पोर्टफोलियो कसा तयार करावा, याबद्दल अनेक सुरस टिप्स मिळाल्या होत्या; मात्र परवा मला एक नवीनच महिती मिळाली. अमेरिकेत एका हुशार माणसाने काही माकडांना डार्ट मारण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्याने सर्व महत्त्वाचे शेअर्स एका फळ्यावर लिहून काढले आणि माकडांना डार्ट मारायला लावले. त्या निवडक शेअर्सचा पोर्टफोलियो त्याने तयार केला. गंमत म्हणजे तज्ज्ञाने केलेल्या पोर्टफोलियोचा आणि माकडांनी तयार केलेला पोर्टफोलियो यांच्या परताव्यात काहीच फरक नव्हता. ही गोष्ट सांगायचे कारण म्हणजे सध्याचे वातावरण हे काहीसे असेच आहे. आशा वातावरणात मंकी पोर्टफोलियोसुद्धा चांगला फायदा देऊ शकतो.
सुज्ञ गुंतवणूकदारांनी मात्र स्वत: अभ्यास करून निवडक शेअर्समध्येच गुंतवणूक करावी.
चार वर्षांपूर्वी गुजरात पिपावाव पोर्ट लिमिटेड या कंपनीचा पब्लिक इश्यू आला होता. भारतातील पहिले खाजगी बंदर (पोर्ट) म्हणून त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला होता. पहिल्या वर्षी नुकसान सहन केल्यानंतर कंपनीने गेली तीन वर्षे प्रगती करून नफा कमावला आहे. या नफ्याचा विनियोगही कर्ज फेडण्यासाठी केल्यामुळे डेट इक्विटी गुणोत्तर कमी होऊन कंपनीचा व्याज खर्च कमी झाला आहे.
६३ देशांत ६० टर्मिनल्स असलेली ही जगातील सर्वात मोठी कंटेनर टर्मिनल ऑपरेटर कंपनी आहे. मार्च २०१४ साठी कंपनीचे आíथक निकाल जाहीर झाले असून कंपनीने नक्त नफ्यात ७३% वाढ होऊन तो ६३ कोटी रुपयांवर गेला आहे. गुजरात मेरिटाइम बोर्डाकडून ३० वर्षे सवलत मिळवणाऱ्या या कंपनीकडे १,५६१ एकर जमीन विकसित करण्याचे हक्क आहेत.
सध्या शेअरच्या भावामध्ये बऱ्यापकी वाढ झाली असली तरीही प्रत्येक पडझडीला हा शेअर खरेदी करावा. नवीन सरकारच्या कालावधीत दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा शेअर आकर्षक वाटतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat pipavav port limited