या युक्यांना भूलायचे की नीरक्षीर विवेक वापरून आपल्या गुंतवणुकीसाठी योग्य कंपन्यांची निवड करायची असते  हे ठसविण्यासाठी आजची सुरूवात एकनाथ महाराजांच्या या गवळणीने केली.
नेसले गं बाई मी चंद्रकळा ठिपक्याची
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची
शिट्टी मारून करी तो गोळा, गोपाळांचा मेळा
राधिकेला अडवुनि धरितो मिठी मारितो गळा.
एका जनार्दनी गौळण हसुनी
हरी चरणांशी मिठी मारुनी
फिटली गं बाई माझ्या हौस यौवनाची,
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची..

एकनाथांची ही गवळण लोककलावतांनी महाराष्ट्रातल्या घराघरात नेली. वर्षभर वज्र्य असलेला काळा रंग आज संक्रांतीच्या निमित्ताने मोठय़ा हौसेने मिरविला जातो. कृष्णाची नजर आपल्यावर पडावी म्हणून गवळणी वेगवेगळ्या युक्त्या करतात.अशीच एक युक्ती म्हणून काळी चंद्रकळा नेसून आराध्य श्रीकृष्णाची कृपा व्हावी म्हणून मथुरेच्या बाजाराला जातात, असा आशय या गवळणीतून नाथांनी मांडला आहे. याचा अर्थ आपल्या आराध्य दैवताला जे आवडेल ते आपण करावे. जेणे करून दैवताची आपल्यावर कृपादृष्टी राहते, हा नाथांचा या गवळणी मागचा उद्देश आहे. त्यासाठी एकनाथांनी गवळण आणि चंद्रकळा ही प्रतिके वापरली आहेत.
बाजारातल्या अनेक कंपन्या गुंतवणूकदारांचे लक्ष्य असेच वेधून घेण्यासाठी नावात बदल करतात. २००० मध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या नावात info  आणला. मोठय़ा जाहिरातीतून कंपन्या वित्तीय निष्कर्षांचे प्रदर्शन करतात. बातम्याही पेरतात. कंपन्या सतत चच्रेत राहतील आणि भोळे गुंतवणूकदार या भूलथापांना बळी पडतील, असा हेतू असतो. या युक्यांना भूलायचे की नीरक्षीर विवेक वापरून आपल्या गुंतवणुकीसाठी योग्य कंपन्यांची निवड करायची असते  हे ठसविण्यासाठी आजची सुरूवात एकनाथ महाराजांच्या या गवळणीने केली.
कॉलनीतल्या केरकरबाई काही दिवसांपूर्वीच ‘युको बँके’तून निवृत्त झाल्या. बाई तशा हसतमुख. बँकेच्या कामाकरिता कोणीही ओळखीचे बँकेत गेल्यास लगेच आपुलकीने काम करून देत. त्यामुळे केरकरबाई व युको बँक हे एकमेकाला पूरक शब्द होते. बँकेच्या कर्मचारी कोटय़ातून मिळालेल्या ‘युको बँके’च्या शेअरचे भवितव्य काय, असे त्या विचारत होत्या. युकोच्या शेअरचे भाव पुन्हा वर जातील की नाही ही चिंता त्यांना भेडसावत होती. ‘लोकसत्ता’च्या ‘अर्थवृतांतचे’ अनेक वाचक एखादी दोन आकडय़ातली बँक सुचवा, असा नेहमी आग्रह धरतात. म्हणूनच ‘व्याजदर संवेदनशील शेअर’ या चालू महिन्याच्या सूत्रात बसणाऱ्या युको बँकेची व युनियन बँकेची चर्चा आजच्या भागात करू.
आपल्या औद्योगिक साम्राज्य जगभरात विस्तारणारे उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांनी ‘युनायटेड कमíशयल बँक’ या नावाने या बँकेची स्थापना ६ जानेवारी १९४३ रोजी तत्कालीन कलकत्ता शहरात केली. आज देशभरातून २,००० हून अधिक शाखांमधून व सिंगापूर व हॉंगकॉंग या परदेशातील दोन सेवा केंद्रातून व्यवसाय करत आहे. भारतात ३५ विभागीय कार्यालये असून कोलकोत्ता येथे मुख्यालय आहे. १९ जुल १९६९ रोजी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या तत्कालीन सरकारच्या आदेशामुळे या बँकेची मालकी ‘बिर्ला समुहा’कडून भारत सरकारकडे आली. १९८५ मध्ये बँकेला नवीन ओळख प्राप्त करून देण्याचा एक भाग म्हणून सध्याचे ‘युको बँक’ हे नाव मिळाले. भारत सरकारचा प्रारंभिक खुल्या विक्रीपश्चात त्यातील हिस्सा ६५.२% असून २१% संस्थात्मक गुंतवणूकदरांकडे तर १५.८% भारतीय नागरिकांकडे आहे.
 
युको बँक       
२०१३ च्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालात इतर बँकांसारखेच, म्हणजे व्याजाच्या उत्पन्नात फारशी न झालेली वाढ, अनुत्पादित कर्जापोटी वाढीव तरतुदीमुळे कमी झालेला नफा, घटलेला व्याजातील फरक याला ‘युको बँक’ही अपवाद नाही. कर्जे व ठेवी यामध्ये वार्षकि वाढ २४% च्या जवळपास आहे. भारताची इराणकडून होणारी तेल आयात व अन्नाच्या बदल्यात तेल या युनोच्या योजनेखाली निर्यात केलेले अन्न यांच्यापोटी पशाच्या उलाढालीच्या ४५% देवाण घेवाण ‘युको बँके’मार्फत होते. म्हणून चालू व बचत खात्यातील रकमेचा वाटा एकूण स्त्रोतामध्ये २३% असून त्यात वार्षकि २०% वाढ झाली आहे. व्याजातील फरकामध्ये ०.२०% घट झाली आहे. याचा परिणाम नफ्यावर होऊन तिसऱ्या तिमाहीचा नफा ५५.२०% कमी झाला आहे. या तिमाहीत अनुत्पादित कर्जे रु. १,५४१ कोटी झाली आहेत. गेल्या तिमाहीत हेच प्रमाण रु. ८४१ कोटी होते. या तिमाहीत रु. ९५८ कोटी इतक्या कर्जाची पुर्नरचना करण्यात आली आहे. आज इतर राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत या बँकेच्या किंमतीशी प्रती समभाग मिळकतीचे प्रमाण कमी आहे. याचे कारण तरतुदींचे नफ्याशी तुलनेने जास्त असलेले प्रमाण व बसेल-३ साठी आवश्यक असलेले प्रथम श्रेणी (टीयर-१) भांडवलाचे प्रमाण हे आहे. बँकेने तिसऱ्या तिमाहीत रु. १,००० कोटींचे रोखे अर्थसंस्थांना विकले आहेत. या विक्रीमुळे द्वितीय श्रेणी भांडवलापोटीची उभारणी पूर्ण केली असून सरकारकडे रु. ८०० कोटींची मागणी केली आहे. इतर बँकांप्रमाणे ‘युको बँके’ला सरकारकडून यातील वाटा ३१ मार्च २०१३ पूर्वी मिळणे अपेक्षित आहे. मार्च २०१३ ला संपणाऱ्या आर्थिक वर्षांत ‘युको बँक’ रु. ३,००,००० कोटींचा व्यवसाय टप्पा पार करेल. पुढील आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर होताना रु. ११० चा भाव विनासायास असेल.

युनियन बँक
‘युनियन बँक’ ही स्टेट बँके व्यतिरिक्त वार्षकि रु. ६,००,००० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या मोठय़ा सहा राष्ट्रीयीकृत बँकांपकी एक आहे. या स्तंभातून याआधी सखोल आढावा घेतला आहेच. प्रती कर्मचारी व्यवसाय, प्रती कर्मचारी नफा, एटीएमचे शाखांशी गुणोत्तर या निकषांवर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आबाळ असलेली ही बँक आज रु. २५८ ला गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी या बँकेने ८८% लाभांश दिला. बाजारभावाशी पुस्तकी किमतीचे गुणोतर १.०९ आहे. ३% वर व्याजातील फरक असलेल्या मोजून चार बँकापकी ही एक बँक आहे. या तिमाहीत व्याजाचे उत्पन्न रु. २,००० कोटी पार करेल तर नफा रु. ५७५ कोटींपेक्षा अधिक असेल. गेल्या तिमाहीत अनुत्पादित कर्जे २.०९% होती. या तिमाहीत २% पेक्षा कमी अनुत्पादित कर्जे असतील. त्यापोटी करावी लागणारी तरतूद कमी असेल. राष्ट्रीयीकृत बँकांचे आकारमान आणि खाजगी बँकांची कार्यक्षमता असा संगम असलेल्या या बँकेला आपल्या गुंतवणुकीत पहिल्या १० शेअरमध्ये स्थान हवेच.

युको बँक
दर्शनी मूल्य     :    रु. १०
मागील बंद भाव     :    रु ८२.३०    (११ जानेवारी)
वर्षांतील उच्चांक     :    रु. ९५.००
वर्षांतील नीचांक     :    रु. ४९.०५
वर्षांनंतर अपेक्षित भाव     :    रु. ११५

युनियन बँक
दर्शनी मूल्य     :    रु. १०
मागील बंद भाव     :    रु २५८.१०    (११ जानेवारी)
वर्षांतील उच्चांक     :    रु. २८८.००
वर्षांतील नीचांक     :    रु. १५०.१०
वर्षांनंतर अपेक्षित भाव     :    रु. ३१५

Story img Loader