डॉ. आशीष थत्ते
उत्तम औद्योगिक संबंध राखणे हे मनुष्यबळ विभागाचे महत्त्वाचे काम असते आणि भविष्यात देखील असेल. आपण मागे एका लेखामध्ये याचा ओझरता उल्लेख बघितला होता. आता याला कॉर्पोरेट रिलेशन्स किंवा कॉर्पोरेट कम्युनिकेशन असे देखील संबोधले जाते. याचा मुख्य उद्देश कंपनीमधील लोकांशी चांगले संबंध ठेवणे आणि ते अधिक सुदृढ होतील याकडे लक्ष्य देणे असते. याचबरोबर बाहेरील लोकांशी संबंध ठेवणे आणि कंपनीची प्रतिमा उजळत ठेवणे हे सुद्धा एक महत्त्वाचे काम असते. कंपन्यांच्या वस्तू व सेवा विकण्यावर याचा चांगला परिणाम होतो, त्यांची बाजारातील पत सुधारते, इतर लोक देखील चांगल्या प्रतिमेकडे जातात आणि सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूकदार मोठय़ा प्रमाणात आकर्षित होतात. कंपन्यांमध्ये या कामासाठी वेगळी माणसे किंवा वेगळे विभाग कार्यरत असतात. विशेषत: माध्यमांमध्ये पूर्वी काम केलेल्या लोकांना या विभागामध्ये काम करण्यासाठी प्राधान्य दिले जाते.
अर्थात कंपनीशी संबंधित माहिती झाली. मात्र आपण देखील बरेचसे असे काही तरी करून जगाशी असणारे किंवा आपण ज्या समाजामध्ये राहतो त्यामध्ये आपली एक प्रतिमा जपायचा प्रयत्न करतो. अगदी माणसे नेमून नाही. पण आपण प्रयत्न निश्चित करतो. आपले अनेक लोकांशी कामानिमित्त, सामाजिक कार्यात खूपदा संबंध येतात. पूर्वीच्या काळी बरीच मुले असणे म्हणजे त्यांच्या लग्नाची काळजी असायची. त्यामुळे आपली एक प्रतिमा निर्माण करण्यावर भर दिला जायचा. सध्या लग्न संस्था थोडीशी कमकुवत झाली असल्यामुळे कुटुंब म्हणून संबंध ठेवण्यापेक्षा वैयक्तिक प्रतिमा जपण्यावर अधिक भर दिला जातो. मात्र प्रत्यक्ष समाजापेक्षा समाजमाध्यमांमध्ये ही प्रतिमा जपण्याची चढाओढ जरा जास्त असते. कारण हल्ली पूर्वीसारखे लोक वेगवगेळय़ा समारंभासाठी किंवा एकत्रित भेटत नाही. आपली भेट किंवा अलीकडील उपलब्धी कुणाला तरी सांगण्यापेक्षा समाजमाध्यमांमध्ये ते सहज टाकले जाते. म्हणजे पूर्वीसारखेच सामाजिक संबंध जपतो फक्त त्याचे स्वरूप आता बदलले आहे.
व्यवस्थापनाचा हा महत्त्वाचा भाग कंपन्यांमध्ये औपचारिकरीत्या केला जातो. आपल्याकडे तो मात्र काही प्रमाणात औपचारिक आणि काही प्रमाणात अनवधानानेच होतो. अजून काही वर्षांनी कुटुंबाची समाज माध्यमामध्ये प्रोफाइल वगैरे असणे सुरू झाल्यास त्यात फार काही आश्चर्य वाटायला नको. तेव्हा व्यवस्थापनामध्ये ज्या प्रकारे विशेष प्रयत्न करून औद्योगिक संबंध जपले आणि वाढवले जातात त्याप्रमाणे आपण देखील प्रयत्न करून आपले सामाजिक संबंध वाढवावेत विशेषत: कुटुंब म्हणून.
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत /
ashishpthatte@gmail. Com