कोठून येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
काय बोचते ते समजेना
हृदयाच्या अंतर्हृदयाला
येथे नाही तेथे नाही
काय पाहिजे मिळवायला?
कोणीकडे हा झुकतो वारा?
हाक मारी जीव कुणाला?
मुक्या मनाचे मुके बोल हे
घरे पडती पण हृदयाला
तीव्र वेदना करिती, परी ती
दिव्य औषधी कसली त्याला!
‘कोठून येते मला कळेना’ बालकवींची एक सुंदर कविता. त्यांच्या नेहमीच्या कवितांपेक्षा वेगळी. आजच्या लेखात बाजाराला जडललेल्या उदासीनतेचेच विवेचन आहे आणि म्हणूनच ही कविता. बाजाराला आलेल्या उदासीनतेची कारणे स्पष्ट आहेत. गेल्या २० सत्रांचा विचार केल्यास, सेन्सेन्क्सचा सर्वोच्च बंद भाव ९ ऑक्टोबरला १८,९०२.४१ या पातळीवर तर १५ नोव्हेंबरला १८,३०९.३७ या नीचांकावर होता. म्हणजे साधारण ५९३ अंशाची घसरण झाली. नोव्हेंबर महिना संपायला आठवडा बाकी आहे. येत्या आठवड्यात सेन्सेक्स नवीन नीचांकावर बंद होताना दिसेल. लोकसभेत ४९ तर राज्यसभेत ४७ विधेयके मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यात बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाची प्रत्यक्ष करसंहिता, वस्तू व सेवा कर, बँकिंग कायदे (सुधारणा २०११) ही विधेयके आहेत. संसदेच्या चालू अधिवेशनात लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या २० बठका होणे अपेक्षित असून वर उल्लेख केलेली महत्वाची विधेयके मंजूर होण्यासाठी सरकार किती विधेयके मंजूर करून कायद्यात रुपांतर करते यावर बाजाराची सकारात्मकता ठरेल. पण गेल्या काही वर्षांची परंपरा बघता या अधिवेशनात विशेष काही घडेल असे वाटत नाही. बँकिंग कायदे (सुधारणा २०११) हे विधेयक मंजूर झाल्यानंतर सात ते आठ महिन्यात नवीन बँकिंग परवाने वितरीत होतील. गेल्या दीड दोन महिन्यात ४०% हून अधिक वाढ झालेली बजाज फायनान्स आणि १००% वाढलेली एल अॅण्ड टी फायनान्स होल्डिंग या कंपन्या जानेवारी २०१४ मध्ये बँका झालेल्या दिसतील याच आशेने वर गेल्या आहेत. काही कारणाने विधेयकांची मंजूरी लांबली तर उदासीनतेतून हे समभाग खाली येऊ शकतात. ही उदासीनता आणखी महिनाभर तरी राहील अशी चिन्हे दिसत आहेत. तेव्हा नवीन खरेदी सध्या नको असे सुचावावेसे वाटते. जर बँकिंग कायदे (सुधारणा २०११) हे विधेयक मंजूर झाले तर रिझव्र्ह बँकेला मिळणारे अधिकार आणि त्याचे बँकिंग व्यवसायावर होणारे परिणाम यांची चर्चा भविष्यात करूच.
गोदरेज इंडस्ट्रीज म्हणजे आधीची गोदरेज सोप्स लिमिटेड, या कंपनीतील ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन (आंघोळीचे साबण व गृह स्वच्छतेसाठी वापरावयाची द्रावणे) वेगळी काढून गोदरेज कन्झ्युमर केअर झाली, गोदरेज सोपमधील उरलेले व्यवसाय व उपकंपन्या १ एप्रिल २००१ पासून गोदरेज इंडस्ट्रीजमध्ये आले. या कंपनीच्या व्यवसायाचे प्रमुख दोन भाग पडतात. स्वत:चे व्यवसाय व उपकंपनी मार्फत चालणारे व्यवसाय. रसायने, पशूखाद्य, खाद्य पेय, कुक्कुट खाद्य, गुंतवणूक हे गोदरेज चे स्वत:चे व्यवसाय, तर स्थावर मालमत्ता विकास, ग्राहकोपयोगी वस्तू, बिस्किटे-चॉकलेट हे उपकंपनीमार्फत चालणारे व्यवसाय. या कंपनीचे भारतात मुंबईत विक्रोळी आणि गुजरातमध्ये वालिया येथे दोन कारखाने आहेत. परदेशात ४८ देशात या कंपनीची उत्पादने विकली जातात.
कंपनीचे अर्धवार्षकि निकाल उत्तम आहेत. विक्रीत ४०% वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत रु. १९४६ कोटींच्या विक्रीवर रु. ६८ कोटीचा नफा झाला आहे. हा नफा गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ६%ने कमी झाला आहे. वाढलेले व्याजदर व खाद्यतेल व्यवसायात कमी झालेली नफाक्षमता याचे कारण आहे. याच तिमाहीत गोदरेज इंडस्ट्रीजने गोदरेज हार्शले या चोकलेट व खाद्य पदार्थ व्यवसायातील ५०:५० धाटणीच्या संयुक्त प्रकल्पातील ४३% भागभांडवल हार्शलेला विकले असून हा सौदा मार्च २०१३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. सौदा पूर्ण झाल्यावर उर्वरित ७% हिस्सा विकून टाकून या व्यवसायातून कंपनी बाहेर पडणार आहे. फॅटी अॅसिड व फॅटी अल्कोहोल हा एकूण विक्रीच्या २२% हिस्सा असलेला व्यवसाय आहे. गोदरेज इंडस्ट्रीज या व्यवसायात भारतातील अव्वल क्रमांक राखून असून जगातील तिसऱ्या क्रमांकाचा उत्पादक आहे. हा व्यवसाय गेल्या चार वर्षांत १७% दराने वाढत आहे. एकूण नफ्यात हा व्यवसाय १०% हिस्सा राखून आहे. या उत्पादनातले अडथळे (Bottlenecks) काढून टाकण्याचे काम सुरु असून येत्या तीन महिन्यात जादा नफा देणारी उत्पादने (Product Mix) अधिक तयार केली जातील. त्यामुळे विक्रीच्या ३५% तर नफ्यात १६% वाटा या व्यवसायाचा असेल. बाजारात कितीही उदासीनता असली तरी हा शेअर वर्षभरात १०-१५% परतावा सहज देऊ शकेल.
गोदरेज इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक करण्याची कारणे :
* वाणिज्य इमारती व गृहबांघणी प्रकल्प क्षेत्रातील गोदरेज प्रॉपर्टीज शेअर बाजारात स्वतंत्र नोंदणी झालेली कंपनी आहे. (गोदरेज इंडस्ट्रीजची ६१.५०% मालकी)
* अभियांत्रिकी : अवकाशयान, चांद्रयान मोहिमेत इस्त्रोचे प्रमुख कंत्राटदार म्हणून सहभाग. अवजड अभियांत्रिकी यात पुलाचे गर्डर, रसायने साठवणूक टाक्या या सारख्या अभियांत्रिकी कौशल्याची कामे.
* गृहसजावट, कार्यालयीन आणि गृहोपयोगी सामानाची निर्मिती व विक्री. गृह व ऑफिस सजावटीचे प्रकल्प
* रसायने, वस्त्रनिर्मिती, तेल शुद्धीकरण, अन्न प्रक्रिया आदी १५ वेगवेगळ्या उद्योगांत वापरल्या जाणाऱ्या रसायनांची निर्मिती व देशांतर्गत विक्री व ४८ देशात निर्यात. १९९९-२००१ या काळात निर्यातीसाठीचे पारितोषक.
* गोदरेज नेचर्स बास्केट, फळे, भाज्या, मांस व चिकन तसेच बेकरी उत्पादने, बीयर, वाईन, चॉकलेट, आलं-लसूण पेस्ट अशा वेगवेगळ्या अन्न पदार्थाची विक्री करणाऱ्या दुकानांची साखळी (गोदरेज इंडस्ट्रीजची १००% मालकी)
* गोदरेज अग्रोवेट : पशुखाद्य, क्कुकुटखाद्य, मिरची ज्वारी संकरीत बियाणे (गोदरेज इंडस्ट्रीजची ७२.२०% मालकी)
* गोदरेज कन्झ्युमर केअर : ही कंपनी या स्तंभातील मिडकॅप मालिकेत आपण चर्चिली आहे. (गोदरेज इंडस्ट्रीजची २१.६०% मालकी)
* गुतंवणूक : या व्यवसायातून एकूण उत्पन्नाच्या २% उत्पन्न मिळते.
या विषयावर लेखमाला लिहायचे ठरले. पण चार कंपन्या कोणत्या असाव्यात हे नक्की होत नव्हते. कारण रिलायन्स इंडस्ट्रीज शिवाय या सूत्राला पूर्णत्व आले नसते, सध्याच्या परिस्थितीत रिलायन्स नवीन गुंतवणुकीसाठी टाळावा असे मत आहे. पुण्याचे ‘लोकसत्ता-अर्थ वृत्तान्त’चे वाचक प्रशांत रेठेरेकर यांनी ही अडचण बोलून दाखविली आणि त्यांनीच आजची कंपनी सुचविली. त्यामुळेच हे सूत्र आकाराला येऊ शकले. यासाठी त्यांना धन्यवाद. त्यांच्याप्रमाणेच मुंबईतील हेमंत बर्वे, नितीन दळवी, सचिन मुळे व कोल्हापूरचे प्रा. जयदीप बागी हे वाचक वेळोवेळी मोलाची भर घालत असतात. त्यांचेही आभार. डिसेंबर महिन्यातील चार कंपन्यांच्या नव्या सूत्रातील पहिली कंपनी कावेरी सीड्स येत्या सोमवारी.
गुंतवणूकभान : असला उदासीन बाजार तरीही..
कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला येथे नाही तेथे नाही काय पाहिजे मिळवायला?
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-11-2012 at 12:26 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indifferent share market