‘आयसीआयसीआय पुडेन्शियल म्युच्युअल फंडाने ‘व्हॅल्यू फंडाची’ शृंखला आणण्याचे सूचित केले आहे. सध्या दुसरी योजना विक्रीकरिता खुली आहे. या योजनेचे ‘अर्थवृत्तान्त’ने या क्षेत्रातील तज्ज्ञाशी चर्चा करून केलेले वस्तुनिष्ठ मूल्यमापन..
निर्देशांक चालू आíथक वर्षांच्या तिसऱ्या अथवा चौथ्या तिमाहीत नवीन शिखर गाठेल असा तज्ज्ञांचा अंदाज होता. सेन्सेक्सने दिवाळीनंतर लगेचच म्हणजे व्यापारी नववर्षांत कामकाजाच्या पहिल्या दिवशी शिखर सर केलेच. निर्देशांकाने शिखर गाठले की पावसाळ्यात ज्याप्रमाणे कुत्राच्या छत्र्या उगवतात त्याप्रमाणे शिखर गाठल्याच्या उत्साहावर स्वार होण्यासाठी म्युच्युअल फंड नवीन योजना विक्रीसाठी बाजारात येत असतात. त्यात गुंतवणूकदारांचे कल्याण करण्यापेक्षा व्यवसाय वाढविणे हा एक भाग असतो. म्युच्युअल फंड विक्रेत्यांना दिलेली गोळा केलेल्या रकमेनुसार ५ ते ६% दलाली व विशिष्ट टप्पा गाठल्यामुळे प्रोत्साहनपर दिल्या जाणाऱ्या परदेशी सहली याला भुलून म्युच्युअल फंड विक्रेते गुंतवणूकदाराच्या हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देऊन गुंतवणूकदारांना त्या गुंतवणुकीतील धोका समजावून न देता गुंतवणूक दरांचे पसे म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवताना दिसत आहेत. गुंतवणूकदारांनी आपले कष्टाचे पसे कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील धोके समजावून घेणे आवश्यक आहे.
शेअर बाजारातील उत्तम गुंतवणुकीच्या संधी शोधून काढण्याच्या दोन पद्धती जगात प्रचलित आहेत. पहिली म्हणजे ‘मुमेन्टटम’ किंवा एखाद्या शेअरचा तांत्रिक अंगाने विचार करणे व दुसरी ‘व्हॅल्यू इन्व्हेिस्टग’ किंवा एखाद्या शेअरचा मूलभूत अंगाने विचार करणे. या दोन्ही पद्धतींचे स्वत:चे गुण-दोष आहेत. अनेक गुंतवणूकदारांना असा अनुभव आला असेल. बाजाराचा स्तर खाली असताना चागल्या कंपन्या आकर्षक भावात उपलब्ध असताना नकारात्मक वातावरणामुळे खरेदी करण्याचे धर्य होत नाही. आणि बाजार निर्देशांक वरच्या स्तरावर असताना खरेदीची मानसिकता असते. गुंतवणूकदारांच्या या मानसिकतेचा फायदा उठवताना अनेक म्युच्युअल फंड आपल्या योजना याच काळात घेऊन येतात. अशाच अनेक योजनांची मालिका आयसीआयसीआय प्रूडेन्शियल म्युच्युअल फंडाने ‘व्हॅल्यू फंड’ नावाने विक्रीसाठी खुली केली आहे. या शृंखलेतील पहिल्या योजनेची विक्री थांबविल्यानंतर दोन आठवडय़ांतच दुसरी योजना खुली केली असून ही योजना विक्रीसाठी २९ नोव्हेंबर २०१३ पर्यंत खुली आहे. या निमित्ताने काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू.
‘व्हॅल्यू इन्व्हेिस्टग’ हे तंत्र दीर्घकालीन म्हणजे १० ते १५ वष्रे अथवा त्याहून अधिक कालावधीसाठी यशस्वी ठरते. ही योजना तीन वर्षे मुदतीची बंद योजना असून योजनेच्या निधी व्यवस्थापकाला आपले जे काही कसब दाखवायचे आहे ते तीन वर्षांत दाखवायचे आहे. हा कालावधी ‘व्हॅल्यू इन्व्हेिस्टग’ तंत्राने गुंतवणूक करायला अतिशय कमी कालावधी आहे. २० ते ३० कंपन्यांमध्ये एखादा निर्णय चुकू शकतो. प्रसिद्ध गुंतवणूकगुरू वॉरेन बफे यांनी कल्ल५ी२३्रल्लॠ ्रल्ल अ५्रं३्रल्ल र३ू‘२ ६ं२ ्रे२३ं‘ी अशी आपल्या चुकीची स्पष्ट कबुली दिली आहे. एखाद्या कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय चुकणे ही मानवी त्रुटी आहे व तसे झाले तर तो काही निधी व्यवस्थापकाचा दोष नव्हे; परंतु ती चूक दुरुस्त करायला अतिशय कमी कालावधी आहे. व्हॅल्यू फंडासाठी तीन वष्रे हा कालावधी खूपच कमी आहे. या योजनेचा कालावधी पाच ते सात वष्रे असायला हवा होता.
मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने सेबीकडे दाखल केलेल्या माहिती पत्रकावरून जी ठळक वैशिष्टय़े आहेत त्यानुसार ही तीन वर्षे मुदतीची योजना आहे. या योजनेतून मुदतपूर्तीआधी बाहेर पडायचे असेल तर राष्ट्रीय शेअर बाजारात या योजनांची नोंदणी होणार असून जर खरेदीदार असेल तरच या योजनेतून बाहेर पडता येईल. अनेक रोखे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ठोक रोखे बाजारात सूचिबद्ध आहेत म्हणून त्यांचे रोज सौदे होतातच असे नाही. सूचिबद्धता व द्रवता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे योजना सूचिबद्ध झाली म्हणजे त्या योजनेत द्रवता आली असे नाही. मालमत्ता कंपनीने पुनर्खरेदीची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी होती. या योजनेत फक्त लाभांश हा पर्याय उपलब्ध आहे. याचा अर्थ निधी व्यवस्थापकाला दर वर्षी योजनेतून लाभांश जाहीर करण्यासाठी नफा काढून घेऊन लाभांश द्यावा लागेल. ‘व्हॅल्यू इन्व्हेिस्टग’ या तंत्राच्या अगदी विरुद्ध अशी ही गोष्ट आहे. या योजनांची गुंतवणूक विविध २५ ते ३० कंपन्यांच्या समभागांत करण्यात येणार आहे. ही निवड करताना कुठल्या चाळण्या लावल्या जाणार आहेत या बाबत माहितीपत्रकात स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. कंपन्यांची निवड सर्वस्वी निधी व्यवस्थापकावर सोपविली आहे. याचा अर्थ ही योजना ‘मल्टी कॅप फंड’ प्रकारची असावी असे वाटते. याच गुंतवणूक तंत्रावर ‘आयसीआयसीआय प्रू डिस्कव्हरी फंड’ ही योजना विक्रीसाठी आणली. योजनेची गुंतवणूक अव्वल मिडकॅपमध्येच आहे; परंतु ही योजना मुदतबंद योजना नाही.
मागील १८ महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने सुरक्षित समजल्या जाणाऱ्या औषधनिर्माण, एफएमसीजी व रुपयाच्या अवमूल्यानाचा लाभार्थी असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. म्हणूनच निर्देशांक जरी वधारला व सेन्सेक्स सर्वकालीन उच्चांकाला गेला तरी वैयक्तिक गुंतवणूकदारांना त्याचा लाभ झाल्याचे दिसून येत नाही. कारण मूठभर प्रभावशाली कंपन्यांचे भाव वधारले. एका बाजूला या मूठभर कंपन्यांचे मूल्यांकन ऐतिहासिक उच्चांकावर आहे तर जिन्नस, राष्ट्रीयीकृत बँका, वाहन निर्मात्या कंपन्या यांची मूल्यांकने साधारण १० ते १२ पीई (प्राइस अर्निग) या स्तरावर आहेत. ‘व्हॅल्यू इन्व्हेिस्टग’ तंत्राचा विचार केला तर भविष्यात या कंपन्याच्या कामगिरीत सुधारणा दिसेल या आशेवर निधी व्यवस्थापक या मूठभर कंपन्या वगळता कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करू शकतो. उदाहरणार्थ राष्ट्रीयीकृत बँकांच्या किमतीचे पुस्तकी मूल्याचे (बुक व्हॅल्यू) गुणोत्तर कोणाही निधी व्यवस्थापकाला आकर्षण वाटावे असे आहे. परंतु जे पुस्तकी मूल्य दिसते त्या पुस्तकाची अवस्था अतिशय जीर्ण पोथीसारखी आहे. पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांची तीच अवस्था आहे. त्याचादेखील पीई अतिशय आकर्षक आहे. सरकारी धोरण लकव्याच्या व चढय़ा व्याजदराच्या या कंपन्या बळी आहेत. तिच गोष्ट सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांची या कंपन्यांची अवस्था सरकारच्या लोकानुनयामुळे उसाच्या चिपाडासारखी झाली आहे. इंडियन ऑइलची अवस्था दात काढलेल्या सिंहासारखी झाली आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की, निव्वळ ‘व्हॅल्यू इन्व्हेिस्टग’ हाच निकष वापरला तर निर्देशांक उच्चांकाच्या जवळ जरी असला तरी आजही मूठभर कंपन्या वगळता सगळ्याच कंपन्यांचे मूल्य आकर्षक आहे. आणि मे २०१४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिकनिवडणुकीनंतर हे चित्र पालटेल अशी सर्वाना आशा आहे. आयसीआयसीआय प्रु. याच विचारधारेची असल्यामुळे ही शृंखला विक्रीसाठी आणली असावी; परंतु तीन वर्षांत सरकारी गलथानपणाच्या बळी ठरलेल्या या कंपन्या रुळावर येतील, असे म्हणणे हा आंधळा आशावाद ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतात एसबीआय म्युच्युअल फंड यूटीआय म्युच्युअल फंडसारख्या मोठय़ा मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी कधी ना कधी आपल्या मुदतबंद योजना मुदतपूर्तीनंतर खुल्या केल्या आहेत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे मुदतपूर्तीच्या वेळी पुरेशा परताव्याची पूर्ती न करणे हे आहे. कदाचित ही योजना पूर्तीनंतर हाच मार्ग स्वीकारेल असे वाटते. ‘लोकसत्ता – अर्थवृत्तान्त’ नेहमीच गुंतवणूकदारांना धोक्याची जाणीव करून देण्याच्या भूमिकेतून प्रबोधन करते. या फंड विश्लेषणातूनही हेच अधोरेखित करत आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा