ऑगस्ट महिन्यात नोमुरा ग्लोबल फायनान्शियल प्रॉडक्ट्स या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सल्लागार कंपनीचे समभाग संशोधक व विश्लेषक ‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’साठी अतिथी विश्लेषकाच्या भूमिकेत असणार आहेत. आजच्या एशियन पेंट्स या कंपनीचे समभाग विश्लेषक आहेत- मनीष जैन व अनुप सुधेन्द्रनाथ.
गोदरेज उद्योग समूहाचा भाग असलेली, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टस् ही कंपनी ग्राहक उपयोगी वस्तू (एफएमसीजी) तयार करण्याच्या व या उत्पादनांच्या विपणनाच्या व्यवसायात आहे. कंपनीच्या सिंथॉल, नुपूर, हिट, गुड नाईट, सॉॅफ्ट अँड जंटल या परिचित नाममुद्रा आहेत. कंपनीने आपला व्यवसाय हेअर केयर (केश संवर्धन), होम केयर (गृह निगा) पर्सनल केयर (वैयक्तिक वापरासाठी) व आंतरराष्ट्रीय व्यवसाय या चार गटात विभागला आहे.
कंपनीचे चालू आíथक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल उत्साहवर्धक नाहीत. वाढती महागाई आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ, उत्पादनांच्या कमाल विक्री किंमत (एमआरपी) वाढविण्यावर स्पध्रेमुळे असलेली मर्यादा यामुळे कंपनीची नफाक्षमता कमी झाली. पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर गोदरेज कंझ्युमरच्या व्यवस्थापनाला आम्ही भेटलो.
या तिमाहीची विक्री मागील वर्षांच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत १२.३ टक्क्याने वाढली. विक्रीच्या एकूण वाढीत आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा १७ टक्के हिस्सा आहे. या वाढीस प्रामुख्याने गेल्या वर्षभरात रुपयाचे अवमूल्यन हे कारण आहे. भारतातील व्यवसायात १२ टक्के वाढ दिसून आली. या तिमाहीत मागील आíथक वर्षांच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत नफा क्षमता २ टक्क्याने घसरली, तर करपश्चात नफ्यात १३.४ टक्के घट झाली. देशांतर्गत व्यवसायवृद्धीत केसाचे रंग (१६ टक्के) व घरगुती कीटकनाशके (१७ टक्के) यांचा मोठा हिस्सा आहे; परंतु आंघोळीचे साबण व घरगुती स्वच्छतेची उत्पादने यांची विक्री अनुक्रमे १ टक्के व ४ टक्क्याने घसरली. आंतरराष्ट्रीय व्यवसायात लॅटीन अमेरिका व इंडोनेशिया या देशांतील उप कंपन्यांच्या विक्रीत लक्षात घ्यावी इतकी वाढ झाली आहे.
गोदरेज कंझ्युमरच्या वैयक्तिक वापराच्या उत्पादनांच्या गटात साबणाचा हिस्सा ३ टक्के आहे. त्यात सिंथॉल, गोदरेज नंबर वन या प्रमुख नाममुद्रा आहेत. वर्षभरापूर्वी दोन आकडय़ात वाढ दर्शविणारी साबणांची विक्री व साबण वडय़ा (volume growth) दोन्हीत अनुक्रमे ६ व २ टक्के वाढ झाली. गेल्या आíथक वर्षांच्या चौथ्या तिमाहीत साबणांच्या किंमतीत सरासरी २.५ टक्के वाढ करूनही पहिल्या तिमाहीत विक्रीत घसरण झाली. प्रिमियम दर्जाच्या साबण गटात (क्युटीक्यूरा व सॉफ्ट अँड जंटल) गोदरेज कंझ्युमरला आपल्या जवळच्या स्पर्धकांच्या उत्पादनांकडून होणाऱ्या तीव्र स्पध्रेला तोंड द्यावे लागते. या स्पध्रेत टिकून राहण्यासाठी कंपनीने मोठय़ा विपणन कार्यक्रमाचे (सेल्स ड्राईव्ह) आयोजन केले होते. यात विक्रेत्यांना कंपनीची उत्पादने दर्शनी भागात आकर्षक मांडणी करणे आदी गोष्टींचा समावेश होता. कंपनीच्या व्यवस्थापनाच्या मते गेल्या वर्षी उत्तम पाऊस झाला; परंतु या वर्षी पावसाची चिंता सर्वांप्रमाणेच कंपनीलाही आहे. म्हणून  ग्रामीण भारतातील विक्री घसरली; परंतु जुल, ऑगस्ट महिन्यात झालेल्या सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाने व आगामी गणेशोत्सव ते दिवाळी या सणासुदीच्या काळातील विक्री वाढीची आम्हाला अपेक्षा आहे.
नफाक्षमता घसरण्यास प्रामुख्याने जाहिरात व विपणन खर्चात झालेली वाढ करणीभूत आहे. परंतु कंपनीला भविष्यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व विक्री स्थिरावण्यासाठी जाहिरातींवरील खर्चच मदत करेल, असे वाटते. कंपनी खर्च वाचविण्याकरिता गेले वर्षभर करत असलेल्या उपायांचा परिणाम म्हणून या तिमाहीत खेळत्या भांडवलाच्या खर्चात कपात दिसून आली. याचा परिणाम कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या आवर्तनात घट होऊन ४४ दिवसांवरून २६ दिवसांवर आले. यामुळे भांडवलावरील परताव्यात वाढ दिसून ती २१ टक्क्यांवरून २३ टक्के झाली.
साबण व ग्राहकोपयोगी वस्तू हे गोदरेजसाठी चिंतेचे विषय जरूर आहेत. परंतु कंपनीने काही उत्पादने नवीन वेष्टनात आणली आहेत. गोदरेज फास्ट कार्डसारखी कीटकनाशके पहिल्यांदाच भारतात उपलब्ध झाली आहेत. सर्वच उत्पादनांचा विचार केल्यास पुढील दोन – तिमाहीत दखल घ्यावी इतकी विक्री वाढेल असे नाही. किंबहुना विक्रीतील घसरण चालू तिमाहीत सुरू राहण्याचीच शक्यता अधिक वाटते. तरी केसांचे रंग व घरगुती वापरासाठी असलेली कीटकनाशके यांच्यात अनुक्रमे १२ व १६ टक्के वाढ दिसून येईल. भांडवलाची कार्यक्षमता वाढल्यामुळे चालू तिमाहीत नफ्यात फार घसरण होईल असे वाटत नाही. म्हणून आम्हाला गोदरेज कंन्झ्युमरची संधी मिळेल तेव्हा विकत घ्या (Accumulate) अशी शिफारस करावीशी वाटते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा