fundआजच्या घडीला नवखे गुंतवणूकदार नक्की गुंतवणूक कुठे करायची या मुद्यावर गोंधळलेले दिसून येत आहेत. शेअर बाजाराचे निर्देशांक चालू वर्षांत आजपर्यंत ३० टक्क्यांपेक्षा अधिक वधारले आहेत.  म्हणून एकीकडे काही गुंतवणूकदारांचे मन नवीन गुंतवणूक करायला धजावत नाही. दुसऱ्या बाजूला समभागांचे वाढलेले भाव पाहता एका मोठय़ा तेजीला मुकल्याचे शल्य टोचत राहते. अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी ‘एचडीएफसी मल्टिपल यील्ड फंड २००५’ हा फंड सुयोग्य गुंतवणूक ठरावी.
ही योजना म्हणजे ८० टक्के रोखे गुंतवणुकीला २० टक्के समभागांचे कोंदण असा एक गु्च्छ आहे. या  योजनेचे वर्णन सुधारीत ‘एमआयपी’ (मंथली इन्कम प्लान) असे केले तर वावगे ठरणार नाही. पारंपारिक मासिक उत्पन्न योजनांच्या तुलनेत एचडीएफसी मल्टिपल यील्ड फंड २००५ चा विविध मुदतींच्या परताव्याचा दर उजवा आहे.
एचडीएफसी मल्टिपल यील्ड फंड २००५ हा फंड विविध कालवधीत दिलेल्या अन्य फंडांच्या परताव्याच्या दरात अव्वल ठरला आहे. पाच वष्रे या कालावधीत जवळच्या स्पर्धकापेक्षा एक टक्क्याहून अधिक परतावा त्याने दिला आहे. सोबतच्या कोष्टकामध्ये अन्य स्पर्धक म्युच्युअल फंडांची एचडीएफसी मल्टिपल यील्ड फंड २००५ बरोबर तुलना केली आहे. वेगवेगळ्या कालखंडातील हा परताव्याचा दर या काळातील व्याजदरांच्या वर अथवा खाली जाण्याच्या तुलनेत तपासला असता हा फंड आपल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा हिस्सा असावा असे कोणाला वाटले तर चुकीचे नाही.
रोखे गुंतवणुकीत प्रामुख्याने दोन प्रकारे काळजी घेणे आवश्यक असते. पहिली रोख्याची पत ज्याला Credit Risk असे म्हटले जाते आणि दुसरी काळजी रोखे व्याजदराची जोखीम ज्याला Interest Rate Risk असे म्हटले जाते. एचडीएफसी मल्टिपल यील्ड फंड २००५ मधून अल्प मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक केली गेल्याने दुसऱ्या प्रकारची जोखीम नियंत्रित करणे शक्य होते. सर्वच रोखे पाच वर्षांच्या आतील मुदतपूर्तीचे आहेत. सध्या व्याज दर चढे असल्याने एका वर्षांच्या सरकारी रोख्याला देखील आठ टक्क्यांच्या आसपास परतावा मिळतो. त्यामुळे अल्पमुदतीच्या रोखे गुंतवणुकीतून दहा टक्के परतावा मिळणे शक्य झाले आहे. स्थिर उत्पन्न गुंतवणुकीची सरासरी मुदतपूर्ती २१८ दिवस आहे. तर स्पर्धक फंड योजनांची सरासरी मुदतपूर्ती एका वर्षांहून अधिक आहे. सप्टेंबर २०१३ पासून बँकाचा स्रोत आटल्याने अनेक कंपन्यांनी कर्जरोखे (डिबेंचर्स) विकून निधी उभारणी केली. साहजिकच या कंपन्यांना तत्कालीन व्याजदर पातळी पेक्षा कॉर्पोरेट डिबेंचर्सवर अधिक व्याज देणे भाग पडले. याचा फायदा घेत मागील वर्षांपासून या फंडाने कॉर्पोरेट डिबेंचर्समध्ये गुंतवणूक करण्याचे धोरण यशस्वीपणे राबविले आहे. हे करीत असताना मध्यम मुदतीत ‘AA’ पेक्षा कमी व एका वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या रोख्यात ‘P1’ किंवा ‘A1’  पेक्षा कमी पत असलेल्या रोख्यात गुंतवणूक करणे टाळल्याने गुंतवणुकीची सुरक्षितता एका मर्यादेत ठेवण्यात फंड व्यवस्थापकास यश आले आहे. समभाग गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या २० टक्क्याच्या वर जाणार नाही याची काळजी फंड व्यवस्थापनाने घेतल्याने फंडाच्या मूळ उद्दिष्टापासून फंडाची गुंतवणूक फारकत घेणार नाही, याची काळजी घेतली गेली आहे. २०१० मध्ये समभाग गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या १० टक्के इतपत राखली होती. यामुळे घसरत्या समभाग किंमतीचा मर्यादित परिणाम एकूण पराताव्यावर झाला तर जुल २०१३ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर वाढविल्याने पराताव्यातील कमी ऑगस्ट २०१३ पासून समभाग गुंतवणुकीच्या पराताव्याने भरून काढली आहे. साहजिकच फंडाचा एकूण मासिक परतावा फंड गटातील अन्य फंडांपेक्षा अव्वल ठरला आहे. ३० सप्टेंबर २०१४ रोजी फंडाच्या समभाग गुंतवणुकीत अनुक्रमे टाटा मोटर्स डीव्हीआर, सुंदरम् फास्टनर्स, स्टेट बँक, बजाज फायनान्स व कॉबरेरंडम युनिव्हर्सल या आघाडीच्या पाच गुंतवणुका आहेत. मध्यम परतावा मिळवताना मध्यम जोखीम उचलण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांनी या फंडाचा गुंतवणुकीसाठी जरूर विचार करावा.
av-08

Story img Loader