आजच्या सदरात पुणे-नगर रस्त्यावर असलेल्या पुण्यातील चंदन नगर भागात राहणाऱ्या अडसूळ कुटुंबियांचे आíथक नियोजन जाणून घेणार आहोत. स्वप्नील यांनी या सदरातून आपले आíथक नियोजन जाणून घेण्यासाठी ई-मेलद्वारे कळविले. आíथक नियोजन करण्यास आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी या मेलमध्ये त्यांनी विस्तृतपणे लिहिल्या होत्या. त्यांनी स्वत: व त्यांच्या पत्नी प्रतिभा या दोघांनीही अभियांत्रिकी शिक्षण घेतले आहे. स्वप्नील व प्रतिभा यांचे वय अनुक्रमे २८ व २७ वष्रे आहे. स्वप्नील हे पुण्याजवळील रांजणगाव येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत तर प्रतिभा पुण्यातच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत नोकरी करतात. स्वप्नील यांचे वडील हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत व त्यांना निवृत्ती वेतन मिळते. त्यांच्या आई गृहिणी आहेत.
एका वर्षांपूर्वी स्वप्नील व प्रतिभा यांनी स्वमालकीची सदनिका घेतली असून त्यासाठी दोघांनी संयुक्त नावावर १५ वर्ष मुदतीचे कर्ज एलआयसी हौसिंग फायनान्सकडून घेतले आहे. यापकी एक वर्ष कर्ज फेड झाली असून अजून १४ वर्ष कर्जफेड करायची आहे. ही कर्जफेड उभयतांच्या बँक खात्यातून स्वतंत्ररित्या होत असते. स्वप्नील यांनी १५ लाख रुपयांचे विम्याचे छत्र घेतले आहे. हे छत्र त्यांच्या वयाच्या पस्तीशीपर्यंत मिळणार आहे. प्रतिभा यांनी कुठलेही विमाछत्र घेतलेले नाही. स्वप्नील यांनी ‘लोकसत्ता-अर्थवृत्तान्त’मधील शिफारसी वाचून काही शेअर्समध्ये गुंतवणूक केली असून त्याचे आज बाजार मूल्य ३०,००० रुपये आहे. आता स्वत:चे घर झाल्यामुळे त्यांचा पुढील एखाद्या वर्षांत पहिले अपत्य होऊ देण्याचा विचार आहे.
* स्वप्नील व प्रतिभा यांना सल्ला:
स्वप्नील हे मिळवते झाल्यावर त्यांना बचतीची सवय असावी या विचाराने त्यांच्या वडिलांनी एलआयसीच्या काही योजना त्यांच्यासाठी विकत घेतल्या. परंतु या योजना स्वप्नील यांची गरज लक्षात न घेता विमा सल्लागाराला सोयीच्या म्हणून विकल्या गेल्या आहेत, असे दिसून येते. ज्या योजना विमा विक्रेत्याला नफा मिळवून देणाऱ्या होत्या अशाच योजना विक्रेते विकत असतात. सध्याचे विमा छत्र पुरेसे नाही तसेच त्याचा विशेष उपयोग आहे असेही वाटत नाही. कुठल्याही कुटुंबातील मिळवित्या व् यक्तीस खरी जोखीम वय वष्रे ३५ ते ५५ या वीस वर्षांत उचलायची असते. मुलांचे शिक्षण चालू असते व ती कमावती होण्यास अवधी असतो. हल्ली एखाद्या मुलाचे शिक्षण पूर्ण होण्यास त्याच्या वयाचे तेवीस-चोविसावे वर्ष उजाडते. म्हणून आपल्या मुलाच्या (अथवा दोन असतील तर लहान मुलाच्या) पंचविसाव्या वर्षांपर्यंत पुरेसे विमा छत्र हवे.
स्वप्नील व प्रतिभा यांचे गृहकर्ज तरल म्हणजे फ्लोटिंग व्याजदरावर आधारीत आहे. सध्या चढे व्याजदर असल्यामुळे त्यांच्या गृहकर्जाचा व्याजदर वरच्या स्तरावरच आहे. सध्या अडसूळ कुटुंबाची बचत दरमहा साधारण ४० हजार रुपये आहे. घर नवीन असल्यामुळे त्यांना गृह सजावट करायची आहे, असे स्वप्नील यांनी सांगितले. त्यांना असा सल्ला द्यावासा वाटतो की त्यांनी गृहकर्जाचा हप्ता सध्याच्या ३५ हजारावरून ५० हजार करावा. त्यामुळे गृहकर्जाचा कालावधी १० वर्षांत संपून जाईल. जर स्वप्नील व प्रतिभा यांचा वैयक्तिकरित्या विचार केल्यास साधारण प्रत्येकी वीस लाखाचे कर्ज दोघांना फेडायचे आहे. म्हणून दोघांनाही प्रत्येकी निदान ७५ लाखांचे विमा छत्र हवे.
या सदरातून मागील सोमवारी प्रसिद्ध झालेल्या देसाई कुटुंबाला जो सल्ला दिला तोच तुम्हालाही देत आहे. एखाद्या स्त्रीचा विमा हप्ता ठरताना त्या स्त्रीचे भूतकाळातील शारीरिक आजारपण विचारात घेतले जाते. त्यात आधी गरोदरपण आले असल्यास बाळंतपणातील शस्त्रक्रिया, मुदतपूर्व प्रसूती, स्त्रीचे वय या गोष्टीवर ठरत असतो. म्हणून प्रतिभा यांना या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागलेला नाही त्यामुळे त्या एक ‘जोखीम कमी असलेली विमाधारक’ या प्रकारात मोडतात. म्हणून ७५ लाखाचे व तीस वष्रे मुदतीचा विमा (टर्म इन्श्युरन्स) आजच घेऊन टाका. त्यात बिलकुल चालढकल नको. स्वप्नील यांनी सुद्धा शक्य तितक्या लवकर हाच विमा घ्यावा.
* अन्य गुंतवणूक पर्याय
आपण दोघेही खाजगी नोकरीत आहात. म्हणून तुम्हाला राष्ट्रीय पेन्शन योजनेत दरमहा प्रत्येकी एक हजार रुपये गुंतविण्याचा सल्ला द्यावासा वाटतो. भविष्यात ही रक्कम वाढवू तुम्ही शकता. ही गुंतवणूक दीर्घकालीन असल्यामुळे ‘ई क्लास’ हा पर्याय निवडावा. या पर्यायात गुंतवणूक ही निर्देशांकानुसार किंवा इंडेक्स फंडानुसार गुंतविली जाते. (राष्ट्रीय पेन्शन योजनेवर या स्तंभातून भविष्यात सविस्तर लिहिणार आहे, तेव्हा या योजनेबद्दल अधिक जाणून घेता येईल.) एसबीआय पेन्शन फंड, एलआयसी पेन्शन फंड किंवा यूटीआय पेन्शन फंड यापकी एकाची निवड करा.
आज अनेक विमा विक्रेते स्वत:ला ‘फायनान्शियल प्लॅनर’ म्हणून मिरवून घेतात. ग्राहकाच्या गरजेपेक्षा एखाद्या योजनेच्या विक्रीतून मिळणारा नफा, यावरून कोणती योजना ग्राहकाच्या गळ्यात मारायची हे विक्रेते ठरवत असतात. त्यांना एखाद्या ग्राहकाच्या गरजेशी काहीही घेणेदेणे नसते. ‘लोकसत्ते’चे वाचक व गोंदिया येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असलेले डॉ. अभिजित देशपांडे, यांचे एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते. ते म्हणतात, ‘‘एलआयसी आपल्या अनेक योजनांची जाहिरात करीत असते, परंतु एलआयसीच्या टर्म प्लान किंवा पेन्शन प्लानची जाहिरात तुम्ही कुठे पाहिलीत का? एलआयसी आपल्या या योजनांची का जाहिरात करत नाही?’’ डॉ. देशपांडे यांच्या प्रश्नाचे उत्तर वाचकांनी सुद्धा शोधण्याचा जरूर प्रयत्न केला तर स्वप्नील यांच्या आजपर्यंतच्या विमा योजनेतील निवडीमागे डॉ. देशपांडे यांच्या प्रश्नार्थक निरीक्षण दडलेले आहे. सर्वच वाचकांना शेवटी स्वप्नील व प्रतिभा यांच्या आíथक नियोजनाच्या निमित्ताने एक सल्ला द्यावासा वाटतो की, कोणीही एलआयसी प्रतिनिधी तुम्हाला ‘राष्ट्रीय पेन्शन योजना’ विकत घ्या असा सल्ला देणार नाही. कारण या योजनेत विक्रेत्याला मिळणारे कमिशन अत्यल्प असल्यामुळे ही योजना विक्रेत्याला धार्जणिी नाही. आíथक नियोजन नि:शुल्क म्हणून एखाद्या विमा विक्रेत्याकडून करून घ्यायचे व त्याला आपण भरलेल्या हप्त्यातून मोठे कमिशन द्यायचे (किती ते आपल्याला कधीच कळत नाही) की त्रयस्त व्यक्तीकडून योग्य ते शुल्क देऊन (ज्यात पारदर्शकता असते) आपले आíथक नियोजन करून आपल्या गरजेची पूर्ती करणाऱ्या विमा योजना घ्यायचा हे वाचकांनी ठरविले तरी ते अर्थसाक्षरतेची पहिली परीक्षा उत्तीर्ण झाले असे म्हणता येईल.
सल्ला
* सध्याचे विमा छत्र पुढील सात वर्षांसाठी आहे. अर्थातच अपुरे आहे.
* तुम्हाला तुमच्या वयाच्या साठाव्या वर्षांपर्यंत विमा छत्राची गरज आहे.
* दोघांनीही प्रत्येकी ७५ लाखाचे तीस वष्रे मुदतीचे विमा छत्र घ्यावे.
* कर्जाचा हप्ता वाढवून लवकर कर्जफेड करावी.
* केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेत खाते उघडा.
* तुमची गुंतवणूकयोग्य रक्कम भविष्यात वाढत जाणार आहे. म्हणून आíथक नियोजकाचा सल्ला घ्या.