|| भक्ती रसाळ
आर्थिक आरोग्याची गुरुकिल्ली ठरतील असे वैयक्तिक आणि कुटुंबाच्या वित्तव्यवस्थापनाचे वेगवेगळे पैलू उलगडणारे पाक्षिक सदर..
अकल्पितरीत्या ‘जनता संचारबंदी’ची घोषणा २२ मार्च २०२० रोजी झाली. पुढे काय मांडून ठेवले आहे याची सुतराम कल्पना नसताना आपण घरात स्वत:ला स्थानबद्ध केले. करोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी ही सुमारे ७० दिवसांपर्यंत लांबत गेलेली टाळेबंदी आपण अनुभवली. अत्यावश्यक सेवा वगळता उद्योगधंदे, व्यापारी आस्थापना, शाळा, विद्यालये, प्रवास इत्यादी व्यवहार ठप्प झाले. आरोग्य आणीबाणी म्हणजे काय, तसेच करोना विषाणुबाधेवरील उपचार, वैद्यकीय सांख्यिकी माहिती उपलब्ध नसल्याने संपूर्ण जग हवालदिल झाले. आपणही नाइलाजाने कडक र्निबध स्वीकारले.
आरोग्य आणीबाणीमुळे जागतिक आर्थिक व्यवहारांचे ठप्प होणे हे चिंताजनकच आणि अशा प्रसंगाला कधीही सामोरे न गेलेल्या शेअर बाजाराने परिणामी अभूतपूर्व घसरण नोंदवली. दणदणीत घसरण झालेल्या बाजाराने भल्या भल्या अर्थतज्ज्ञांची, विश्लेषकांची भंबेरी उडवली. सामान्य गुंतवणूकदाराने हवालदिल होऊन गुंतवणुकांतून बाहेर पडणे पत्करले. धसकाच इतका जबरदस्त की काहींनी नियमित शिस्तबद्धपणे सुरू असलेल्या गुंतवणुकाही स्थगित केल्या अथवा मोडल्या.
अचानक प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने, मासिक उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने गुंतणूकदार ‘सावध’ झाला. जून-जुलै २०२० मधील टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर मात्र बाजाराने कात टाकली. कोविड संसर्गावर लसीकरण येण्याच्या बातम्या येऊ लागल्या. संशोधनाद्वारे नवीन वैद्यकीय सेवांचा समावेश करोना उपचारात झाला आणि शेअर बाजारात निर्देशांकाची घोडदौड सुरू झाली.
दुसऱ्या कोविड लाटेच्या उद्रेकातही बाजार सगळय़ा भाकितांना फोल ठरवत नवनवे विक्रम मोडत राहिला! गेल्या २१ महिन्यांचा भारतीय शेअर बाजाराचा आलेख बघितला तर ‘जोखीम’ आणि ‘परताव्या’चा परस्परसंबंध ठळकपणे लक्षात येईल. २०२० सालापासून २०२२ सालापर्यंतच्या आर्थिक क्षेत्रांतील चढ-उतारांचे सिंहावलोकन करण्याचा हेतू हाच की, जोखमींचे व्यवस्थापन हा कोणत्याही व्यक्तिगत आर्थिक नियोजनाचा पाया आहे. जर जोखमींचा अभ्यास करून कुटुंबाच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी गुंतवणुका केल्या तर अल्पावधीतील कष्ट दीर्घमुदतीत भरघोस नफा देतात हे आर्थिक नियोजनाचे सूत्र आहे!
चलनवाढीचा दर, बँक ठेवीवरील अत्यल्प व्याजदर, निश्चित परतावा देणारे पोस्टातील पर्याय दीर्घमुदतीत अपेक्षित संपत्ती निर्माण करू शकत नाहीत. सामान्य कुटुंबप्रमुख कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याच्या भवितव्यासाठी तजवीज करण्यासाठी म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’ म्हणजेच नियमित ठरावीक हप्तय़ांद्वारे गुंतवणूक करतो. मुलांचे शालेय खर्च, उच्चशिक्षण, लग्न, गृहखरेदी, जोडीदाराचे निवृत्ती व्यवस्थापन, परदेश पर्यटन अशा आर्थिक उद्दिष्टांशी निगडित दरमहा ठरावीक हप्तय़ांद्वारे जीवनलक्ष्यांचा पाठपुरावा करणे सोपे पडले. परंतु बाजारातील पडझड, जोखीम, अस्थिरता बऱ्याचदा गुंतवणूकदारांस संभ्रमात पाडते. जोखमींचा विचार न करता गुंतवणूक केल्यास, मार्च २०२० मध्ये अचानक झालेल्या ‘आभासी तोटय़ा’ने हवालदिल होऊन गुंतवणुका उद्दिष्ट पूर्ण होण्याआधीच बंद केल्या जातात. त्याचप्रमाणे जोखमींचे विभाजन न केल्याने कमी परताव्याच्या, कमी जोखमीच्या म्युच्युअल फंडात विनाकारण वर्षांनुवर्षे तोटय़ात गुंतून राहतात. आर्थिक नियोजनाद्वारे ‘जीवनलक्ष्ये’ गाठायची असतील तर काही सूत्रे किंवा नियम अवलंबणे गरजेचे आहे.
१. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक नेहमी आर्थिक ध्येयाशी बांधील असावी –
कोणतीही गुंतवणूक ही आपल्याला अपेक्षित परतावा देईल की नाही या शक्यतेपेक्षा, गुंतवणूक ही निश्चित ‘आर्थिक संकल्प’, ‘ध्येयाशी’ संलग्न असावी. उदाहरणार्थ, लेकीच्या विवाहासाठी जर १५ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे तर त्यानुसार मासिक हप्तय़ादवारे गुंतवणूकदार एक किंवा दोन ‘एसआयपी’ म्युच्युअल फंडातील समभागसंलग्न (इक्विटी) योजनांच्या प्रकारात सुरू करू शकतो. परंतु ही गुंतवणूक करताना त्याची अपेक्षा शेअर बाजार जर २० टक्के दराने परतावा देत आहे तर त्याची गुंतवणूक ही २२ टक्के दराने दरवर्षी वाढावी अशी नसावी. तर त्यापेक्षा लेकीच्या लग्नात योग्य वेळी १५ लाख रुपयांची अपेक्षित रक्कम उभी करण्याकरिता ही एसआयपी गुंतवणूकच पुरेशी ठरावी अशीच अपेक्षा असावी. जेणेकरून उद्दिष्ट गाठले जाण्याआधीच गुंतवणुकीतून बाहेर पडण्याची मानसिकता आटोक्यात राहील.
२. जोखीम घेण्याची ताकद ओळखून गुंतवणूक करावी –
प्रत्येक व्यक्तीची जोखीम घेण्याची क्षमता ही त्या व्यक्तीचे वय, मासिक उत्पन्न, कामाचे स्वरूप, शिक्षण, अनुभव, गुंतवणूकविषयक आधीचा अनुभव, स्वभावातील धाडसी वृत्ती, शिस्त अशा आर्थिक, मानसिक घटकांशी जोडलेली असते. ‘जोखीम क्षमतेचे मूल्यमापन’ करून गुंतवणूकदाराची वर्गवारी करता येते. जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार त्याला ‘योग्य’ ती गुंतवणूक सुरू करता येते, अशी शास्त्रशुद्ध पद्धत आर्थिक नियोजनकार अवलंबतात. अशा अभ्यासपूर्ण नियोजनातून दीर्घ मुदतीत गुंतवणूक ध्येयपूर्तीपर्यंत यशस्वीपणे चालू ठेवणे शक्य होते.
३. वार्षिक पुनरावलोकनाद्वारे जीवनलक्ष्यांचा पाठपुरावा –
म्युच्युअल फंडातील गुंतवणूका बऱ्याचदा यशस्वी फंडाच्या मानांकनाच्या यादीनुसार केल्या जातात. एक, तीन, पाच वर्षांतील फंडाची कामगिरी बघून गुंतवणूकदार फंडाची निवड करतो. परंतु दीर्घ मुदतीत यशस्वी फंडाची कामगिरी बदलू शकते. दोन वर्षांपूर्वी विक्रमी परतावा देणारे फंड वर्षांनुवर्षे कामगिरी टिकवतील याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे दरवर्षी प्रत्येक गुंतवणुकीचे पुनरावलोकन करावे लागते. आपण ‘आर्थिक ध्येयाजवळ’ जात आहेत का? अपेक्षित दराने संपत्तीत भर पडत आहे का? याची चाचपणी करणे आवश्यक ठरते.
फंडाचा खर्च आणि जोखीम यांचा इतिहास बदललेला आहे का? अशा अनेकविध बाजूंनी ‘पुनरावलोकन’ फार महत्त्वाचे आहे.
४. बाजारातील अस्थिरता आणि पर्यायी विकल्प –
सध्या गुंतवणुकांचे ग्राहकाच्या सवयींनुसार विकल्प उपलब्ध आहेत. जसे अल्पावधीकरिता एसआयपी विश्रांती, कमी अवधीकरिता वाढीव रकमेची गुंतवणूक करण्याकरिता टॉप-अप, इत्यादी. अस्थिर बाजार आणि अचानक झालेल्या भांडवल बाजारातील पडझडीमुळे घाबरून गुंतवणूक थांबविण्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याआधी गुंतवणूकदार अनेक पर्यायांचा विचार करू शकतो. ‘जीवनलक्ष्ये’ निश्चित केल्यावर अचानक चालू गुंतवणुका बंद केल्या तर त्याचा परिणाम कुटुंबाच्या आर्थिक आरोग्यावर निश्चितच पडतो. त्यामुळे वेळीच तडजोडीने सुवर्णमध्य काढून गुंतवणूक चालू ठेवणे कधीही हिताचे ठरते.
आज तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या उच्चांकावर आहे. परंतु बहुतांश नागरिक लसीकरणाने संरक्षित आहेत. सौम्य लक्षणांमुळे पहिल्या लाटेसारखे चिंतेचे वातावरण दिसत नाही. शेअर बाजारही नवीन वर्षांत सकारात्मक दिशेने वधारला आहे.
गुंतवणूकदारांनी मागील चुकांची पुनरावृत्ती न करता नव्या उत्साहाने आर्थिक नियोजन संयमाने अंगीकारले तर हे वर्ष आर्थिक विवंचनांचे वर्ष निश्चितच नसेल.
लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आणि व्यावसायिक विमा सल्लागार
bhakteerasal@gmail.com