सव्वा टक्क्यांची दर कपात करूनही अर्थव्यवस्थेला म्हणावी तशी चालना मिळालेली नाही. याचे एक कारण सतत दुसऱ्या वर्षी पडलेला अपुरा पाऊस हे होय. म्हणूनच आता  अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी दर कपातीच्या पलीकडे जाऊन अन्य साधनांना डॉक्टर विचारात घेतील, अशी दाट शक्यता आहे..

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ पुन्हा एकदा जागा होऊन विक्रमादित्यास प्रश्न विचारू लागला – ‘राजा उद्या डॉक्टर आíथक वर्ष २०१७ साठीचे पतधोरण जाहीर करणार आहेत. तुझ्या मते उद्या व्याजदर कपात संभवते का?’

वेताळ म्हणाला, ‘ठाऊक असूनही तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील.’

राजा उत्तरादाखल म्हणाला, ‘मागील शुक्रवारी सुरू झालेले नवीन आíथक वर्ष व पुढील शुक्रवारी सुरूहोणारे नवीन िहदू वर्ष यादरम्यान उद्या रिझव्‍‌र्ह बँक वार्षकि पतधोरण जाहीर करणार आहे. डॉक्टर रघुराम राजन यांना रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरचे पद सांभाळून तीस महिने आजच पूर्ण झाले आहेत व शेवटचे सहा महिने शिल्लक आहेत. ४ सप्टेंबर २०१३ रोजी पदग्रहण करतानाच डॉक्टरांना चलन वावटळीला तोंड द्यावे लागले होते. चलन स्थर्याला सर्वोच्च प्राथमिकता देत घसरणाऱ्या चलनाला त्यांनी काबूत आणले. २०१४ मध्ये उभरत्या अर्थव्यवस्थांच्या चलनात रुपयाची कामगिरी सर्वात अव्वल ठरली ती डॉक्टरांमुळेच. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नाची शिकस्त केली. आता महागाई नियंत्रणात आली आहे. जानेवारी २०१५ पासून सव्वा टक्क्याची दर कपात केल्यानंतर या वर्षभरात डॉक्टर अध्र्या ते पाऊण टक्क्याची व्याज दरकपात करतील अशी आशा अर्थ-उद्योगातील धुरीणांना लागून राहिली आहे. परंतु सव्वा टक्क्यांची दर कपात करूनही अर्थव्यवस्थेला म्हणावी तशी चालना मिळालेली नाही. याचे एक कारण सतत दुसऱ्या वर्षी पडलेला अपुरा पाऊस हे होय. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आता डॉक्टर दर कपातीच्या पलीकडे जाऊन अन्य साधनांचा विचार करतील.’

‘रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर कपात करूनदेखील बँकांनी कर्जाच्या व्याजदरात कपात केली नाही म्हणून डॉक्टर बँकावर नाराज आहेत. बँकांच्या अडचणी समजून घेऊन आणि डॉक्टरांची नाराजीही अवास्तव नाही हे जाणून अर्थमंत्र्यांनी अल्पबचत योजनांचे व्याजदर कमी केले. अन्नधान्याचा हमीभावही महागाई वाढणार नाही इतपतच सरकारने वाढविला आहे. ‘मनरेगा’मुळे या योजनेच्या लाभार्थ्यांच्या हातात महागाईचे इंधन असणार नाही याची काळजी सरकार घेत आहे हेसुद्धा डॉक्टरांचे यश म्हणावे लागेल. जानेवारी महिन्यात केंद्र सरकारच्या १० वष्रे रोख्यांच्या परताव्याचा दर ७.७२% होता. ३१ मार्च रोजी याच रोख्यांचा दर ७.४६% इतका घसरला आहे. केंद्र सरकार हे देशातील सर्वात मोठे कर्जदार आहे. त्यांच्या व्याजदरात इतका फरक पडला; परंतु सामान्य कर्जदाराच्या व्याजदरात बिलकुल कपात झाली नाही. डॉक्टरांचा आक्षेप आहे तो सामान्य माणसाला गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त व्हावे म्हणून. ऊर्जति पटेल समितीने व्याजदराचे संक्रमण दोन टप्प्यांत व्हावे अशी सूचना आपल्या अहवालात केली होती. पहिला टप्प्यातील यशस्वी संक्रमणानंतर आता दुसऱ्या टप्प्यात १४ दिवसांचा टर्म रेपो व एसएलआर अर्थात वैधानिक रोखता प्रमाण हे डॉक्टरांच्या रडारवर असतील. सध्या रेपो व रिव्हर्स रेपो यांच्यातील असलेला एक टक्क्यांचा फरक कमी होऊन अर्धा टक्के होणे अपेक्षित आहे. १४ दिवसांच्या टर्म रेपोचे सौदे एनडीएस-ओएम या मंचावर होतात. या मंचावरील १४ दिवसांच्या टर्म रेपोचे सौदे रेपोदराच्या जवळपास व्हावे असे रिझव्‍‌र्ह बँकेला वाटते. या मार्च महिन्यात आंतरबँक व्याजदरात मोठे चढ उतार झाले नाहीत. कारण रिझव्‍‌र्ह बँकेने मोठय़ा प्रमाणात रोकड सुलभता उपलब्ध करून दिली. बँकांना वर्षअखेर येणाऱ्या मागणीचा सामना करता यावा यासाठी जवळजवळ १० हजार कोटींची उपब्धता रिझव्‍‌र्ह बँकेने करून दिल्याने दर वर्षी प्रमाणे व्याजदरात फारसे चढ उतार या वर्षी दिसून आले नाहीत. याचा परिणाम लिक्विड फंडांच्या परताव्यात सुधारणा होण्यात झाला,’’ राजाने सांगितले.

‘उद्याच्या पतधोरणात रेपो दर कपातीच्या जोडीलाच अन्य धोरणांचा डॉक्टर विचार करतील हे नक्की,’ राजाने पुस्ती जोडली.

gajrachipungi@gmail.com

Story img Loader