एकोणतीस हजार पार केलेला ‘सेन्सेक्स’ व आठ हजार आठशे पार केलेला ‘निफ्टी’ या पाश्र्वभूमीवर नवीन गुंतवणूक करावी का व करायची झाल्यास कोठे करावी? हा प्रश्न पडलेल्या वाचकांनी आजच्या ‘यूटीआय अपॉच्र्युनिटीज्’ या म्युच्युअल फंडाचा गुंतवणुकीसाठी नक्कीच विचार करायला हरकत नाही. ३१ डिसेंबर २०१४ रोजी फंडाची एकूण मालमत्ता ५,२२६.९८ कोटी होती. फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ४५ कंपन्यांचे समभाग आहेत. एकूण फंडाच्या गुंतवणुकांपकी ८५ टक्के गुंतवणूक लार्ज कॅप कंपन्यां तर मिडकॅप कंपन्यांमध्ये १५ टक्के गुंतवणुकीचा समावेश आहे. जेव्हा जेव्हा बाजारात अति चढ-उतार झाले तेव्हा तेव्हा भांडवलाच्या सुरक्षिततेसाठी फंडाच्या निधी व्यवस्थापकांनी रोख्यातील गुंतवणूक १० टक्क्यांपर्यत वाढविली. या धोरणाचा सकारात्मक परिणाम, म्हणजे मे २०११ ते ऑक्टोबर २०१३ या कालावधीत संदर्भासाठी गृहित निर्देशांक ‘बीएसई १००’मध्ये २७.७९ टक्के घट झाली, तर याच कालावधीत फंडाच्या नक्त मालमत्ता मूल्यात ११.२५ टक्केच घट झाली. फंडाची गुंतवणूूक प्रामुख्याने लार्ज कॅप कंपन्यांच्या समभागात असल्याने प्रमुख निर्देशांक सार्वकालिक उच्चांकावर असताना गुंतवणूक करण्यास आदर्श ठरावा, असा हा फंड आहे. एकूण गुंतवणुकीत पहिल्या पाच गुंतवणुकांचे प्रमाण २९.८७ टक्के तर पहिल्या दहा गुंतवणुकांचे प्रमाण ४४.६६ टक्के आहे. फंडाच्या गुंतवणुकीत वर उल्लेख असलेल्या दहा पकी नऊ कंपन्या सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही अग्रणी निर्देशांकातील कंपन्या आहेत. तर युनायटेड स्पिरिटस्, आयआरबी इन्फ्रा, फेडरल बँक, परसिस्टंट सिस्टीम्स, कबरेरंडम युनिव्हर्सल या उदयोन्मुख कंपन्यांचा समावेश आहे. या कारणाने मागील पाच वर्षांच्या वार्षकि परताव्याची सरासरी २६.६७ टक्के आहे. फंडाच्या कामगिरीच्या तुलनेसाठी फंड घराण्याने ‘एस अँड पी बीएसई १००’ हा निर्देशांक निश्चित केला आहे. सध्याचे निधी व्यवस्थापक अनुप भास्कर हे जुल २०११ पासून या फंडाचे व्यवस्थापन पाहत आहेत. या काळात फंडाचा परतावा हा संदर्भ निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा सरासरी ३३.२४ टक्के अधिक आहे. प्रामुख्याने लार्ज कॅप गुंतवणुका असल्यानेच मे २०१४ नंतर बाजारात आलेल्या तेजीचा फायदा या फंडाला झाला. या फंडाची गुंतवणूक असलेल्या कंपन्यांचे सरासरी बाजारमूल्य प्रत्येकी ७,५०० कोटी आहे. या फंडात गुंतविलेला निधी एका वर्षांच्या आत काढून घेतत्यास एक टक्का निर्गमन शुल्क लागू होते. फंडाचा निधी व्यवस्थापन खर्च २.१५ टक्के आहे. वाचकांनी तीन ते पाच वर्षांसाठी गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने या फंडाचा जरूर विचार करावयास हवा.
mutualfund.arthvruttant@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2015 रोजी प्रकाशित
फंड विश्लेषण..यूटीआय अपॉच्र्युनिटीज् फंड
एकोणतीस हजार पार केलेला ‘सेन्सेक्स’ व आठ हजार आठशे पार केलेला ‘निफ्टी’ या पाश्र्वभूमीवर नवीन गुंतवणूक करावी का व करायची झाल्यास कोठे करावी?
First published on: 26-01-2015 at 01:07 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fund evaluation