धरीत्रीच्या कुशीमधीं बीयबियानं निजलीं
वऱ्हे पसरली माती जशी शाल पांघरली
बीय टरारे भुईत सर्वे कोंब आले वऱ्हे
गरलं शेत जसं अंगावरतीं शहारे
ऊन वाऱ्याशीं खेयतां एका एका कोंबांतून
पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन
टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनीं
जसे करती कारोन्या होऊं दे रे आबादानी
दिसामासा व्हये वाढ रोप झाली आतां मोठी
आला पिकाले बहार झाली शेतामधी दाटी
कसे वाऱ्यानं डोलती दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी देव अजब गारोडी!
– बहिणाबाई चौधरी
थोरांचे बोल पुढे म्हणी होऊन जातात. ‘आधी हाताला चटके, तवा मियते भाकर’ ही म्हण मराठीला देणाऱ्या जेष्ठ कवयत्री बहिणाबाई चौधरी (१८८० ते ३ डिसेंबर १९५२) यांचा आज स्मृतिदिन. आजचा हा दिनविशेष आणि बी बियाणाचे उत्पादन करणारी आजची कंपनी यांना सांधणारा दुवा म्हणजे ही कविता.
एखादे सूत्र घेऊन त्या सूत्राभोवती लेख त्या महिन्यात आकाराला येत असतात. डिसेंबर महिन्याचे सूत्र आहे, मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्या ज्या काळाच्या ओघात लार्जकॅप होतील. या कंपन्या लहान असल्यामुळे ‘High Risk, High Return’ या प्रकारात मोडतात. म्हणून या चार कंपन्या मिळून एकूण गुंतवणुकीच्या १२% पेक्षा जास्त गुंतवणूक असू नये. यातील पहिली कंपनी कावेरी सीड कंपनीचा परिचय आजच्या भागात करून घेऊ.
१९७६ मध्ये जीव्हीबी राव आणि कं. या नावाने या कंपनीने व्यवसायास प्रारंभ केला. १९८६ मध्ये नाव बदलून सध्याचे नाव घेतले. कंपनी बी-बियाणे, खते व शेतातील मातीचा दर्जा वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वनस्पती खाद्याच्या व्यवसायात आहे. कंपनी मका, कापूस, ज्वारी, बाजरी, सुर्यफूल, तांदूळ या धान्याच्या व टाँमेटो, भेंडी, मिरची, किलगड या फळांसाठी संकरीत बियाणे तयार करते. कंपनीने भारतीय वातावरणात प्रति एकरी सर्वात जास्त उत्पादन देणाऱ्या मक्याच्या जातीची निर्मिती केली आहे. या बियाणाला दक्षिण भारतामध्ये भरघोस यश मिळाल्यावर कंपनीने असेच तांदूळ व ज्वारीचे बियाणे बनवले.
आज ही कंपनी जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. सप्टेंबर २००७ मध्ये प्रत्येकी रु. १७० या दराने प्राथमिक विक्री करून शेअर बाजारात तिने पदार्पण केले. २५० एकर क्षेत्रावर नवीन बियाण्यांवर संशोधन व विकास चालू आहे. अत्याधुनिक बियाणे वर्गीकरण व बियाणांची प्रतवारी निश्चित करणारी प्रयोगशाळा असून या प्रयोगशाळा व संशोधन विकास प्रकल्पास केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याची मान्यता आहे. (याचा परिणाम आयकर दायित्वाशी आहे.) भारत हा शेतीप्रधान देश असून वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवठ्याचा प्रश्न अजून पूर्णपणे सुटलेला नाही. त्यासाठी आपले कृषीमंत्री भारतात शेतीची उत्पादकता वाढविण्याची नितांत गरज असल्याचे आवर्जून सांगत असतात. कुठलीही शेती बी-बियाणे, पाणी, व खते यावर अवलंबून असते. बियाणे दोन प्रकारचे असते. पहिला प्रकार म्हणजे पारंपारिक जे शेतीच्या उत्पादनातून आलेल्या पिकातून पुढील मोसमासाठी वापरता येते. दुसरे संकरीत बियाणे जे खास प्रक्रिया करून कारखान्यात तयार केले जाते आणि दरवर्षी नवीन विकत घ्यावे लागते. तयार झालेल्या पिकातले पुन्हा वापरता येत नाही. किंमत जास्त असली तरी याची उत्पादकताही जास्त असते. तीन ते पाच वर्ष याच बियाणाने उत्पादन घेतले तर ते महाग ठरत नाही. हे बियाणे वापरल्यावर दर एकरी उत्पन्न जास्त येण्याव्यतिरिक्त खते, पिक फवारणी यांचा खर्च कमी होतो. त्यामुळे संकरीत बियाणांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बियाणांतून कंपनीची ७५% हून अधिक विक्री होते. तर उर्वरीत महसूल जमिनीचा कस वाढविणारे वनस्पती खाद्य, पाण्यात विरघळून द्यायची खते यातून येतो. ‘जीएम’ हे कंपनीने विकसित केलेले कापसाचे बियाणे यशस्वी ठरले आहे. आता बीटी (Bacillus Thuringiensis) कॉटन हे बियाणे संशोधित करून तिने विक्रीला आणले आहे. कपाशी हा सगळ्या पिकात रोगप्रवण पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा हे बियाणे वापरण्याकडे कल वाढला आहे. गेल्या वर्षांत हा व्यवसाय दरसाल ५०% दराने वाढला आहे. २०१३ वर्षांत हा व्यवसाय २४ लाख पाकिटे एवढा होईल असा अंदाज आहे.
हा शेअर घ्यावासा वाटतो कारण, किमतीचे मिळकतीशी असलेले कमी गुणोत्तर, व्यवसायवृद्धीची मोठी शक्यता, उत्पादनांस पेटंटचे संरक्षण आणि त्यामुळे यशस्वी ठरलेले उत्पादन बाजारात दुसऱ्या उत्पादकाने तसेच्या तसे आणणे अशक्य; भांडवलावर (ROCE) २८% परतावा वगैरे याच्या जमेच्या बाजू. दरवर्षी शेतीचे उत्पादन घेतले जाते. मंदी, कमी पाऊस याचा या व्यवसायावर परिणाम होत नाही. शेतकरी कधीच नवीन उत्पादकाकडून बियाणे घेण्याचा धोका पत्करत नाहीत. कमी पाऊस झाला आणि पहिली पेरणी वाया गेली तरी दुबार पेरणीसाठी याच बियाणाला प्राधान्य देतात. शेतकरी एक वेळ दुसऱ्या गोष्टीत पसे वाचवेल पण स्वस्त आणि अनोळखी बी बियाणे घेणार नाही. या कंपनीच्या ताळेबंदात सर्व गुणोत्तरे सकारात्मक आहेत. सरकारकडून या व्यवसायासाठी नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन धोरण ठरविले जाते. धोरणात कमी लवचिकता असते. त्यामुळे धोरणात वारंवार बदल होत नाहीत. त्या मुळे एखाद्या सरकारी धोरणामुळे व्यवसायास खीळ बसण्याची शक्यताही कमी असते. बियाणे विक्री हे शेतीचे उत्पन्न असल्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय (आयकर आयुक्त विरुद्ध सौंदर्या नर्सरी) झाला असून त्यामुळे कंपनीचे व्यवसायापासून मिळणारे उत्पन्न करमुक्त आहे.
गेल्या आíथक वर्षांची प्रति समभाग मिळकत रु. ८१.३३ असून ३१ मार्च २०१३ रोजी संपणाऱ्या आíथक वर्षांत ती रु. १०९ असणे अपेक्षित आहे. म्हणजे किंमत/उत्पन्न गुणोत्तर (पी/ई) ११.११ पट असेल. चालू आíथक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत विक्री ३१.१७% वाढून रु. ६३.९७ कोटी झाली आहे. तर निव्वळ नफा रु. ६.६१ कोटी आहे. या वर्षांत वाढीव क्षमतेच्या कार्यकुशलतेमुळे नफ्याची परिमाणे बदललेली दिसतील. या कंपनीत प्रवर्तकांचा वाटा ६५% असून यापकी एकही शेअर बँका अथवा आíथक संस्थाकडे गहाण पडलेला नाही. घसघसशीत लाभांश व समभागधारकाला खुश करेल या प्रमाणात कदाचित बक्षीस समभाग मिळण्याची शक्यताही आहे.
आता बाजाराच्या नजरा लागल्या आहेत त्या १८ डिसेंबरला येणाऱ्या रिझव्र्ह बँकेच्या पतधोरणाकडे. एक नक्की की, या धोरणात फार काही बदल संभवत नाही.
कावेरी सीड कंपनी
दर्शनी मूल्य : रु. १०/-
मागील बंद भाव : रु. १३२२ (३० नोव्हेंबर)
वर्षांतील उच्चांक : रु. १४१४
वर्षांतील नीचांक : रु. ४२२