एचडीएफसी चिल्ड्रेन गिफ्ट फंड हा एक बॅलन्स फंड. कायम गुंतवणुकीसाठी खुला असणारा (ओपन एण्डेड) फंड असून, २ मार्च २००१ रोजी प्रथम गुंतवणुकीस खुला झाला. फंडाचे उद्दिष्ट मर्यादित जोखीम पत्करून भांडवली नफा मिळविणे हे आहे. चिराग सेटलवाड हे या योजनेचे मुख्य गुंतवणूक व्यवस्थापक आहेत, तर मितेन लाथिया हे सहगुंतवणूक व्यवस्थापक आहेत. यात गुंतवणूक योजना (इन्व्हेस्टमेंट प्लॅन) व बचत योजना (सेव्हिंग्ज प्लॅन) अशा दोन योजना उपलब्ध आहेत. या दोन्ही योजनांमध्ये ‘लॉक इन पीरियड’चा पर्याय आहे. निधी व्यवस्थापकाला गुंतवणूक योजनेंतर्गत ४०-७५ टक्के गुंतवणूक शेअरमध्ये व २५-६० टक्क्यांदरम्यान रोख्यांमध्ये करता येते, तर बचत योजनेंतर्गत ८०-१०० टक्के गुंतवणूक रोख्यांमध्ये व ०-२० टक्के गुंतवणूक शेअरमध्ये करता येते.
गुंतवणूक योजना ही ‘भांडवली वृद्धीसाठी’ आहे, जी ‘मध्यम जोखीम मध्यम परतावा’ देते, तर बचत योजनेचे उद्दिष्ट कमी जोखीम स्वीकारून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे आहे. १२ जून २०१३ रोजी गुंतवणूक योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) रु. ५०.०३ व बचत योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) रु. २६.९३ होते.
गुंतवणूक केल्यापासून एका वर्षांच्या आत फंडातून बाहेर पडल्यास ३ टक्के निर्गमन शुल्क आकारले जाते. २ टक्के शुल्क दोन वर्षांच्या आत, तर १ टक्के निर्गमन शुल्क तीन वर्षांच्या आत बाहेर पडल्यास आकारले जाते. तीन वर्षांच्या नंतरच्या निर्गुतवणुकीवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. किमान रु. ५००० भरून या योजनेत गुंतवणुकीस सुरुवात करता येते. नंतर रु. १००० किंवा रु. १००० च्या पटीत या योजनेची युनिट्स विकत घेता येतात. या योजनेची युनिट्स खरेदी करण्यासाठी ज्याच्या नावाने पालक ही खरेदी करू इच्छितात तिचे किंवा त्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असावे. या योजनेचे एक वैशिष्टय़ म्हणजे ज्याच्या नावावर गुंतवणूक आहे त्याच्या पालकांना गुंतवणूक मूल्याच्या दहापट किंवा १० लाखांपर्यंतच्या (जे जास्त असेल त्या) रकमेचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. परंतु पालकांचे वय ८० पेक्षा जास्त नसावे. हे या योजनेचे वेगळेपण आहे. गुंतवणूक योजनेच्या परताव्याच्या तुलनेसाठी क्रिसिल बॅलन्स फंड निर्देशांक तर बचत योजनेच्या परताव्याच्या तुलनेसाठी क्रिसिल एमआयपी ब्लेण्डेड निर्देशांक वापरण्यात येतो.
पालकांना आपल्या पाल्यासाठी शिक्षण किंवा इतर कारणासाठी भविष्यातील तरतूद म्हणून पुढील पाच किंवा जास्त वर्षांसाठी या फंडात थोडीफार गुंतवणूक करण्यास हरकत नाही.