श्रीमंत व्हावे असे सर्वाचेच स्वप्न असते, पण ते सत्यात उतरवण्यासाठी काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे. ती पथ्ये काय आहेत आणि ती कशी पाळायची हे आपण या लेखात बघणार आहोत.

१. गुंतवणूक लवकरात लवकर करायला सुरुवात करणे (time value of money).

२. चक्रवाढ व्याजाच्या शक्तीचा फायदा घेणे  (power of compounding).

गेल्याच आठवडय़ात मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते. तिची मुलगी राणी हल्लीच सनदी लेखापाल (chartered Accountant) झाली होती आणि उत्तम पगारावर नोकरीला लागली होती. ती मला म्हणाली, ‘‘ अगं मी हिला सांगत होते की, तुला आता चांगली नोकरी लागली आहे तर तू थोडी तरी बचत/ गुंतवणूक करायला सुरुवात कर. पण हिला काही माझे म्हणणे पटत नाही, तर तूच तिला समजून सांग.’’

तर मी म्हटले की, जर तुला श्रीमंत व्हायचे असेल तर वर सांगितलेली दोन्ही पथ्ये पाळणे गरजेचे आहे. चला उदाहरणाने समजून घेऊ या:

आपण तीन मित्रांचे उदाहरण घेऊ  : अमित, सुमित आणि रोहित. तिघांनाही चांगली नोकरी आहे आणि तिघांनाही ६० व्या वर्षी रिटायर व्हायचे आहे. अमित तिघांमध्ये हुशार, तो सुरुवातीपासूनच म्हणजे २५ व्या वर्षीच गुंतवणुकीला सुरुवात करतो, महिना रु. ७०००/-. सुमितला जरा उशिरा जाग येते म्हणून तो ३० व्या वर्षी गुंतवणुकीला सुरुवात करतो. मग रोहितला वाटते की मीच मागे राहिलो म्हणून तोही गुंतवणुकीला सुरुवात करतो, पण ३५ व्या वर्षी.

मग आता बघूया की ६० व्या वर्षी त्यांना किती पैसे मिळतील. (वरील कोष्टक पाहा)

या उदाहरणावरून आपल्या हेच लक्षात येते की, अमितची गुंतवणूक मुद्दल रु. २९.४० लाखांचे झाले २.६५ कोटी, म्हणजे नऊ पट वाढले; सुमितचे रु. २५.२० लाखांचे झाले १.५८ कोटी, म्हणजे सहा पट वाढले; तर रोहितचे रु. १६.८० लाखांचे झाले ०.९२ कोटी म्हणजे चार पट वाढले.

हे कशामुळे घडले तर चक्रवाढ व्याजाच्या जादूमुळे. ज्याला जगातले आठवे आश्चर्य असेदेखील म्हटले जाते आणि अर्थातच गुंतवणुकीला लवकर सुरुवात केल्याने.

मग मी राणीला विचारले की, आता तरी तुला पटले का की लवकर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर काय फायदा होईल? ती म्हणाली, ‘‘हे मला पटले, पण अजूनही हे कसे करायचे ते मला माहीत नाही.’’ मी तिला म्हटले मी सांगते, श्रीमंत होण्याचे स्वप्न साध्य करण्याचा सनदशीर मार्ग म्हणजे पैशाने पैसा वाढविणाऱ्या गुंतवणुकीचाच. त्यासाठी फक्त काही साध्या गोष्टींचे (खालील कोष्टक पाहावे) पालन करायचे इतकेच!  आनंदाने गुंतवणूक करा. माझी खात्री आहे तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल.

 

‘श्रीमंती’कडील सरळ वाट..

१. गुंतवणुकीस लवकर सुरुवात करा :

शक्य झाल्यास अगदी पहिल्या पगारापासूनच सुरुवात करा. तुम्हालाच नंतर आश्चर्य वाटेल की एवढी छोटी रक्कम एवढी कशी वाढली.

२. गुंतवणुकीची रक्कम महिन्याच्या बिलाच्या खर्चात धरा आणि तुमची गुंतवणुकीचे हप्ते आणि बिलांचाही नियमित भरणा करा :

जर तुम्ही नियमित गुंतवणूक केली नाहीत, तर तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा घेता येणार नाही आणि रिटायर होताना तुम्हाला भरपूर पैसे (large corpus) मिळणार नाहीत.पहिले गुंतवणूक करा आणि उरलेले पैसे खर्चासाठी वापरा.

३. गुंतवणुकीची रक्कम वाढवण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करा :

पहिली गोष्ट ठरवलेली रक्कम नियमित गुंतवा आणि जर तुम्हाला जास्तीचे पैसे मिळाले – जसे बोनस, बक्षीस (prize) किंवा प्रोत्साहन (Incentive), पगारवाढ तर गुंतवणुकीची रक्कम वाढवायला विसरू नका.

४. खर्चासाठी अधीर होऊ नका. संयम पाळा,  पुढे आयुष्यात त्याची तुम्हाला गरज पडणार ?आहे :

बरेच जण सगळ्यात मोठी चूक हीच करतात की, गुंतविलेले पैसे ते वापरतात/खर्च करतात. त्यामुळे त्यांना चक्रवाढ वाढीचा लाभ मिळत नाही. जर तुम्ही पैसे काढले नाहीत, तर सुरुवातीला जरी कमी वाटले तरी, थोडय़ाच वर्षांत ते नक्कीच वाढतील. विश्वास ठेवा आणि वाट बघा- तुम्हाला चक्रवाढ व्याजाची जादू (power of compounding) बघायला नक्कीच ?मळेल.

५. गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यायला विसरू नका :

कारण जरी तुम्हाला सिप (SIP) करायला पाहिजे हे माहीत असले, जास्तीतजास्त फायदा मिळवण्यासाठी ती कोणत्या मुच्युअल फंडात करायची? कधी करायची? हे सांगण्यासाठी जाणकार माणसाची गुंतवणूक सल्लागाराची आवश्यकता आहे.

Untitled-10

 

स्वाती शेवडे
cashevade.swati @gmail.com
(लेखिका सनदी लेखपाल असून त्या पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणूनही कार्यरत होत्या.)

 

 

 

Story img Loader