या लेखमालेबरोबर प्रवासाचे एक वर्ष संपले. बावन्न भागांची ओंजळ रिती केली. वर्षांपूर्वी बाजाराला निराशेने ग्रासले होते तेव्हा या स्तंभास प्रारंभ झाला. सुरूवात ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कंपन्यांनी केली. कारण हे क्षेत्र गुंतवणुकीसाठी नेहमीच सुरक्षित समजले जाते. याच वेळेला रिझव्र्ह बँकेचे तिमाही धोरण आले. त्या निमित्ताने तीन भाग या विषयावर लिहून कुठल्याही निर्देशांकात २५% हून अधिक बँकांना स्थान असल्यामुळे बँकांचे गुंतवणुकीतील महत्त्व अधोरेखित केले. फेब्रुवारी-मार्चमध्ये उत्तर प्रदेशमधील निवडणुकांमुळे प्रथमच २८ फेब्रुवारीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा मुहूर्त टळला. मार्च महिन्यात दोन दिवसांच्या फरकाने रिझव्र्ह बँकेचे पतधोरण व अर्थसंकल्प या दोन महत्वाच्या घटनांचा परिणाम बाजारावर कसा दिसला याचे विवेचन केले. वर्षभरात ‘गुंतवणूक भान’मध्ये एकूण ७८ कंपन्यांवर विवेचन केले. पहिल्यांदामे महिन्यात एक सूत्र धरून, कायम गुंतवणुकीत ठेवाव्या अशा १२ कंपन्या निवडून त्या कंपन्यांबद्दल लिहिले. जुल महिन्यात श्रावणाच्या आगमनाप्रीत्यर्थ ‘मिडकॅप’ हा विषय घेऊन २० शेअर्सची शिवामूठ वाहिली. ही लेखमाला म्हणजे आधीच्या लेखांप्रमाणे एखाद्या कंपनीचे सखोल चिंतन नसून इतर ठिकाणी ज्या प्रमाणे ‘टीप्स’ दिल्या जातात तसे सवंग लेखन असल्याचे म्हणत काही सजग वाचकांकडून नापसंतीची मोहोर जरूर उमटली. ‘लोकसत्ता-अर्थवृतान्त’चे वेगळेपण जपून दर्जा राखण्याची आणि जबाबदारीची जाणीव अनेकांनी आपलेपणाने करून दिली. ‘मिडकॅपची ट्वेन्टी-२०’ झाल्यावर जिज्ञासू वाचकांनी ‘स्मॉलकॅप’चा आग्रह धरला. या गुंतवणुकीत जोखीम जास्त असते तेव्हा काय लिहावे काय लिहू नये याचा आराखडा ठरविण्यात काही दिवस गेल्यावर तब्बल ६०० कंपन्यांच्या चाळणीतून १२ कंपन्या निवडून स्मॉलकॅपची शृंखला पूर्ण झाली. वर्षभराच्या प्रवासात तीन संदर्भाच्या तीन बारीक चुका झाल्या. पण त्या वाचकांनी हेरल्या व सत्वर नजरेस आणून दिल्या. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये व डिसेंबरमध्ये प्रत्येकी एक सूत्र घेऊन लेखमाला गुंफली. लिहिताना नक्की कुठली भूमिका वठवावी असे प्रश्न मनात येत होते. फक्त विश्लेषकाच्या भूमिकेतून लेखाजोखा मांडावा की त्याहून अधिक काही करता येणे शक्य आहे का असा विचार मनात येतानाचं समर्थाच्या दासबोधातील ओवी आठवली- ‘आपणासी जे ठावे ते इतरांसी सांगावे, शहाणे करूण सोडावे अवघेजण.’
आजोबांनी रामदासी संप्रदायाचा अनुग्रह घेतला होता दासबोध वाचन हा त्यांच्या दिनचय्रेचा भाग असे. अशाच एका वाचनावेळी कानात पडलेली आणि स्मृतीत राहिलेली ही ओवी. ही ओवी गेल्या नऊ दहा महिन्यात या लेखनाचे सूत्र होते. २०-२२ वर्षांच्या अनुभवातून झालेले चिंतन या स्तंभातून मांडण्याची संधी खरोखर अनमोलच. या स्तंभाचे लेखन जेवढे सुटसुटीत राहिल, किचकटपणा कमी करता येईल पण त्याच वेळी आशयाला धक्का बसणार नाही आणि सोपे करत असताना दर्जा खालावणार नाही याची काळजी घेतली. कदाचित या कारणानेच ज्यांचा शेअरबाजार विषयाशी दुरान्वये संबंध नाही अशा अनेक गृहिणींनी, डॉ. राजगुरू यांच्या सारख्या सर्वार्थाने ज्येष्ठ असलेल्यांनी आवडल्याची थाप हुरूप देऊन गेली. वर्षभरात अनेक असे वाचक भेटले ज्यांनी या आधी शेअरमध्ये गुंतवणूक केली नव्हती पण हा स्तंभ वाचून या विषयात रस उत्पन्न झाला व गुंतवणूक करायला सुरवात केली. काही विद्यार्थी वाचक असे आहेत जे सध्या बीबीए किंवा एमबीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असून वर्गात शिकविलेल्या विषय इथे पडताळून पाहत होते; चर्चा करत होते, असे त्यांनी कळविले आहे. जळगाव जिल्ह्यातील एका महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागात भारतीय अर्थव्यवस्थेवरचे निवडक लेख सूचनाफलकावर लावून त्याचे सामुहिक वाचन करून त्यावर विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये चर्चा होत होत्या. या सर्वावर कळस चढविला तो मुंबईतून प्रसिद्ध होणाऱ्या इंग्रजी आíथक वर्तमानपत्राच्या एका विश्लेषकाच्या अभिप्रायाच्या मेलने. या वर्षी १ एप्रिल पासून बारावी पंचवार्षकि योजना लागू झाली. या पंचवार्षकि योजनेवरच्या लेखाने सामान्य वाचकांबरोबर या विषयातील तज्ज्ञांनी लेख आवडल्याचे कळविले. अशा विविध स्तरांवर काम करणाऱ्या वाचकांनी अभिप्राय देऊन लेखनातील रस टिकवून ठेवला. हे लेखन विषयाची साधना आणि भाषेच्या संस्कारांतून आकाराला आले. ज्ञानेश्वरांपासून संदीप खरे यांच्या एखाद्या कवितेने या स्तंभाची सुरुवात हे या स्तंभाचे वेगळेपण. तुकाराम महाराज, बोरकर, शांता शेळके, पाडगांवकर यांच्या कवितांचे हे यश होते. या कवितांच्या रूपकातून मांडलेला मुद्दा चटकन कळत असे सांगणारीही पत्रे आली. या कविता जनमानसात रुजल्या आहेत. शाळेत असताना एका तासाला शाळेतील शिक्षिका लोंढेबाई वर्गावर आल्या. हातात एक कवितेचे पुस्तक होते. त्या निवडक कविता त्यांनी वाचून दाखवल्या व नंतर विवेचन केले. पुढच्या यत्तेत बाई मराठी विषयाच्या शिक्षिका म्हणून रोजच भेटू लागल्या. त्यांनी दिलेला हा कवितांच्या प्रेमाचा वारसा पुढील आयुष्यात कायम साथीला राहिला. या लेखनाच्या निमित्ताने त्याचे प्रगटन झाले.
सकाळी उठल्यावर सर्वप्रथम कोलगेटने दंतमंजन करतो. ब्रुक बॉण्ड ताजमहाल चहा (िहद लिव्हर), नेस कॅफे (नेस्ले) पितो. पुरुष असेल तर पामोलिव्ह, गोदरेज किंवा जिलेट वापरून दाढी करतो. लक्स, पीअर्स किंवा रेक्सोना (िहद लिव्हर) हे साबण लावून आंघोळ करतो. अॅरो (अरिवद) किंवा लुई फिलीपचा (आदित्य बिर्ला नुव्हो) शर्ट व रेमण्डच्या कापडापासून शिवलेली पँट घालून मारुती किंवा बजाजच्या वाहनाने कामावर जातो. िहदुस्थान पेट्रोलियम किंवा इंडियन ऑईलच्या पंपावर पेट्रोल घेतो. दुपारी घरी सफोला तेल (मॅरिको) वापरून केलेले जेवण जेवतो. संध्याकाळी घरी जाताना स्टेट बँकेच्या किंवा कुठल्या तरी बँकेच्या एटीएममधून पसे काढतो. रात्री बाम लावून (अमृतांजन) झोपतो. दिवसभरात या रितीने अनेक कंपन्या आपल्या आयुष्याला स्पर्श करत असतात. या एका वर्षांच्या प्रवासात या कंपन्याकडे जनसामान्य गुंतवणुकीच्या दृष्टीने गांभीर्याने पाहात नाहीत. अनोळखी कंपन्यांचे शेअर घेण्यापेक्षा या रोजच्या जीवनातल्या कंपन्याचे शेअर घेणे कधीही श्रेयस्कर असते.
डिसेंबर महिन्यात केअरच्या खुल्या भागविक्रीवर लिहिले व या शेअरची नोंदणी २५% अधिमूल्याने झाली ही बाब समाधान देऊन गेली, अर्थात कुणा वाचकांना भागविक्रीतून शेअर हाती पडले असल्यास हे दुहेरी समाधान ठरेल.
गुंतवणूकभान : जोडोनिया धन..
या लेखमालेबरोबर प्रवासाचे एक वर्ष संपले. बावन्न भागांची ओंजळ रिती केली. वर्षांपूर्वी बाजाराला निराशेने ग्रासले होते तेव्हा या स्तंभास प्रारंभ झाला. सुरूवात ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कंपन्यांनी केली. कारण हे क्षेत्र गुंतवणुकीसाठी नेहमीच सुरक्षित समजले जाते. याच वेळेला रिझव्र्ह बँकेचे तिमाही धोरण आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-12-2012 at 12:24 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important instruction on investment