मागील लेखात एखादे राहते घर विकून होणाऱ्या दीर्घकालीन भांडवली नफ्याची मोजणी कशी करतात? त्या घराची ‘कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स’ अर्थात ‘सीआयआय’ वापरून किंमत कशी ठरविली जाते हे आपण पाहिले. एक घर विकून दुसरे घर घेताना कलम ५४ मधील तरतुदींचा उपयोग करून पहिले घर विकल्यामुळे होणाऱ्या दीर्घकालीन नफ्यावरील भांडवली कर कमी किंवा शून्य (सुद्धा) कसा होऊ शकतो याविषयी आजच्या लेखात माहिती घेऊया.
प्राप्तिकर कायद्याच्या कलम ५४ नुसार जुने घर विकल्यानंतर एक वर्ष आधी किंवा हे घर विकल्यानंतर दोन वर्षांच्या आत नवे घर खरेदी केल्यास किंवा तीन वर्षांच्या आत नवे घर बांधल्यास जुने घर विकून होणारा दीर्घकालीन भांडवली नफ्यावर करसवलत मिळते. ही सवलत (किंवा एक्झेम्प्शन) किती मिळते? तर जुने घर विकून होणारा भांडवली नफा अथवा नव्या घराची किंमत यापैकी जी कमी रक्कम आहे ती करमुक्त मिळते.
ही सवलत समजून घेण्यासाठी मागच्याच लेखात नमूद केलेले उदाहरण घेऊया.
१. १९८१-८२ या आर्थिक वर्षांत खरीदलेल्या घराची किंमत = रु. २,५०,०००
२. हे घर ११ फेब्रुवारी २०१२ रोजी विकल्यानंतर मिळणारी रक्कम = रु. ३२,१०,०००.
३. या व्यक्तीने २८ जून २०१२ रोजी घेतलेल्या नव्या घराची किंमत = रु. १०,००,०००.
या माहितीच्या आधारे कलम ५४ नुसार भांडवली नफ्यावर सवलत कशी मिळते ते पाहू:
जुन्या घराची विक्री किंमत = रु. ३२,१०,०००
वजा : जुन्या घराची इंडेक्स कॉस्ट-
२,५०,००० ७ ७८५/ १०० = रु. १९,६२,५००
= १२,४७,५०० (म्हणजे दीर्घकालीन भांडवली नफा)
या व्यक्तीने नव्या घरात १०,००,००० रुपयांची गुंतवणूक केल्यामुळे १२,४७,५०० किंवा १०,००,००० यापैकी कमी रक्कम म्हणजेच १०,००,००० ही रक्कम करसवलतीस पात्र ठरेल आणि राहिलेल्या २,४७,५०० (१२,४७,५००- १०,००,०००) या रकमेवरच दीर्घकालीन भांडवली कर भरावा लागेल.
समजा या व्यक्तीने घेतलेल्या नव्या घराची किंमत रु. १२,४७,५०० पेक्षा म्हणजे दीर्घकालीन भांडवली नफ्यापेक्षा जास्त असल्यास त्यांना कोणता कर भरावाच लागणार नाही.
कलम ५४ चा लाभ घेण्यासाठी करदात्याला खालील अटींचे पालन करावे लागते :
१. करदाता व्यक्ती अथवा अविभक्त कुटुंब असेल त्यांनाच ही कर-सवलत मिळेल.
२. करदाता जे जुने घर विकत आहे ते घर त्याच्या नावावर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ असले पाहिजे.
३. नवे राहते घर विकत घेतल्यानंतर किंवा बांधल्यानंतर हे नवे घर तीन वर्षांच्या आत विकता कामा नये.
अशा पद्धतीने जुने घर विकून नवे घर घेण्याबाबत करदात्यांनी पूर्वनियोजन केल्यास कलम ५४च्या आधारे जुने घर विकून होणारा दीर्घकालीन भांडवली नफा करमुक्त मिळविता येईल आणि ‘कर’पाशातून त्यांचे घर मुक्त राहील!
लेखक गुंतवणूक व प्राप्तिकर सल्लागार आहेत.
कर मात्रा : ‘कर’पाशातून मुक्त घरकुल!
मागील लेखात एखादे राहते घर विकून होणाऱ्या दीर्घकालीन भांडवली नफ्याची मोजणी कशी करतात? त्या घराची ‘कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स’ अर्थात ‘सीआयआय’ वापरून किंमत कशी ठरविली जाते हे आपण पाहिले.
First published on: 27-05-2013 at 12:32 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Housing loan free from tax