डॉ. आशीष थत्ते
वस्तूची किंमत वाढली की त्याचा खप कमी होतो आणि किंमत कमी झाली की खप वाढतो, असा अर्थशास्त्रात अगदी साधा नियम आहे. पण नियमांना अपवाद असतात हा असाच एक अपवाद. सर रॉबर्ट गिफन यांच्या नावावर असणारा हा सिद्धांत आहे. तो पर्यायी वस्तूविषयीचा आहे. हा लेख त्याचे थोडेसे सौम्य रूपांतरण. आपण सुरुवातीला नियम बघू या मग वळू अपवादावर.
समजा आज अचानक सरकारने पेट्रोलची किंमत रात्री १२ वाजेपासून खूप वाढवली तर अर्थातच कमी किमतीचे पेट्रोल रात्री १२ वाजेपर्यंत मिळणार आहे. ते भरण्यासाठी गर्दी होईल आणि दुसऱ्या दिवशी शुकशुकाट असेल. नुकतेच रेल्वेने मुंबईमध्ये प्रथम वातानुकूलित श्रेणीच्या तिकिटाचे दर कमी केले. त्यामुळे या दोन प्रकारच्या सेवांची मागणी अचानक वाढली. म्हणजे अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे घडले.परवा एका जगप्रसिद्ध फर्निचरच्या दुकानात गेलो, तिथे एका कोपऱ्यात अगदी शेवटी जवळजवळ निम्म्या किमतीत काही फर्निचर ठेवले होते आणि गर्दी मात्र महागातील सारख्याच दिसणाऱ्या वस्तूंच्या भोवती होती. अर्थात हे स्वस्तातले फर्निचर दर्शनी भागातले, उरलेले किंवा कुणीतरी परत पाठवलेले होते. खरे तर किंमत कमी झाल्यावर त्याचा खप वाढला पाहिजे होता. मात्र खरेदीदार आपल्या पैशातून चांगली वस्तू घेण्याचा विचार करत होते. हाच असतो विरोधाभास! नियमाच्या बरोबर उलट वागणे.
रतन टाटा कसलेले उद्योगपती पण त्यांनासुद्धा कदाचित विरोधाभास समजला नाही, की नॅनो कार कधीतरी त्याचे उदाहरण बनेल. माझ्याकडे असणाऱ्या पैशांमध्ये नॅनो कार घेण्यापेक्षा काही दिवस थांबून मी अजून चांगली कार घेईन असा विचार खरेदीदीर करतात. कारण नॅनो त्यांच्या दृष्टीने गिफेन गुड्स झालेली आहे. अन्यथा इतर कार रस्त्यावर दिसल्याच नसत्या. अर्थात खरेदीदाराला वैयक्तिक आवडनिवड देखील असते. कंपन्यांपुढे खरा प्रश्न नियम किंवा अपवादाचा देखील नसतो. कारण बाजारपेठ सर्वच वस्तूंना असते आणि एकाची चांगली प्रत दुसऱ्याची गिफन असते. त्यामुळे हलक्या प्रतीच्या वस्तूंना विकण्यात प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आपल्यापैकी कितीजण कमी पैशात सेवा देतो म्हणून रस्त्यावर असलेल्या न्हाव्याकडे जाऊन दाढी करतात किंवा रस्त्यावर असलेला वडा-सांबर (वडापाव नव्हे) खातात? कधी तरी वेळेअभावी किंवा खूप अंतर असेल तर कुणीही खाईल पण पर्याय उपलब्ध असेल तर कदाचित हॉटेलमध्ये जाऊनच खातील. यात सामाजिक प्रतिष्ठा देखील महत्त्वाची भूमिका बजावते. इंदूरच्या सराफा बाजाराला अशीच प्रतिष्ठा देऊन गिफन्समधून बाहेर काढले.
नॅनो, रस्त्यावरचे न्हावी किंवा उघडय़ावरचे खाणे यांना आपली बाजारपेठ आहे, मात्र मेहनत देखील तेवढी घ्यावी लागते. ही मेहनत कमी करण्यासाठी चांगल्या वस्तूंबरोबर गिफन वस्तू विकण्याकडे कल असतो. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर घरातील गृहिणी भाजी का खरेदी करत नाहीत? कारण काही लबाड व्यापारी त्यावेळेत आपल्या कमी प्रतीच्या वस्तू हळूच खपवतात. ५० टक्के सूट अशी जाहिरात असणाऱ्याकडे किंवा ९९ रुपयात कुठलीही वस्तू घेऊन जा वगैरे ठिकाणी ग्राहक असतात पण त्यांची झुंबड उडतेच असे नाही. सर गिफन (१८३७ ते १९१०) आज असते तर कदाचित आपल्या गृहिणींनी भरपूर अजून उदाहरणे त्यांना दिली असती ! या महान हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला सलाम.
गिफनचा विरोधाभास
सर रॉबर्ट गिफन (१८३७ ते १९१०)
गिफन वस्तू ही संकल्पना वस्तूच्या भौतिक गुणवत्तेपेक्षा उत्पन्नाशी निगडित आहे. उदा. बाजारात पाव स्वस्त झाल्यावर गरीब लोक त्याची मागणी वाढवण्याऐवजी कमी करून वाचणारा पैसा दुसऱ्या पर्यायी वस्तूंवर (उदा. केक इत्यादी) खर्च करतात. गिफन वस्तू या संकल्पनेत एखाद्या वस्तूची किंमत घटल्यास उपभोक्ता त्या वस्तूच्या मागणीत वाढ करण्याऐवजी घट करतो; याउलट, त्या वस्तूची किंमत वाढल्यास मागणीत घट करण्याऐवजी वाढ करतो, यालाच गिफनचा विरोधाभास असे म्हणतात. उदा., केकच्या तुलनेत ब्रेड; गव्हाच्या तुलनेत ज्वारी व बाजरी; शुद्ध तुपाच्या तुलनेत वनस्पती तूप; नामांकित कपडय़ांच्या तुलनेत जाडेभरडे कपडे; नामांकित चप्पल, बूट यांच्या तुलनेत साध्या चप्पल, बूट; शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या तुलनेत बेन्टेक्सचे दागिने इत्यादी.
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत / ashishpthatte@gmail. Com / @AshishThatte