महाराष्ट्रात अशा खूप गृहिणी असतील की ज्यांच्या जवळ अशी अडीअडचणीसाठी म्हणून बाजूला काढून ठेवलेली रक्कम असेल. ती आपल्या नावावर गुंतवावी असा विचार या गृहिणी कधीच करीत नाहीत. करीत असतील तर ही गुंतवणूक कशात जात असेल..?
क ल्याणच्या माधुरी कदम यांनी प्रश्न विचारला आहे, त्यांचे वय ५० आहे. पती एका राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकारी आहेत. दोन मुलांची शिक्षण मार्गी लागलेली आहेत. त्या स्वत: गृहिणी आहेत. घरखर्चासाठीच्या रकमेतून दरमहा काही रक्कम बाजूला काढून आजपर्यंत त्यांचे रुपये चार लाख जमा झाले आहेत. आजपर्यंत ही रक्कम त्या घरीच जमा करून ठेवत आल्या आहेत. त्यांनी विचारले आहे की, ही रक्कम कशा पद्धतीत गुंतवावी?
आज महाराष्ट्रात अशा खूप गृहिणी असतील की ज्यांच्या जवळ अशी अडीअडचणीसाठी म्हणून बाजूला काढून ठेवलेली रक्कम असेल. ती आपल्या नावावर गुंतवावी असा विचार या गृहिणी कधीच करीत नाहीत. कारण अडचण सांगून येत नाही. १९८२ च्या सुमारास नारायण मूर्ती आपल्या पत्नीला म्हणाले, ‘सुधा मला पैशांची गरज आहे, तू किती देऊ शकतेस.’ सुधा मूर्ती दरमहा कपाटात एका बॉक्समध्ये असेच दरमहा १००-२०० रुपये जमा करीत असत. त्या वेळेस ते जमलेले दहा-बारा हजार रुपये नारायण मूर्तीना इन्फोसिस कंपनीची स्थापना करण्यास उपयोगी होतात. आजही सुधा मूर्ती इन्फोसिसच्या मोठय़ा भागधारकांपैकी एक आहेत.
माझ्या बाबतीत असाच वेगळा अनुभव आहे. आम्ही नाताळच्या सुट्टीत दहा दिवस फिरायला जाणार होतो. पूर्वी ठरलेल्या ऐवजी अंदमानला जायचे ठरले. बजेटपेक्षा थोडा जास्त खर्च होणार होता. त्या वेळेस माझ्या पत्नीने जास्त लागणारी रक्कम तिच्या अल्पबचतीतून दिली. असे अनुभव प्रत्येक घरी आढळून येतात.
अशा बचतीत घरातील स्त्रीचे कौशल्य असते म्हणून अशी रक्कम गुंतवल्यास त्यापासून मिळणारे उत्पन्न पतीच्या उत्पन्नातून मिळवून त्यावर पतीस आयकर भरावा लागत नाही. (Clubbing Provisions) अन्यथा पत्नीने पत्नीस बक्षीस दिलेली रक्कम गुंतवल्यास त्यापासून मिळणारे उत्पन्न पतीच्या उत्पन्नात मिळवून त्यावर पतीस आयकर द्यावा लागतो.
माधुरीताई, आपण आपल्या घराच्या जवळच असलेल्या बँकेत स्वत:च्या नावाने बचत खाते उघडा. अर्थात नामनिदेशन पतीच्या नावे कराच. त्या खात्याचा संपूर्ण व्यवहार तुम्ही सांभाळा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. बहुतेक वेळा गृहिणी नवरा सांगेल त्या फॉर्मवर दुसऱ्या नावाची फुली मारलेल्या जागी सही करतात. ती गुंतवणूक काय आहे? कशात आहे? कधी परत मिळणार हे माहीत नसते. पत्नीने हे प्रश्न विचारले तर आज होणाऱ्या ९० टक्के चुकीच्या गुंतवणुका वाचतील. दुर्दैवाने नेट बँकिंगमुळे आता सह गुंतवणूकदाराची सहीच लागत नाही.
तुमच्या बचत खात्यात रोख रक्कम एकदम न भरता थोडी-थोडी भरत राहा. सर्व चार लाख रुपये एकत्र खात्यात भरल्यास याची चौकशी होऊ शकते. घाबरू नका, तुमच्या कौशल्याने जमा केलेली ही रक्कम आहे. यावर संपूर्णपणे तुमचा अधिकार आहे, त्यामुळे कोणत्याही चौकशांची उत्तरे सोपी आहेत; परंतु मुंबईतील एका डॉक्टरच्या घरी आयकर विभागाची धाड पडली. त्यांच्या पत्नीने अशा पद्धतीत बाजूला काढलेली रक्कम चिनीमातीच्या बरणीत ठेवली होती. ही गोष्ट २५ वर्षांपूर्वीची आहे. या रकमेचे स्पष्टीकरण देताना डॉक्टरांच्या नाकीनऊ आले. म्हणून आपल्या बाजूने आपण काळजी घ्यावी. जमलेल्या चार लाख रुपयांपैकी रुपये एक लाख बँकेत दीर्घ मुदतीने ठेव म्हणून गुंतवा. एक डिमॅट खाते उघडून चांगल्या दलालामार्फत रुपये एक लाखाचे गोल्ड ईटीएफ घ्या व उरलेले दोन लाख रुपये चांगल्या चार कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रत्येकी रुपये ५००००/- गुंतवा, शेअर्समधील गुंतवणूक बाजाराचा कल पाहून दोन महिन्यांनंतर करा. चांगल्या चार कंपन्या- टी.सी.एस., एचडीएफसी, नेस्ले आणि हिंदुस्तान युनिलीव्हर. वॉरेन बफेंच्या नियमानुसार या कंपन्यांचे समभाग घेऊन विसरून जा असे आहेत.
गृहिणींसाठी सल्ला
आपल्या कुटुंबाच्या गुंतवणुकांमध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हा. गुंतवणुकीचे स्वरूप काय आहे, त्यावर मोबदला काय आहे. (व्याज, लाभांश, वृद्धी इ.) हे समजून मगच अर्जावर सही करा. आयुष्यभर या व्यवहारात लक्ष दिलेले नसते. उतारवयात हे शिकण्याची आवड राहिलेली नसते व पती निधनानंतर या गोष्टी कटकटीच्या वाटतात. आमच्या ग्राहकांपैकी एक बाई शाळेच्या मुख्याध्यापक होत्या. पती सरकारी कचेरीत मोठय़ा हुद्दय़ावरून निवृत्त झाले होते. बाई स्वत: कर्तबगार असूनसुद्धा गुंतवणुकांकडे लक्ष दिले नव्हते. पतीचे वयाच्या ७५ व्या वर्षी अपघाती निधन होते. ही घटना २००२-२००३ मधील आहे. ‘शेअर बाजारातील चढउतार मला समजत नाहीत. डोक्याला त्रास नको.’ म्हणून सर्व शेअर्स मंदीमध्ये येईल त्या भावास विकून टाक म्हणून माझ्या मागे लागला. त्यांच्या पतीने सन्मार्गाने मिळवलेली रक्कम शेअर बाजारात चांगल्या, सोन्यासारख्या कंपन्यांमध्ये २५-३० वर्षांत गुंतविली होती. सर्व शेअर्स मी नाईलाजाने विकले. २००७ मध्ये या शेअर्सची किंमत दहापट वाढलेली होती. या बाई पैशाच्या बाबतीत इतक्या निरिच्छ होत्या. त्या म्हणाल्या, शेवटी हा सर्व शून्यांचा खेळ आहे. मिळणाऱ्या रकमेवर एक शून्य वाढले असते त्याचा मला काहीच उपयोग नव्हता, कारण ती सर्व रक्कम मी माझ्या शाळेला त्याच वेळेस देऊन टाकली. पण शेअर बाजारची थोडीफार माहिती असती तर शेअर्स विकणे लांबवता आले असते व शाळेला देणगी दहापट नाहीतर निदान पाचपट तरी मिळाली असती. काही वेळेस गृहिणी अर्जावर सह्य़ा करण्यासही कंटाळा करतात. पूर्वी शेअर्ससाठी अर्ज एका कुटुंबातून चार-पाच केले जात. माझ्या एका ग्राहकाची पत्नी कायम अशा सह्य़ा करण्यास कंटाळा करायची. त्यावर माझ्या ग्राहकाने पत्नीच्या सह्य़ा स्वत:च करण्यास सुरुवात केली. अशा क्लुप्त्या नंतर महाग पडतात.
बहुतेक सर्व गृहिणी आपल्या पतीचा आयकर भरणे, बँक खाती सांभाळणे, गुंतवणुकांचे अर्ज दलालांच्या ऑफिसमध्ये नेऊन देणे यात लक्ष घालतात; परंतु या सर्वाचा अभ्यास करीत नाहीत. याबाबत जागरूक राहत नाहीत. आमचे एक ग्राहक कलाकार आहेत. त्यांच्या पत्नी त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार पाहतात. एक निर्माता एका टीव्ही सीरियलचे पैसे वेळेवर देत नव्हता. चित्रीकरण चालू असताना ब्रेकमध्ये ही वस्तुस्थिती पत्नीने नजरेस आणून दिली. त्याने काम थांबवूया म्हटल्याबरोबर मागील सर्व रक्कम लगेच दिली गेली.
सध्या टेलिमार्केटिंग कंपन्यांमार्फत काही शेअर दलालांनी आपला दृष्टी गृहिणीकडे वळवली आहे. तुमच्या फावल्या वेळात घरातील संगणकावर घरी बसून डे-ट्रेडिंग करा व भरघोस उत्पन्न मिळवा, असे अमिष दाखवले जाते. संगणकावर आम्ही सॉफ्टवेअर मोफत लोड करून देतो. आम्ही तुमचा दोन महिने सराव करून घेतो. वगैरे वगैरे. अशा पद्धतीत पैसे मिळवणे सोपे असते तर भारतात गरिबी राहिली नसती. ज्या स्त्रिया नोकरी करून अर्थार्जन करतात त्यांनी नोकरी सोडून हाच व्यवसाय केला नसता का? सर्व म्युच्युअल फंड, आर्थिक संस्था, बँका यांनी आपली सर्व संपत्ती डे-ट्रेडिंगसाठीच वापरली नसती का? शेवटी डे-ट्रेडिंग हे जुगारासारखेच आहे. यात एकाचा फायदा म्हणजे दुसऱ्याचे नुकसान हे नक्की आहे. अशा फोन कॉलपासून सावध राहा.   

Story img Loader