कर्ज घेतेवेळी आपल्यासमोर व्याजदराचे मुख्यत: दोन पर्याय असतात – फिक्स्ड रेट (फ्लॅट रेट) किंवा प्लोटिंग रेट. कर्ज देणाऱ्या संस्थेने ८ टक्के फिक्स्ड रेट (स्थिर) किंवा १२ टक्के प्लोटिंग रेट (बदलता) हे दोन प्रस्ताव मांडले तर साहजिकच पहिला प्रस्ताव रास्त वाटतो, परंतु दोन्ही पर्यायांबाबत पूर्ण माहिती विचारल्याशिवाय निवड केली तर आपली फसगत होण्याची शक्यता जास्त असते. सर्वसाधारणपणे कोणीही प्रश्न विचारून खोलात जायचा विचारच करत नाही. नवीन घर किंवा गाडी आपल्याला घेता येणार या सुखद कल्पनेत ते सुखावलेले असतात.
सध्याच्या परिस्थितीत व्याजदर कमी होण्याची चिन्हे नाहीत म्हणून आपण ८ टक्के फिक्स्ड रेटचा पर्याय निवडतो आणि फसले जातो. या पर्यायामधील मेख अशी आहे की त्यामध्ये दर महिन्याचे व्याज हे कर्जाच्या पूर्ण रकमेवर आकारले जाते. आपण दर महिन्याला जो हप्ता भरतो त्यामध्ये व्याज आणि कर्जाऊ रकमेचा काही भाग असतो. म्हणजे आपण दर महिन्याला कर्जाची काही रक्कम त्या वित्तसंस्थेला परत देत असतो, परंतु व्याज मात्र पूर्ण रकमेवर आकारले जाते. ती रक्कम कमी करून जर आपण हिशोब केला तर प्रत्यक्षात आपल्याला लागू पडणारा व्याजाचा दर असतो सुमारे २० टक्के. त्यामुळे खरे तर १२ टक्के फ्लोटिंग रेट आपल्या फायद्याचा असतो.
प्रत्येकाचा असाच समज असतो की आपण निवडलेला कर्जफेडीचा पर्याय अगदी सर्वोत्तम आहे, परंतु तो चुकीचा असू शकतो. त्यासाठी कर्जफेडीच्या अटींचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे. परतफेडीच्या संपूर्ण काळात व्याजाचा दर एकच राहणार आहे की बदलत राहणार आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. घरासाठी कर्ज घेताना अनेकदा पहिली काही वष्रे व्याजाचा दर एक असतो आणि नंतर तो बदलत जातो. अशा काही अटी आहेत का त्याची खातरजमा करणे फायद्याचे आहे. नाही तर भविष्यात इकडे आड तिकडे विहीर अशा स्थितीत अडकण्याची शक्यता आहे. घरासाठीचे कर्ज हे दीर्घ काळाचे असते. किंचित निष्काळजीपणाचे परिणाम नंतर बरीच वष्रे भोगावे लागतात. अगदी वेडय़ासारखे वाटले तरी प्रश्न विचारायला लाजू नका. शेवटी पसे तुमच्या मेहनतीचे आहेत आणि ते वाचविण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा