गॅब्रियल इंडिया लिमिटेड ही शॉक अॅब्सॉर्बरची एक प्रमुख उत्पादक कंपनी आहे. शॉक अॅब्सॉर्बरच्या जोडीला फ्रंट फोर्क, स्ट्रट्स ही या कंपनीची प्रमुख उत्पादने आहेत. या प्रकारच्या उत्पादनांना ‘राइड कंट्रोल इक्विपमेंट’ या तांत्रिक नावाने ओळखले जाते. प्रवासी वाहने, एसयूव्ही, वाणिज्य वाहने, दुचाकी यामध्ये ही उत्पादने वापरली जातात.
या कंपनीचे पुणे, नाशिक. होसूर, देवास, गुरगाव व परवानू या ठिकाणी सहा कारखाने आहेत. पुण्यात चाकण येथील कारखाना प्रवासी वाहनांसाठी लागणारे शॉक अॅब्सॉर्बर तयार करतो तर देवास येथे टाटा मोटर्स, आयशर मोटर्स,अशोक लेलँडच्या व्यापारी वाहनांसाठी, गुरगाव येथील कारखाना गॅस भरलेले शॉक अॅब्सॉर्बर, तर नाशिक जिल्ह्यातील अंबड कारखाना दुचाकींसाठीचे शॉक अॅब्सॉर्बर तयार करतो. ही कंपनी आनंद समूहाचा एक भाग आहे. आनंद समूहात आनद ऑटोमोटीव्ह, परफेक्ट सर्कल इंडिया, व्हिक्टर गास्केट्स इंडिया यांचा समावेश होतो. या सर्व कंपन्या वाहनासाठी सुटे भाग तयार करतात. वाहनांची विक्री कमी होत असल्याचा फटका सुटय़ा भाग निर्मित्यांना बसला तसा गॅब्रियलला सुद्धा बसला. परंतु दुचाकी व एसयूव्ही प्रकारच्या वाहनांनी ही झळ थोड्याफार प्रमाणात कमी केली.
वाहन व्यवसायातील मंदीमुळे कंपनीची उत्पादन क्षमता कमी वापरली गेली. याचा परिणाम नफ्याची टक्केवारी मागील वर्षांच्या तुलनेत ६.९ टक्क्याने कमी झाली. या टक्केवारीत चालू आíथक वर्षांत दीड ते दोन टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. परिणामी चालू आíथक वर्षांत निव्वळ नफा १०-१२ टक्क्यांनी वाढणे अपेक्षित आहे. व्यापारी वाहनांच्या विक्री व स्थूल राष्ट्रीय उत्पादन यांतील संबंध सम प्रमाणात असतात. व्यापारी विक्रीने तळ गाठला असून यापेक्षा घट संभवत नसल्याची आíथक विश्लेषकांची धारणा आहे. निवडणुकांनंतर सत्तेवर येणाऱ्या नवीन सरकारची धोरणे अर्थव्यवस्थेला चालना देणारी असतील असे मानले जाते. यात प्रामुख्याने पायाभूत सुविधा, खनन व खणीकर्म, ऊर्जा निर्मिती, बांधकाम, रस्ते निर्मिती यांना प्रोत्साहन मिळणे अपेक्षित आहे. या उद्योगांचा प्रत्यक्ष लाभार्थी व्यापारी वाहनांचा उद्योग व पर्यायाने टाटा मोटर्स, आयशर मोटर्स, अशोक लेलॅड, भारत बेन्झ, वोल्वो या कंपन्या ठरण्याची शक्यता आहे. गॅब्रियल इंडिया या सर्वच कंपन्यांची पुरवठादार असल्याने या कंपन्यांची उत्पादन वाढ गॅब्रियल इंडियाच्या पथ्यावर पडेल असे मानण्यास वाव आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बाजाराची वाटचाल नक्की कशी असेल, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. परंतु खिचडी सरकार अथवा सरकारकडून निर्णय घेण्यास झालेला उशीर करणारा धोरण लकवा दिसल्यास, व्यापारी वाहन उद्योगांच्या अडचणीत भर पाडण्याची शक्यता दुर्लक्षित करून चालणार नाही.
मूल्यांकन : मागील दोन महिन्यात गॅब्रियल इंडियाच्या भावात २० टक्के सुधारणा झाली. तरीही गॅब्रियल इंडियाचा पीई मागील दोन वर्षांच्या सरासरीपेक्षा २५ टक्के खालीच आहे. सद्य किंमत २०१५-१६ च्या अपेक्षित उत्सर्जनाच्या (ईपीएस) सात पट तर २०१६-१७ च्या अपेक्षित उत्सर्जनाच्या पाच पट आहे. तरी निवडणुकानंतरचा बाजाराचा कल लक्षात घेऊन खरेदी केल्यास एका वर्षांत समभागाला ४८ रुपयांचा ढोबळ अंदाज बांधता येईल.
‘अर्थ वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध लेखांमध्ये चर्चिलेल्या समभागांमध्ये लेखकांची व्यक्तिगत गुंतवणूक अथवा अन्य स्वारस्य नाही. परंतु सदर लेखकांचा सल्ला घेणारे ग्राहक, निकटवर्तीयांची त्यात गुंतवणूक असण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा