गृह फायनान्स म्हणजे पूर्वाश्रमीची गुजरात रूरल हाऊसिंग फायनान्स. नावाप्रमाणेच कंपनीचा मूळ उद्देश गावात किंवा छोट्या शहरातील घर बांधणीसाठी वित्त पुरवठा करणे असा आहे. १९८६ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचा जुलै 200 मध्ये एचडीएफसी या गृहवित्त क्षेत्रातील नामांकित कंपनीने ताबा घेतला आणि त्यामुळे आता गृह फायनान्स ही एचडीएफसीची उपकंपनी आहे. गेली काही वष्रे केंद्र तसेच राज्य सरकारकडून छोट्या शहरांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत आहेत. केंद्राच्या अर्थसंकल्पातूनही गेली तीन वष्रे लहान घरांसाठी विशेष योजना जाहीर केल्या जात आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पानेही त्याचा पुनरुच्चार केला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेनेही पायाभूत सुविधा आणि परवडणाऱ्या घरांसंबंधींचे नियम शिथिल केले असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम शेअरवर होईल. उत्तम प्रवर्तक, कामगिरीतील सातत्य आणि अनुकूल वातावरण यामुळे गृह फायनान्सची खरेदी योग्य वाटते. खरं तर या सदरातून हा शेअर आधीही सुचविला गेला आहे. मात्र ज्या गुंतवणूकदार वाचकांची संधी हुकली असेल त्यांना खरेदीचा हा एक चांगला मौका आहे. किंमत उत्पन्न गुणोत्तर (पी/ई) पाहता सध्याच्या किमतीला हा शेअर थोडा महाग वाटण्याची शक्यता आहे. मात्र येणाऱ्या दोन वर्षांच्या काळात ही एक उत्तम गुंतवणूक शाबीत होईल, असा विश्वास वाटतो.  या बरोबरच जीआयसी हाऊसिंग आणि कॅनबँक हाऊसिंगचा देखील विचार आपण करू शकता.

Story img Loader