
’ खरेदी केलेले सोने ३६ महिन्यांच्या आत विकले तर नफ्याची रक्कम गुंतवणूकदाराच्या त्या वर्षीच्या एकूण कमाईमध्ये गणली जाते आणि त्यानुसार त्याला प्राप्तिकर भरावा लागतो.
’ ३६ महिन्यानंतर विक्री केलेल्या सोन्याच्या बाबतीत लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू पडतो. आणि त्याचा दर कमाईच्या २० टक्के आहे.
सर्वसाधारणपणे सोन्याची खरेदी बँक किंवा सराफाच्या पेढीवर केली जाते. ई-गोल्डच्या तुलनेमध्ये ती खरेदी कितपत उपयुक्त आहे ते सोबतच्या तुलनात्मक कोष्टकावरुन पुरते स्पष्ट होते.
बाजारामध्ये गोल्ड ईटीएफ (गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड) नावाचा एक पर्याय आहे. त्यासाठी वेगळे डिमॅट खाते उघडायची गरज नसते. ही म्युच्युअल फंडाची युनिट असतात आणि त्यांचे सौदे शेअर बाजारारमध्ये चालतात. खरेदी केलेली युनिट शेअरसाठीच्या डिमॅट खात्यामध्ये जमा होतात. हयामधील सोन्याचा भाव आंतरराष्ट्रीय सोन्याच्या भावाशी संलग्न असतो. हयामध्ये एस्.आय्.पी.ची सुविधा नसल्याने गुंतवणुकीमध्ये शिस्तबध्दता राहत नाही.
निष्कर्ष :  
१.    ई-गोल्डच्या माध्यमातून सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर सुमारे १० टक्के ते १०.५ टक्के बचत होते.
२.    बॅकेमधून खरेदी केलेल्या सोन्याची परत बँकेकडे विक्री करता येत नाही. आणि सोनाराकडे खरेदी-विक्रीच्या भावामध्ये फार तफावत असते. ई-गोल्डमध्ये भाव फरक कमी असल्याने जास्त प्रमाणात नफा पदरात पडतो.
३.    नवीन डिमॅट खाते उघडण्याची तसदी घ्यावी लागते हे खरे. परंतु त्याच खात्यामध्ये ई-सिव्हर किंवा ई-प्लॅटिनम जमा करण्याची व्यवस्था असल्याने चांदी किंवा प्लॅटिनममध्येही गुंतवणूक करता येते.
४. ‘एसआयपी’ची सुविधा असल्याने गुंतवणूकदाराच्या अपरोक्ष मासिक गुंतवणुक होत राहाते आणि त्यामुळे गुंतवणुकीत एक प्रकारची शिस्तबध्दता येते.
५.    ई-गोल्डचा भाव देशांतर्गत सोन्याच्या भावाशी निगडीत असल्याने रुपयाच्या विनिमय दरावरही तो अवलंबून असतो. रुपया घसरला तर जास्त किंमत मोजावी लागते आणि वधारला तर स्वस्तामध्ये खरेदी होते.

ई-गोल्डचे फायदे
१.    आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये बसून फोनवर सौदे करता येतात आणि तेही सोमवार ते शुक्रवार.
२.    आवश्यकता असेल तर डिमॅट खात्यातील सोन्याचे प्रत्यक्ष सोन्यामध्ये रुपांतर करता येते.
३.    काही दलालांकडे एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)ची सुविधा आहे. त्यामुळे नियमित स्वरूपात मासिक गुंतवणूक करता येते, जेणेकरून गुंतवणुकीला अतिशय आवश्यक असलेली शिस्त लागते.
४.    शरिया अ‍ॅडव्हायजरी बोर्डाने या गुंतवणुकीला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे इस्लाम धर्मीय गुंतवणूकदार याचा लाभ घेऊ शकतो.
५.    सोने डिमॅट खात्यामध्ये असल्याने चोरीची भीती नाही.
६.    सोन्याच्या खरेदी-विक्रीच्या भावात कधी कधी १ रुपयापेक्षाही कमी फरक असतो.

सोने गुंतवणूक एक तुलना ऑक्टोबर २०१२ अखेर दरांच्या आधारे
विवरण    ई गोल्ड    बँक    सराफ पेढी       
प्रतिग्रॅम किंमती     ३१८८    ३६७६    ३५८६           
शुध्दतेचे अधिमूल्य     १३    –    –       
१० ग्रॅमची किंमत     ३२०१०    ३६७६०    ३५८६०       
दलाली     १६०    –    –       
सíव्हस टॅक्स      २०    –    –       
नाणे बनविण्याचा खर्च    ४००    –    –       
व्हॅट     ३२०    –    –       
एकूण खर्च     ३२९१०    ३६७६०    ३६२१८           
फरक     –    (+) ३८५०     (+) ३३०८     

(बँकेचा जो दर जर आहे तो व्हॅटसकट आहे. एनएसईएलमधील सौदे ९९५ शुध्दतेचे होतात त्यामुळे त्याचे अधिमूल्य हिशोबात घेतले आहे. तसेच दलाली ०.५ टक्के गृहीत धरली आहे. ती कमी जास्त होऊ शकते).

Story img Loader