लोकशिक्षणाचाच एक भाग असलेल्या अर्थसाक्षरता या विषयातील ‘म्युच्युअल फंड’ या संकल्पनेचे विवेचन व म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांचा आढावा घेणारी लेखमाला..
गुंतवणुकीचा हेतू ठरविल्यानंतर आपल्या इच्छापूर्तीच्या जवळ जाणारी नेमकी योजना कशी निवडावी हे समजून घेण्याचा या लेखमालेचा उद्देश असणार आहे. ज्या योजना उत्तम परतावा देणाऱ्या आहेत त्यांच्या बद्दलच या स्तंभातून विवेचन होणार आहे. भारतामध्ये ४५ निधी व्यवस्थापन कंपन्या असून अंदाजे विविध ११०० योजना गुंतवणुकीसाठी खुल्या आहेत. रोजच कुठली तरी योजना ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यमुळे बंद होत असते तर नवीन योजना खुल्या होत असतात. यातून नेमकी योजना वाचकांना सापडल्यास या लेखमालेचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.
सुरुवात ‘एचडीएफसी टॉप २००’ या फंडाने करू या. फंडांवर लिहायचे ठरल्यावर सुरुवात या किंवा एचडीएफसी इक्विटी फंडाशिवाय दुसरी कुठलीच म्युच्युअल फंडाची योजना डोळ्यासमोर आली नाही. ‘सेन्सेक्स’मध्ये जे स्थान रिलायन्स आणि स्टेट बँकेचे आहे तेच स्थान म्युच्युअल फंडामध्ये एचडीएफसी टॉप २०० आणि एचडीएफसी इक्विटी फंड यांचे आहे. ही योजना सर्वात जास्त निधीचे व्यवस्थापन करते असेही नाही, कधीच पहिल्या पाच उत्तम परतावा देणाऱ्या योजनांमध्येही ती नसते. परंतु सातत्य हे योजनेचे सर्वात मोठे यश आहे. दोन आठवड्यापूर्वी एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे कार्यकारी संचालक व या योजनेचे व्यवस्थापक प्रशांत जैन यांची मुलाखत वाचली. ते म्हणतात, ‘निवडीच्या निकषामध्ये फिट्ट बसणाऱ्या कंपन्यांमध्येच आम्ही पसे गुंतवतो. या कंपन्या मोठ्या नसतील पण त्यांच्या व्यवसायात पारदर्शकता, नफ्याचे पुरेसे प्रमाण, अव्वल व्यवस्थापन व या सर्वाची पूर्तता करणारे त्या शेअरचे मूल्य हे आमचे गुंतवणूक निकष आहेत.’ अनेकजण बफे यांच्या तत्वज्ञानाचे गोडवे गाणारे ते बफे यांच्या निकषांच्या आधारे काम करत असल्याच्या आभास निर्माण करतात. परंतु त्यांनी गुंतवणूक केलेल्या शेअरमध्ये याचे प्रत्यंतर मात्र दिसत नाहीत. गेली २० वष्रे सातत्याने सरासरी ३०% परतावा या योजनेने दिला आहे. सुरुवातीच्या काळात साधारण २००० सालात माझ्या देखरेखीत योजनेसाठी शंभर कोटी तरी गोळा झाले असतील. त्या काळात ‘के-१०’ या नावाने प्रकाशझोतात असणाऱ्या शेअरपकी एकाही शेअरमध्ये या योजनेने पसे गुंतविलेले नव्हते. एका परिषदेमध्ये या आक्षेपाला उत्तर देतांना प्रशांत जैन एकाच वाक्य बोलले ‘valuations of these shares do not justify investments in the stocks.’ नंतरच्या काळात हे द्रष्टेपण किती योग्य होते हे दिसले. ज्या योजनांनी यात पसे गुंतवले त्यांचे मूल्य वर जात व एचडीएफसीच्या योजनांचे मूल्य वाढत नव्हते तेव्हा या योजना विकणे कठीण होत होते. परंतु ज्या ग्राहकांचा विश्वास होता त्यांनी या योजनेत पसे गुंतविले. नंतरचा ‘के-१०’चा इतिहास बहुतेकांना ज्ञात आहे. (कुख्यात दलाल केतन पारिखचे आवडते १० समभाग) म्हणूनच या निधी व्यवस्थापकाच्या द्रष्टेपणाचा गौरव म्हणून या स्तंभाची सुरुवात ‘एचडीएफसी टॉप २००’ने!
या योजनेची सध्याची गुंतवणूकयोग्य गंगाजळी रु. ११,५९१ कोटी आहे. ही योजना आयटीसी थ्रेड नीडल या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने चालू केली. काळाच्या ओघात या योजनेचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीची दोनदा मालकी बदलल्यामुळे पहिल्यांदा ‘झुरिच टॉप २००’ व दुसऱ्यांदा ‘एचडीएफसी टॉप २००’ असे नाव बदलले. बीएसई २०० हा निर्देशांक या योजनेच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी मानदंड आहे.
एकूण ३० उद्योग क्षेत्रात मिळून ६६ कंपन्यातून फंडाने गुंतवणूक केली आहे. पहिल्या पाच कंपन्यांची एकत्रित गुंतवणूक ३१.७३% असून पहिल्या पाच उद्योगक्षेत्रात ५३.०६% गुंतवणूक आहे.
प्रशांत जैन हेच आजही योजनेचे मुख्य व्यवस्थापक असून मिथेन लाठिया सह-व्यवस्थापक आहेत. किमान गुंतवणूक रु. ५,००० असून एका वर्षांच्या आत योजनेतून पसे काढून घेतल्यास गुंतवणूक मूल्याच्या १.५०% निर्गमन शुल्क आकारले जाते. योजनेचा खर्च १.८१% रास्त वाटतो. ज्यांना म्युच्युअल फंडात गुंतवणुकीस नवीन सुरवात करायची आहे, व जे अनेक वष्रे गुंतवणूक करत आहेत परंतु मनासारखा परतावा मिळालेला नाही अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांनी एक आदर्श पर्याय म्हणून याकडे पाहावे असे सुचवावेसे वाटते.
(लेखिका दुबईस्थित गुंतवणूक विश्लेषक आहेत.)
आघाडीच्या पाच कंपन्या
स्टेट बँक ९९१.८३ कोटी रु. (८.०६%)
आयसीआय. बँक ९१३.७५ कोटी रु. (७.४%)
आयटीसी ७८६.११ कोटी रु. (६.७%)
इन्फोसिस ६९७.८३ कोटी रु. (५.७%)
लार्सन अॅण्ड टुब्रो ५१५.८९ कोटी रु. (४.२%)
आम्हाला कळवा : ‘अर्थ वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेख-वृत्तांसंबंधी मत-प्रतिक्रिया पाठवा : लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१. ई-मेल : arthmanas@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा