केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) परिषदेच्या ५० व्या बैठकीत चित्रपटगृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच काही जीवरक्षक औषधांच्या आयातीवरील करात सूट देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.
‘लाइव्ह मिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटगृहामध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरील कर १८ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रेक्षकांच्या खिशावरील भार कमी होणार आहे.
नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना पश्चिम बंगालचे अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी सांगितलं की, जीएसटी परिषदेने कर्करोगावरील औषध डिनुटक्सिमॅब (Dinutuximab) आणि इतर दुर्मिळ आजारांच्या उपचारात वापरल्या जाणार्या ‘फूड फॉर स्पेशल मेडिकल पर्पज’ (FSMP) च्या आयातीवर जीएसटीमध्ये सूट देण्यास मान्यता दिली आहे. तसेच ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो (जुगाराचा प्रकार) आणि घोड्यांच्या शर्यतींवर २८ टक्के कर लावण्यासही परिषदेनं सहमती दर्शवली आहे, असंही त्यांनी सांगितलं.