रमेश २६ व्या वर्षी उच्च शिक्षण पूर्ण करून नोकरी करावयास सुरवात करतो. खिशात पैसा खेळायला लागल्यावर सुरवातीची काही वर्षे मौजमस्तीमध्ये घालवतो. ३०व्या वर्षी तो थोडा भविष्याबाबत गंभीर होतो. महिना १० हजार रु. तरी गुंतवणूक करावी असा विचार करू लागतो. आणि एचडीएफसी स्टॅण्डर्ड लाईफची ‘क्लासिक अश्युअर प्लान’ ही पॉलिसी घेतो. उद्देश केवळ गुंतवणुकीचा. त्या पॉलिसीची निवड करण्याचे आणखी एक कारण म्हणजे पॉलिसीची टर्म २० वर्षांची आहे. म्हणजे त्याच्या ५०व्या वर्षी त्याच्याकडे मॅच्युरिटीचे पैसे जमा झालेले असणार आणि त्याचबरोबर कंपनीकडे जमा करायचे हप्ते फक्त ७ वर्षांचेच असणार.
एडिनबर्गमधे १८२५ साली स्थापन झालेली, आज जगभरात कार्यरत असलेली, गुंतवणूक आणि विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी स्टॅण्डर्ड लाईफ आणि १९७७ साली स्थापन झालेली, गृहकर्ज आणि बँकिंग क्षेत्रातील प्रमुख भारतीय कंपनी एचडीएफसी यांच्या सहयोगाने २००० साली कार्यान्वित झालेल्या एचडीएफसी स्टॅण्डर्ड लाईफ या विमा कंपनीची एन्डाऊमेंट प्रकारात मोडणारी ही पॉलिसी.
प्रमुख वैशिष्टय़े :
१) १२ ते ६० वर्षांच्या व्यक्तीला ही पॉलिसी घेता येते.
२) पॉलिसीची टर्म १०, १५ किंवा २० वर्षांपर्यंतची घेता येते.
३) पॉलिसीची टर्म कितीही असली तरी हप्ते भरायची टर्म मात्र ७ वर्षांचीच असते.
४)पॉलिसीच्या मॅच्युरिटीची मर्यादा ७५ वर्षांपर्यंतचीच असते.
रमेशच्या पॉलिसीचा तपशील-
वय- ३० वर्षे
टर्म- २० वर्षे
प्रिमियम भरायची टर्म- ७ वर्षे
प्रिमियम- मासिक १०,००० रु.; वार्षिक १,२०,००० रु.
विमाछत्र- १३,९८,३७३ रु.
पॉलिसीचे लाभ :
पॉलिसीच्या टर्ममध्ये म्हणजे रमेशच्या वयाच्या पन्नाशीपर्यंत त्याचा मृत्यू झाला तर कंपनी त्याच्या नामनिर्देशकाला विम्याची रक्कम आणि त्याच्या खात्यात जमा असलेला बोनस देणार.
रमेश पॉलिसीची टर्म तारून गेला तर त्याच्या ५०व्या वर्षी त्याला १३,९८,३७३ रु. (विमा रक्कम) आणि त्याच्या नावे जमा बोनस इतकी रक्कम मिळणार. त्याचबरोबर टर्मिनल बोनसही प्राप्त होणार. बोनसच्या रकमेची कंपनीकडून कोणत्याही प्रकारची हमी नाही. हिशेबासाठी वार्षिक बोनसचे (रिव्हर्जनरी बोनस) प्रमाण रु. ३१० गृहीत धरले तर रमेशच्या खात्यामधील बोनसची रक्कम होते ८,३९,०२३ रु. टर्मिनल बोनसचे प्रमाण १५ टक्के गृहीत धरले तर ती रक्कम होते २,०९,७५५ रु. अशाप्रकारे रमेशला त्याच्या पन्नाशीनंतर २४,४७,१५१ रु. प्राप्त होणार.
टिप्पणी : रमेशच्या ५१ व्या वर्षी जेव्हा त्याच्यावरील जबाबदाऱ्या सर्वात जास्त असणार तेव्हा त्याला विमाछत्र नसणार. आणि त्यावेळी त्याने जीवनविमा पॉलिसी घेतली तर वाढीव वयामुळे वार्षिक प्रिमियमची रक्कम कितीतरी वाढलेली असणार.
पर्याय :
रमेशने ३०व्या वर्षी याच कंपनीची बिन नफ्याची १५ लाख रु.ची ३० वर्षांची प्युअर टर्म पॉलिसी घेतली तर वार्षिक प्रिमियमची रक्कम होते ८९०० रु. तीस वर्षांच्या एकूण प्रिमियमची रक्कम होते २,६७,००० रु. क्लासिक अश्युअर्ड इन्शुरन्स प्लानच्या एकूण प्रिमियमच्या (८,४०,००० रु.) बचत झालेले ५,७३,००० रुपये ही रक्कम तीस वर्षांमध्ये विभागून वार्षिक १९,१०० रु.प्रमाणे गुंतवणुकीच्या अन्य अशा पर्यायामध्ये गुंतविली की ज्यामध्ये आयकरातही सूट आहे आणि परतावाही आयकरमुक्त आहे; तर रमेशच्या ६०व्या वर्षी त्याच्याकडे २७,२९,००० रु. इतकी आयकरमुक्त गंगाजळी तयार होते. आणि ती ही पूर्णत: ‘सेफ’ पर्यायामार्फत. या गंगाजळीची आणखी एक खासियत आहे. रमेशच्या हातून अनाहूतपणे काही प्रमाद घडला आणि त्याला दिवाळखोरीला सामोरे जावे लागले तरी कोणतेही न्यायालय त्याची ही गंगाजळी जप्त करू शकत नाही.
एचडीएफसी स्टॅण्डर्ड लाइफ ही कंपनी ९५.४४% प्रमाणासह क्लेम सेटलमेंट रेशिओच्या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.
भारतीतील प्रथम क्रमांकाच्या (रेशिओ ९७.१०%) कंपनीची अशाच प्रकारची बिननफ्याची १५ लाख रु.ची ३० वर्षांची पॉलिसी घेतली तर वार्षिक प्रिमियमची रक्कम होते १६८०० रु. तीस वर्षांच्या प्रिमियमची एकूण रक्कम होते ५,०४,००० रुपये. तर प्रिमियमच्या रकमेमधील बचत ३,३६,००० रुपये ही रक्कम ३० वर्षांमध्ये विभागून दरवर्षी ११,२०० रु.च्या हप्त्यांमध्ये वरील ‘सेफ’ पर्यायामध्ये गुंतविली तर रमेशच्या साठीला त्याच्याकडे १६,२५,४०० रु.ची गंगाजळी तयार होते.
विमा इच्छुकाने २० वर्षांच्या टर्मच्या १३,९८,३७३ रुपयांच्या विमाछत्रासाठी सात वर्षांमध्ये ८,४०,००० रु.च्या रकमेची गुंतवणूक करून वयाच्या ५१व्या वर्षी २४.४७ लाख रु. इतकी रक्कम प्राप्त करून ज्या काळामध्ये स्वत:वर सर्वात जास्त आर्थिक जबाबदाऱ्या असतात त्या काळामध्ये (वय वर्ष ५१ ते ६०) बिना विमाछत्राचे राहावे किंवा वाढीव प्रिमियम भरून नवीन विमा पॉलिसी घ्यावी की त्याने ३० वर्षांच्या १५ लाख रु.च्या विमाछत्रासाठी तितक्याच वर्षांमध्ये ८,४०,००० रु.ची गुंतवणूक करून वयाच्या साठीला २७.२९ लाख रु. किंवा १६.२५ लाख रु. प्राप्त करावे हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
रमेशच्या विमाछत्राच्या बाबतीत जरा गांभीर्याने विचार केला तर असे दिसून येते की, रमेश त्याच्या वयाच्या ३० व्या वर्षी १,२०,००० रु. इतक्या रकमेची दरवर्षी गुंतवणूक करू शकतो. म्हणजे त्याची वार्षिक आवक सुमारे २,४०,००० रु. तरी असावयास हवी. वयाच्या साठीपर्यंत पुढील ३० वर्षे त्याचा पगार वार्षिक १०% प्रमाणात वाढत गेला तर त्याच्या रिटायरमेंटच्या वर्षी त्याचा वार्षिक पगार सुमारे ४३.६२ लाख रु. असेल. या सर्व वर्षांच्या पगारांची रक्कम पुढील तीस वर्षांमध्ये त्याच्या घरामध्ये येणार आहे. म्हणजे आज रमेशला प्रचंड आर्थिक मूल्य (economic value) आहे. या काळामध्ये जर का त्याचे काही बरे-वाईट झाले तर त्याचे घर त्या पैशाला मुकणार आहे. जीवन विमा हा मुख्यत: याच संभावनेवर मात करण्यासाठी असतो. त्या दृष्टीकोनातून विचार केला तर १३ लाख रु. काय किंवा १५ लाख रु. हे विमाछत्र रमेशच्या बाबतीत अगदीच मामुली आहे. असे किरकोळ विमाछत्र घेण्यापेक्षा अपवादात्मक संभावनेच्या बाबतीत पूर्ण धोका पत्करून संपूर्ण गुंतवणूकयोग्य रक्कम गुंतवणुकीच्या इतर पर्यायांमध्ये गुंतविली तर ती कितीतरी मोठय़ा प्रमाणात मालमत्ता (assets) निर्माण करू शकते.
(या लेखामागील उद्देश पूर्णत: समीक्षात्मक आहे आणि माहिती त्या त्या कंपन्यांच्या वेबस्थळावरून घेतली आहे.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा