अनेक ‘अर्थवृत्तान्त’चे वाचक प्रत्यक्ष भेटीची इच्छा व्यक्त करतात. कोणत्याही लेखकाला आपल्या वाचकांना भेटणे आवडते, पण हे शक्य होतेच असे नाही. मागील आठवडय़ात गोंदवलेकर येथे समाधी उत्सवात ‘लोकसत्ता’च्या वाचक असलेल्या एक प्रसूतीतज्ज्ञ सहज भेटल्या. डॉक्टरांचे पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णेच्या पाण्यामुळे समृद्धी प्राप्त झालेल्या एका तालुक्याच्या ठिकाणी स्वत:चे सूतिकागृह आहे. अर्थ वृत्तान्त वाचत असल्याने डॉक्टरांना समभागसदृश्य गुंतवणुकीचे महत्त्व पटले होते. महाराजांच्या पालखीसोबत नगर प्रदक्षिणेदरम्यान डॉक्टरीण बाईंनी एक प्रश्न सहज विचारला, ‘‘बँकेतील पशांतून दहा लाखांचे शेअर्स महिन्याभरात घेतले तर चालतील का?’’ असा त्यांचा प्रश्न होता. बाई प्रसूतीतज्ज्ञ असल्याने त्यांना समजेल अशा भाषेत प्रतिप्रश्न केला, तुम्हाला नऊ गर्भवती स्त्रिया दिल्या व एका महिन्यात बाळ आणा असे सांगितले तर ते शक्य आहे काय? एखाद्या जोडप्याने बाळ हवे ठरविले तरी बाळ या जगात यायला कमीत कमी नऊ महिने व काही दिवस लागतात. त्याचप्रमाणे गुंतवणुकीलाही पुरेसा वेळ द्यावाच लागतो. मागील दहा वर्ष न केलेल्या कामाचा अनुशेष एका महिन्यात भरून काढणे शक्य नाही. म्हणून या डॉक्टरीण बाईनी मासिक एक लाखाची एसआयपी पुढील पाच वष्रे करता येईल अशा दहा फंडाची नावे सांगितली. बाईंचे नियोजन अनेक वैद्यकीय व्यावसायिकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. आज मात्र आणखी एका पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या युवकाचे नियोजन पाहू.
मूळचे अहमदनगर जिल्ह्य़ातील कोपरगाव तालुक्यातील असलेले डॉ.पराग काटे (३०) हे फार्मकॉलॉजी या विषयात एमडी करीत आहेत. त्यांनी नाशिकच्या विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली. या शिक्षणासाठी त्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले होते. या कर्जाचा मोठा हिस्सा त्यांच्या वडिलांनी फेडला. त्यांचे आईवडील कोपरगांव येथे राहतात. वडील निवृत्त प्राध्यापक व आई गृहिणी आहेत. वडिलांना निवृत्तिवेतन मिळते. थोरली बहीण विवाहित आहे. डॉ.पराग यांनी वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर दोन वष्रे मुंबईत अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी केली. या काळात त्यांना जे वेतन मिळत होते त्या वेतनातून त्यांनी स्वत:चा खर्च भागवून शैक्षणिक कर्जाचा काही हिस्सा फेडला. ऑगस्ट २०१४ पासून त्यांना मुंबई महानगर पालिकेच्या लोकमान्य टिळक रुणालय व वैद्यकीय महाविद्यालय (सायन हॉस्पिटल) येथे प्रवेश मिळाला. तीन वर्षांनंतर म्हणजे साधारण जून २०१७ दरम्यान त्यांचे महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण होईल. त्यानंतर त्यांनी एक वर्ष सक्तीची सरकारी नोकरी करणे अपेक्षित आहे. त्यांना पदव्युत्तर पदवी मिळण्यास अजून चार वष्रे लागतील. म्हणजे त्यांच्या उत्पन्नाला सुरुवात त्यांच्या वयाच्या ३४व्या वर्षी सुरू होईल. दरम्यानच्या काळात त्यांच्या आईवडिलांनी डॉ.पराग यांच्यासाठी सुयोग्य वधूचा शोध सुरू केला असून येत्या वर्षभरात ते विवाहबद्ध होतील. फार्मकॉलॉजी या विषयात एमडीची पदवी घेतल्यानंतर स्वतंत्र व्यवसायास मर्यादित वाव असतो. साहजिकच त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकी किंवा औषध निर्माण कंपनीत नोकरी हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा