भक्ती रसाळ

आर्थिक नियोजन ठरावीक कालावधीने पडताळून पाहणे जरुरीचे असते. तसेच काळानुसार होणारे बदल जसे की, कालांतराने ध्येयांमध्ये बदल होतात, गुंतवणुकीतील अनुभवामुळे जोखीम घेण्याच्या क्षमतेत बदल होतो, तसेच मिळकतीत देखील बदल होत असतो, या सर्व गोष्टी वेळोवेळी पडताळून पाहण्यासाठी व त्याप्रमाणे नियोजन आराखडयमत त्या समाविष्ट करून घेण्यासाठी आर्थिक नियोजनाचे पुनरावलोकन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. सध्याच्या मंदीच्या काळात आर्थिक नियोजनाचा नुसता आराखडा बनवणे पुरेसे नाही तर त्याची अंमलबजावणीही योग्य प्रकारे व्हायला हवी.

जागतिक आर्थिक मंदीची चाहूल लागते आहे. चलनवाढीच्या उपाययोजनांचा परिणाम भांडवली बाजारावर दिसत आहे. युक्रेन रशियातील युद्धविरामाची आशा धूसर होत आहे. सामान्य गुंतवणूकदार गेल्या बारा ते पंधरा महिन्यांतील नफा नाहीसा झाल्याने हवालदिल झाला आहे. एकंदरीत पुढील काही महिन्यांत आर्थिक आव्हनांची मालिका संपेल अशी आशा नाही.

आर्थिक नियोजन सतत बदलत राहणारी प्रक्रिया आहे. दीर्घमुदतीचे आर्थिक धोरण म्हणजे बाजारातील घटनांकडे दुर्लक्ष करत निष्क्रिय राहणे नव्हे. ठरावीक अवधीमध्ये आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेऊन जीवनलक्ष्ये योग्य आर्थिक दिशेनुसार साध्य करता येणे शक्य आहे का? याचा पाठपुरावा करणे अत्यावश्यक ठरते.

सामान्य गुंतवणूकदार आर्थिक नियोजन करताना गृहकर्जाचे हप्ते, विमा हप्ते, घर खर्च, प्रासंगिक खर्च यांचा विचार करून मासिक ठरावीक शिल्लक नियोजनबद्ध गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवितो. गेली दोन वर्षे बाजाराने अभूतपूर्व तेजीत विक्रमी परतावा नोंदवला. त्यामुळे मोठय़ा संख्येने ग्राहकवर्ग भांडवली बाजाराकडे आकर्षित झाला. गुंतवणूकदारांना सदोदित दुहेरी नफ्याची सवय झाली. किमान पाच ते सात वर्षांत किमान १२ टक्के मिळावेत असा रास्त अपेक्षेपेक्षा दुप्पट परतावा मिळू शकतो असा समाज दृढ झाला.

गेल्या सहा महिन्यांतील पडझड, अचानक उद्भवलेले युद्ध यांनी गुंतवणूकदारांच्या आर्थिक जोखीम क्षमतांची सत्त्वपरीक्षा घेतली आहे. पुढील काळातील आवाहने सुस्पष्ट झाल्याने चालू पोर्टफोलिओमध्ये व्यक्तिगत आर्थिक उद्दिष्टांनुसार बदल करणे गरजेचे आहे. बँकांनी मुदत ठेवींवर व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. काही बँकांनी बचत खात्यांवरील व्याजदर वाढवला आहे. गृहकर्जे महाग होण्यास सुरुवात झाली आहे. गुंतवणूकदारांनी काही छोटे बदल मासिक अंदाजपत्रकात करणे अपेक्षित आहे.

१) बचत खाते आणि मुदत ठेवींवरील व्याजदराची नोंद ठेवणे.

२ ) अनाठायी खर्चाला आळा घालणे


३) गृहकर्जे, वैयक्तिक कर्जे , क्रेडिट कार्ड यांची परतफेड मुदतपूर्व करता येणे शक्य असल्यास त्याची स्वतंत्र उपाययोजना आखून मासिक हप्ते बचतीद्वारे आपत्कालीन योजना तरतुदीसाठी बाजूला ठेवणे.

४) बाजारातील नकारात्मक घडामोडी आज जरी नाउमेद करत असतील, तरीही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलेल्या
एसआयपी बंद न करता त्यांच्या परताव्यांवर प्रत्येक तिमाहींनंतर लक्ष ठेवणे.

५ )मुदतठेवींवरील व्याजदराचा आढावा घेऊन वाढीव व्याजदराचा पाठपुरावा करणे.


६) वर्षांतील पुढील सहा महिने सणवार, नवीन शैक्षणिक वर्षे, तसेच करोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता यांचा विचार करता मोठय़ा खर्चाचे ठरतील. आर्थिक मंदी आणि अनियंत्रित महागाई, इंधनदर वाढ यांचा विचार करून आताच प्रासंगिक खर्चासाठी वाढीव तजवीज करणे आवश्यक आहे. 


७ ) प्रत्येक तेजीनंतर मंदी येणे स्वाभाविक आहे. असे आर्थिक चक्र नजीकच्या काळात पुन्हा सकारात्मक परताव्यांचे दिवस दाखवते. कसोटीच्या काळात हतबल न होता तटस्थ राहून जबाबदारीने आर्थिक निर्णय घेणे काळाची गरज आहे.

* लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आणि व्यावसायिक विमा सल्लागार

bhakteerasal@gmail.com

Story img Loader