पूर्वाश्रमीची भारत सरकारचा एक उपक्रम असलेली मेटल कार्पोरेशन ऑफ इंडिया २००२ सालात वेदान्त समूहाने ताब्यात घेतली. ९९.९९% शुद्ध जस्त आणि औद्योगिक वापरासाठी चांदीचे उत्पादन घेणारी हिंदुस्तान झिंक लिमिटेड (एचझेडएल) ही एक भारतातील मोठी आणि अग्रगण्य कंपनी आहे. खाण काम उद्योगाला तितकेसे चांगले दिवस नाहीत मात्र तरीही हिंदुस्तान झिंकने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. ३१ मार्च २०१३ रोजी संपणाऱ्या तिमाहीसाठी कंपनीने विक्रीत २४.७% वाढ नोंदवून नक्त नफ्यात ५३% पेक्षा जास्त वाढ करून दाखवली. कंपनीने वार्षकि उलाढालीत ११.३% वाढ साध्य करून आर्थिक वर्षांसाठी रु. ६,९१५ कोटी रूपयांचा नफा कमावला आहे. जस्ताच्या किमती येती दोन वर्ष तरी चढ्याच राहतील असे व्यवस्थापनाला वाटते. राजस्थानातील खाणीतून उत्पादन सुरू झाल्यावर यंदाच्या आर्थिक वर्षांत कंपनीच्या खाणकाम धातूचे उत्पादन १५% ने वाढेल. चांदीच्या उत्पादनात देखील वाढ होऊन ते ३६० टनांवर जाईल. सध्या आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गतही जस्ताला चांगली मागणी असल्याने तसेच येत्या दोन वर्षांत किमतीही चढयाच राहणार असल्याने हिंदुस्तान झिंक खरेदीसाठी आकर्षक वाटतो. सध्या १२०-१२२च्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर तुम्हाला वर्षभरात २०% परतावा देऊ शकेल.
हिंदुस्तान झिंक लिमिटेड
प्रवर्तक वेदान्त समूह
सद्य बाजारभाव रु. १२२
प्रमुख व्यवसाय खाणकाम उद्योग
भरणा झालेले भाग भांडवल रु. ८४५.०६ कोटी
पुस्तकी मूल्य : रु. ७८.४ दर्शनी मूल्य : रु. २/-
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) रु. १६.४
प्राइस अर्निंग गुणोत्तर (पी/ई) ७.४ पट
मार्केट कॅपिटल : रु. ५०,१७६ कोटी बीटा : ०.९
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : रु. १४७/ रु. १०७
शेअरहोल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ६४.९२
परदेशी गुंतवणूकदार १.४५
बँका / म्युच्युअल फंडस् ३१.५६
सामान्यजन व इतर २.०७