जुल महिन्याच्या अतिथी विश्लेषक श्रेया मुझुमदार या सनदी लेखापाल असून समभाग संशोधनाचा त्यांचा आठ वर्षांचा अनुभव आहे. सध्या त्या ‘ब्ल्यू हेवन कॅपिटल’ या दलाल पेढीत ‘मिड-कॅप’ विश्लेषक आहेत. गुरुवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पातील लाभार्थी कंपन्या त्या या महिन्यात सुचवीत आहेत.
गुजरात पिपावाव पोर्ट लिमिटेड (पिपावाव) ही कंपनी खाजगी क्षेत्रातील स्वत:च्या मालकीचे बंदर असलेली कंपनी आहे. पिपावाव बंदर हे गुजरात राज्याच्या भावनगर जिल्ह्य़ातील पिपावाव येथे आहे. हा भाग खंबावतच्या आखाताचे प्रवेशद्वार समजले जाते. खंबावतचे आखात हे भारतात प्रवेश करणाऱ्या व्यापारी जहाजांसाठी एक प्रमुख बंदर आहे. या बंदरातून प्रामुख्याने उत्तर भारतातील राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांतील आयात-निर्यात या बंदरातून होते. भारतातील एकूण माल हाताळणीच्या ६० टक्के वाहतूक या चार राज्यांतील असते. तसेच हा भाग मध्य आशिया, आफ्रिका, युरोप व अमेरिकेच्या मार्गावरील व्यापारी जहाजांसाठी महत्त्वाचा थांबा समजला जातो. या नसíगकतेमुळे भारतातील २० टक्के माल वाहतूक व ४० टक्केऔद्योगिक उत्पादनांची निर्यात या बंदरातून होते.
एपीएम टर्मिनल ही कंपनी पिपावावचे परिचलन करते. ‘एपी मोलर मर्क्स’ ही जगातील सर्वात मोठी कंटेनर हाताळणारी कंपनी असून १५४ देशांतून ५६ बंदरांचे परिचलन करते. जगातील सर्वात मोठी कंपनी असल्याने सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान, अवजारे वापरते. सध्या ही कंपनी भारतामध्ये पिपावावसह जवाहरलाल नेहरू (न्हाव्हा शेव्हा) बंदराचे परिचलन करते. या बंदरातून कंटेनर माल हाताळणीव्यतिरिक्त घनरूप (वेगवेगळी खनिजे) द्रवरूप (नाफ्ता, कच्चे तेल) व वायुरूप (एलपीजी व एलएनजी) यांची हाताळणी होते. २०१० मध्ये ही कंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध झाली. न्यूयॉर्क लाइफ इंटरनॅशनल फंड, आयडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर फंड, इन्फ्रास्ट्रक्चर फंड ऑफ इंडिया, आयएल अॅन्ड एफएस ट्रस्ट कंपनी, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ऑफशोअर फंड, इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फंड, आयडीबीआय या फंडांनी या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे.
एखाद्या बंदरासाठी जी नसर्गिक भौगोलिकता लागते ती पिपावाव बंदराला पुरेपूर लाभली आहे. पिपावाव बंदरासमोर शिआल व सवाई ही दोन बेटे असल्यामुळे हे बंदर बारमाही बंदर म्हणून वापरता येते. माल हाताळणारा धक्का १४.५ मीटर, बल्क (खनिज) हाताळणारा १३.५ मीटर तर द्रवरूप पदार्थ हाताळणारा ११.५ मीटर रुंदीचे आहेत. या सर्व धक्क्यांची खोली १४.५ मीटर आहे. यामुळे १,००,००० डेडवेट असलेली किंवा ६,००० टन मालवाहतुकीची क्षमता असलेली जहाजे थेट धक्क्याला उभी राहू शकतात. पिपावाव बंदराला तीन किमीचा किनारा लाभला आहे. यापकी सध्या एक किमीचा किनारा वापरला असून आवश्यकता भासेल तेव्हा अजून धक्के बांधण्याची सोय बंदरात आहे. पिपावाव बंदराच्या गुजरात मॅरिटाइम बोर्डाबरोबर असलेल्या ३० वर्षे कराराची मुदत सप्टेंबर २०२८ पर्यंत आहे.
एखादे बंदर यशस्वी होण्यात ते बंदर रेल्वे व रस्त्याने जोडणे जाणे महत्त्वाचे असते. सुरेंद्रनगर हे गुजरात राज्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे. या जंक्शनपासून पिपावाव बंदरापर्यंत २६९ किमीची केवळ बंदरासाठी वापरली जाणारी रेल्वे मार्गिका असून बंदराजवळ मालगाडय़ा थांबण्यासाठी २२ मार्गिका आहेत. सुरेंद्रनगरपासून पिपावाव बंदरापर्यंतची रेल्वे यंत्रणा पिपावाव रेल्वे कॉर्पोरेशन या कंपनीच्या मालकीची असून पिपावाव बंदराची या रेल्वे कंपनीत ३८.८ टक्के मालकी आहे. या रेल्वे मार्गावर भारतात ‘डबल डेकर’ माल वाहतूक करण्याची व रोज २२ मालगाडय़ा हाताळण्याची सोय आहे. पिपावाव बंदर ‘मुंबई-दिल्ली डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मेहसाणा व अहमदाबाद या दोन ठिकाणी जोडले जाणार आहे. तसेच मुंबई व दिल्ली जोडणाऱ्या राष्ट्रीय मार्ग क्रमांक ८ ला बंदर जोडणारा चार पदरी एक्स्प्रेस हायवे आधीच तयार असून हा रस्ता १० पदरी विस्ताराण्याचे काम सुरू आहे. उत्तरेकडील राज्यांना माल पाठविण्यासाठी जवाहरलाल पोर्ट ट्रस्ट, मुंबईपेक्षा पिपावाव बंदरापर्यंतचे अंतर २५० ते ३०० किमीने कमी आहे. तसेच जवाहरलाल पोर्ट ट्रस्ट येथे होणारी वाहतुकीची कोंडी व त्यामुळे एक- दोन दिवस वाया जाणे यासाठी पिपावाव बंदरातून माल पाठविण्यास निर्यातदारांचे प्राधान्य असते.
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील बंदरातून हाताळल्या जाणाऱ्या कंटेनर कार्गो प्रकारात आíथक वर्ष २०१३-१४ मध्ये १५ टक्केवाढ झाली आहे. तर पिपावाव बंदरातून कंटेनर कार्गो हाताळणीत २१ टक्के वाढ झाली आहे. पिपावाव बंदराचे प्रमुख स्पर्धक असलेल्या जेएनपीटी व बीपीटी (बॉम्बे पोर्ट ट्रस्ट) यांच्या कार्गो हाताळणीत अनुक्रमे ६.५ व ४.५ टक्केवाढ झाली आहे. २०१४ ते २०१६ या काळात पिपावाव बंदरातून कंटेनर कार्गो हाताळणी १२ टक्केदराने वाढणे अपेक्षित आहे.
भारताच्या आयात-निर्यातीत पिपावाव बंदराचा हिस्सा मागील तीन वर्षांपासून सतत चढा राहिला आहे. मागील आíथक वर्षांत पश्चिम किनारपट्टीवरून होणाऱ्या आयात-निर्यातीत पिपावाव बंदराचा वाटा ८.६ टक्केतर संपूर्ण भारतातून होणाऱ्या आयात-निर्यातीतील वाटा ५.६ टक्के होता. १६ ऑगस्ट २०१३ पासून पिपावाव बंदराने माल हाताळणी दरात (बल्क, कार्गो व द्रवरूप) वाढ केली आहे. या वाढीचा संपूर्ण वर्षांचा परिणाम सद्य आíथक वर्षांत दिसेल. एजीस लिमिटेड, गल्फ पेट्रोलियम कॉर्पोरेशनसारख्या ग्राहकांनी उभारलेल्या टॅन्कफार्मची उभारणी पूर्ण झाली आहे. सप्टेंबर २०१४ पासून या टॅन्कफार्ममधून साठवण सुरू होऊन द्रवरूप मालाची हाताळणी सुरू होईल. या सुविधेमुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरून होणाऱ्या द्रवरूप आयात-निर्यातीपकी २७ ते ३० टक्केहाताळणी पिपावाव बंदरातून होईल. पिपावावचे गुजरातमधील स्पर्धक मुंद्रा पोर्ट अॅन्ड एसईझेड व हजिरा पोर्ट या दोन बंदरांनी आíथक मंदीमुळे आपली माल हाताळणी यंत्रणेची क्षमतावाढ पुढे ढकलली आहे. आधीच्या योजनेनुसार मुंद्रा बंदराची यंत्रणा (पाचवा धक्का) सप्टेंबर २०१४ तर हजिरा बंदराची यंत्रणा (तिसऱ्या धक्क्याचा विस्तार) डिसेंबर २०१४ पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित होते. साहजिकच या बंदरातून अपेक्षित असलेली अधिकची माल वाहतूक पिपावाव बंदरातून होईल. हे विश्लेषण लिहीत असतानाच पिपावावचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. परिचालित नफ्यात (व्याज, घसारा व करपूर्व) नफ्यात ८० टक्के वाढ झाली तर करपश्चात नफ्यात पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ३२ टक्के वाढ होऊन रु. ८० कोटींवर पोहोचला आहे.
‘अर्थ वृत्तान्त’मध्ये प्रसिद्ध लेखांमध्ये चर्चिलेल्या, शिफारस केलेल्या योजना/समभागांमध्ये लेखकांची व्यक्तिगत गुंतवणूक अथवा अन्य स्वारस्य नाही. परंतु सदर लेखकांचा सल्ला घेणारे ग्राहक, निकटवर्तीयांची त्यात गुंतवणूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तात्पर्य, गुंतवणुकीपूर्वी वाचकांचा तज्ज्ञ सल्लागाराशी परामर्श उपयुक्त ठरेल.
गलबतांचा तांडा अन् बंदराची ऐट काही औरच..
गुजरात पिपावाव पोर्ट लिमिटेड (पिपावाव) ही कंपनी खाजगी क्षेत्रातील स्वत:च्या मालकीचे बंदर असलेली कंपनी आहे.
First published on: 28-07-2014 at 06:39 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujrat pipavav port ltd