av-02आíथक नियोजनाच्या विचारणेसाठी येणारे बहुतांश ई-मेल हे योग्य गुंतवणूक सुचविण्याची विनंती करणारे असतात. परंतु नियोजनाच्या मनोऱ्याच्या पायथ्याशी विमा, मध्यभागी आरोग्य विमा व शिखरावर गुंतवणूक असते.
आज ज्यांचे नियोजन जाणून घेणार आहोत त्या प्राजक्ता सामंत (वय ३२) यांच्याकडूनही अशीच विचारणा आली. प्राजक्ता यांना त्यांची मुलगी ओवी (३० महिने) हिच्यासाठी बचत करायची आहे. पुण्यात वाहन उद्योगासाठी पूरक उत्पादने तयार करणाऱ्या एका कंपनीत प्राजक्ता या आरेखन केंद्राच्या (कॅड सेंटर) प्रमुख आहेत. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी आयआयटीतून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात गुरगांव येथे नोकरी केल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून त्या पुण्यात नोकरी करत आहेत.
प्राजक्ता यांनी मुदतीचा विमा खरेदी केला आहे. त्यांच्या कंपनीकडून त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी समूह आरोग्य विम्याचे संरक्षण लाभले आहे. त्यांचा स्वत:चा पीपीएफ आहे. मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवणूक करावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यांना त्यांच्या एका सहकाऱ्याने देशातील पहिल्या क्रमांकाच्या जीवन विमा कंपनीची एक विमा योजना सुचविली होती. ‘बचत म्हणजे विमा’ या भारतीयांच्या मनावर असलेल्या विचार पगडय़ामुळे मुलांच्या भविष्यातील खर्चाची तरतूद म्हणून करावयाच्या बचतीसाठी बाजारपेठ ही विमा कंपन्यांच्या उत्पादनांनी बहरली आहे.
एलआयसीची कोमल जीवन, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफची शॉर्ट किड्स, एचडीएफसी लाइफची यंगस्टार व एसबीआय लाइफची स्मार्ट स्कॉलर ही विमा योजनांची काही वानगीदाखल उदाहरणे आहेत. या योजनांमध्ये मुलाला सातव्या वर्षांपासून विमा छत्र दिले जाते. पॉलिसी सुरू असताना पालकाचे निधन झाल्यास विम्याचा हप्ता न भरण्याची मुभा असते. अशी सवलत (रायडर) दिल्याने विमा कंपनी ही भरलेल्या हप्त्यातून ठरावीक रक्कम गुंतवणुकीआधी वळती करून घेते. थोडक्यात, बचतीसोबत नको असलेल्या या दोन गोष्टींसाठी पसे मोजावे लागतात. यासाठी अशी कोणतीही योजना घेण्याऐवजी प्राजक्ता यांनी आणखी एक कोटीचा टर्म प्लान व मुलीचे ‘सुकन्या समृद्धी’ योजनेअंर्तगत खाते उघडणे फायद्याचे आहे. आजच्या नियोजनाच्या निमित्ताने ज्यांना १० वर्षांच्या आतली मुलगी आहे. अशांसाठी ‘सुकन्या समृद्धी’ योजना जाणून घेऊ.
या योजनेची घोषणा १० जुल २०१४ रोजी अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केली. १२ डिसेंबर २०१४ च्या राजपत्रात ती प्रसिद्ध होऊन या योजनेचे कायदेशीर सोपस्कार पार पडले. सरकारने अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची या योजनेच्या सदिच्छादूत म्हणून नेमणूक करून तिचे उद्घाटन केले. ही केंद्र सरकारची योजना असल्याने या योजनेत भरणा झालेली रक्कम मुदतपूर्तीनंतर वेळेवर मिळण्याची खात्री आहे. सर्व टपाल कार्यालय, सर्व राष्ट्रीयीकृत बँका, आयसीआयसीआय, एचडीएफसी व अ‍ॅक्सिस या खासगी बँकांमध्ये हे खाते सुरू करता येते. परंतु बहुसंख्य राष्ट्रीयीकृत बँका हे खाते सुरू करू इच्छिणाऱ्यांना टपाल कार्यालयात खाते सुरू करण्याचा सल्ला देत आहेत. १० वर्षांच्या आतील मुलीच्या नावे पालक हे खाते सुरू करू शकतात. परंतु अपवाद म्हणून या वर्षी १० वष्रे पूर्ण व ११वे वर्ष सुरू असलेल्या मुलीच्या नावे हे सुरू करता येईल. केवळ या वर्षी २ डिसेंबर २००३ नंतर जन्मलेल्या मुलींच्या नावे हे खाते सुरू करता येईल. १ एप्रिल २०१५ नंतर केवळ १ डिसेंबर २००५ नंतर जन्मलेल्या मुलींच्या नावे खाते सुरू करता येईल. खाते सुरू करताना १,००० रुपये जमा करावे लागतील व दरवर्षी किमान १,००० ते कमाल १.५० लाख या खात्यात जमा करता येतील. वर्षांतून कितीही वेळा या खात्यात रक्कम जमा करता येईल. जमा रक्कमेवर आíथक वर्ष २००१४-१५ साठी ९.१ टक्के व्याज देण्यात येईल. दरवर्षी १ एप्रिल रोजी पुढील वर्षांसाठी देय व्याजदर सरकार जाहीर करेल. एखाद्या वर्षी खात्यात पसे जमा न करता आल्यास खाते बंद होईल. खाते पुन्हा सुरू ठेवण्यासाठी दर वर्षी ५० अधिक किमान जमा म्हणजे १,०५० रुपये भरून खाते सुरू करता येईल. या खात्यात १४ वर्षांपर्यंत रक्कम जमा करता येऊ शकेल. खाते सुरू केल्यापासून १४ ते २१ दरम्यान खातेधारक मुलीचे लग्न झाल्यास खात्यातील जमा काढता येईल. २१ वष्रेपर्यंत लग्न न झाल्यास खाते बंद होऊन जमा रक्कम काढावी लागेल. १४ वर्षांआधी जमा रक्कम काढता येणार नाही. काही कारणांनी या खात्यात रक्कम जमा करण्यास खातेधारक असमर्थ असेल तर त्याला हे सकारण लेखी कळवावे लागेल. कारण सयुक्तिक वाटल्यास दंड न होता खाते बंद करण्यास अनुमती मिळेल. खाते बंद झाल्यावर जमा न काढल्यास या रक्कमेवर प्रचलित दरानुसार व्याज मिळत राहील. मुलीच्या १८व्या वर्षी लग्न न झाल्यास एकूण जमा रक्कमेच्या ५० टक्के रक्कम काढता येईल.
वर उल्लेख केल्यानुसार अनेक पालक हे विमा विक्रेत्यांच्या सादरीकरणावर विश्वास ठेवून बचत म्हणून विमा योजना खरेदी करतात. या योजनामध्ये नको असलेला विमा व गुंतवणुकीवर चार – साडेचार टक्के परतावा पदरी पडतो हे विमा खरेदीदारांना ठाऊक नसते. अनेक वेळा विमा इच्छुकांची म्युच्युअल फंड गुंतवणूक करण्याची इच्छा असूनही बाजारातील चढ-उतारांचा सामना करण्याचे धर्य नसते. आज ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली निवृत्ती योजना वगळता कुठल्याही सरकारी योजनेवर ९.१ टक्के इतका खात्रीशीर परतावा (या वर्षी पुरता तरी) मिळत नाही.
कदाचित भविष्यात या खात्यात केलेल्या गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायद्याच्या ८० सी कलमानुसार मिळणारी वजावट मिळेल, अशी शक्यता वाटते. विमा योजनेच्या मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम करमुक्त असते. तरीही विमा योजनांच्या तुलनेत ही योजना उजवी आहे. ही योजना सरकारी असल्याने व ही योजना विकल्याबद्दल विक्रेत्याला मानधन (कमिशन) मिळत नसल्याने या योजनेच्या खरेदीसाठी कोणी पाठपुरावा करणार नाही. १० वष्रे व त्याखालील वयाच्या मुलींच्या पालकांनी हे खाते सुरू करणे आवश्यक आहे. प्राजक्ता यांनीदेखील शक्य तितक्या लवकर आपल्या सुकन्येच्या समृद्ध अशा या योजनेची निवड करावी, हा सल्ला या नियोजनाच्या निमित्ताने देता येईल.

Story img Loader