सचिन रोहेकर
उद्योजकतेसाठी विशिष्ट मानसिकता आणि वकूब असावाच लागतो. उद्योजक जर पहिल्या पिढीचा असेल तर विशेष गुणसंपदा आणि शिक्षण-प्रशिक्षणही महत्त्वाची भूमिका बजावतात. पण प्रत्यक्षात हे असेच आणि यासारखेच प्रत्येक वेळी घडतेच असे नाही. पदवीपर्यंतचे शिक्षण झाले एक आणि व्यवसाय क्षेत्र निवडले दुसरेच असेही अनुभवास येते. रसायन अभियांत्रिकीत पदवीचे शिक्षण घेतलेले समीर पाथरे यांच्या बाबतीत हे घडले आहे. घेतलेल्या शिक्षणाच्या विपरीत त्यांचा व्यवसाय हा प्रत्यक्षात शेती आणि मातीच्या रसायनमुक्ततेच्या ध्यासाने आकाराला आला आहे. संशोधनावर आधारित अशी विविध ५० उत्पादने आजवर पाथरे यांच्या स्वरूप अॅग्रोकेमिकल इंडस्ट्रीजने विकसित केली. यातील तीन उत्पादनांना पेटंट मिळवून त्यांनी आपली संशोधनात्मक श्रमही दाखवून दिले आहे.
काही उद्योग हे विशिष्ट क्षेत्रातील आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय घटकांद्वारे जन्म घेताना दिसतात. शेतीचेच पाहा आर्थिक विकासात तिची एक महत्त्वाची भूमिका आहे. तरी विविध प्रकारच्या जोखीम आणि संभाव्य धोके यामुळे शेती व्यवसायात वाढलेली अनिश्चितता पाहता ती अत्यंत बेभरवशाचीही बनली आहे. परंतु समीर पाथरे यांनी सांगितल्याप्रमाणे, शेतीतील अनिश्चितता ही शेतीसंलग्न व्यवसायांना असलेली मोठी जोखीमही म्हणता येईल आणि दुसऱ्या अंगाने पाहायचे झाल्यास ती संधीही ठरते. पिकांचे कीड, कीटक, रोगांच्या हल्ल्यापासून संरक्षण आणि उपलब्ध जमिनीत अधिकाधिक उत्पादन घेता यावे यासाठी कृषी रसायनांच्या व्यवसायाला आलेली बरकतही याच कारणाने दिसून येते. भारतातील ही पीकरक्षक कृषी रसायनांची बाजारपेठ तब्बल ४५ हजार कोटींच्या घरात जाणारी आहे.
मुंबईत इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये रसायन अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यावर, समीर पाथरे यांनी शिरस्त्याप्रमाणे नोकरीला सुरुवात केली. औषधी निर्माण क्षेत्रातील सिप्ला या कंपनीच्या बल्क ड्रग्ज उत्पादन विभागात ते व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. चांगले वेतनमान आणि उत्कर्षांला भरपूर संधी असलेली नोकरी होती. समीर यांचे वडील राजन पाथरे यांना मात्र या रुळलेल्या वाटेनेच मुलाने जावे हे पसंत नव्हते. अर्थात ते स्वत: कोकणातील घर सोडून मुंबईत बँकेत नोकरीसाठी आले होते. समीर पाथरे सांगतात, ‘‘मोठय़ा बंधूंप्रमाणे मीही नोकरी न करता व्यवसायच करावा, हा वडिलांचा आग्रह. त्यांचा मान राखणारा निर्णय घेणे अत्यंत जड गेले. पण त्यासमयी वेळीच दाखविलेले धाडस हीच माझ्या आयुष्याला मिळालेली महत्त्वाची कलाटणी ठरली. किंबहुना माझ्यातील उद्योजकाच्या घडणीचे श्रेय हे सर्वस्वी वडिलांचेच म्हटल्यास वावगे ठरणार नाही.’’
आधुनिक शेती आणि बागायतीचा यशस्वी प्रयोगांचा नमुना असलेल्या नाशिकची कर्मभूमी म्हणून निवडही योगायोगानेच झाली. भावाने तेथे अभियांत्रिकी वस्तूंच्या व्यवसायात जम बसविला असल्याने समीर पाथरेही नाशिककडेच वळले. सुरुवात द्राक्ष बागायतदारांना व्यापारासाठी आणि द्राक्षांच्या निर्यातक्षम पॅकिंगसाठी मदत करणाऱ्या व्यवसायातून झाली. बाजारपेठेची ओळख, त्यातील खाचा-खोचांचा परिचय या दोन वर्षांंनी मिळवून दिला आणि गाठीशी बऱ्यापैकी भांडवलही जमा झाले. त्याच्या बळावर मग १९९५ साली ‘स्वरूप’ या नाममुद्रेने स्व-निर्मित उत्पादने बाजारात आणण्याचे पाथरे यांनी पाऊल टाकले. शेतीसंलग्न व्यवसायातील एक मोठी गोम अशी की, मोठय़ा परिश्रमाने विकसित केलेले उत्पादन हे अस्सल लाभार्थी म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे तितकेच आव्हानात्मक असते. बाजारात उपलब्ध अनेक स्वस्त आणि निकृष्ठ उत्पादनांच्या भाऊगर्दीत आपल्या उत्पादनाचे वेगळेपण, त्याचे दीघरेद्देशी लाभ हे शेतकऱ्याला पटविणारी यंत्रणा हवी. अर्थात प्रस्थापित वितरक-विक्रेत्यांच्या जाळ्यातून काही चांगले लोक हेरण्याचे कसब अंगी असायला हवे. प्रारंभीच्या काळात स्वत: खस्ता खाल्ल्या असल्याने या अंगाने सुरुवातीचा कालावधी वगळता आता सारे सुरळीत जुळून आले असून, आज स्वरूप अॅग्रोने देशातील २० राज्यांमध्ये ५,००० हून अधिक विक्रेत्यांचे जाळे रचण्यात यश मिळविले आहे.
भारतीय शेतीपुढे सध्या लागवड क्षेत्रात उत्तरोत्तर घट, शिवाराच्या आकारमानात घट, नवनवीन प्रकारच्या कीटकांचे वाढते हल्ले आणि प्रति हेक्टरी घटत जाणारे पीक अशी अनेकांगी आव्हाने आहेत. यासारख्या गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याने कृषी-रसायनांच्या मागणीही शेतकऱ्यांकडून अर्थातच वाढत आहे. परंतु त्यांच्या वापरातून तात्पुरत्या फायदा होईल, पण शेतजमिनीचे कायमचे नुकसान होण्याचे नवे संकट उभे ठाकले. अशा या दोन्ही आव्हानांची दखल घेत, स्वरूप अॅग्रोकेमिकलने तिची उत्पादने ही अधिकाधिक सेंद्रिय आणि जैविक घटकांनी युक्त असतील यावर लक्ष दिले. बाजारात आज जैविक संजीवके नावाखाली विविध प्रकार विकले जातात. स्वरूप अॅग्रोने मात्र गुणवत्तेशी तडजोड न करता ‘नोका’ संस्थेकडून आवश्यक सेंद्रिय प्रमाणीकरण मिळविले आहे. इतकेच नव्हे तर आजवर तीन उत्पादनांसाठी एकस्व अधिकार अर्थात पेटंटही मिळविले आहे, तर चौथे उत्पादन त्या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आहे.
पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त तसेच मुळांच्या कीडरोधक पोषकतेसाठी आणि मुख्य म्हणजे केरळ ते काश्मीपर्यंत सर्व प्रकारच्या पिकांसाठी वापरात येणारे ‘जी-५ दाणेदार’ हे एकस्व अधिकार असलेले कंपनीचे पहिले उत्पादन. २००५ साली ते कंपनीने मिळविले. पोटॅशियम ह्य़ुमेटमुळे जमिनीतील क्षारांचे व्यवस्थापन होते. लाभदायक सूक्ष्मजीव, सेंद्रिय कर्ब यातून पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते. मात्र यापूर्वी चूर्ण अथवा द्रवरूपात असलेले पोटॅशियम ह्य़ुमेट हे अधिक विश्वासार्ह जेलरूपात आणणारे ह्य़ुमिजेल या उत्पादनाने दुसरा एकस्व अधिकार कंपनीला मिळवून दिला. शिवाय ते काळ्या रंगात नसल्याने भेसळीला असणारा वाव संपुष्टात आणणे हे ह्य़ुमिजेलचे खास वैशिष्टय़ बनले. ही दोन उत्पादनेच कंपनीची सध्या सर्वाधिक खपाची उत्पादने असल्याचे पाथरे सांगतात. जीवाणूजन्य रोगापासून पिकाचे संरक्षण करणारे नॅनोतंत्रज्ञानावर आधारित इजिस हे कंपनीचे तिसरे पेटंटप्राप्त उत्पादन आहे. करपा, काळे डाग यावर परिणामकारक इजिस हे प्रामुख्याने डाळिंबावरील तेल्या रोगाच्या प्रतिबंधासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. सूत्रकृमींना रोखण्यासाठी व्हेटोनिमा या जैविक कीटनाशक उत्पादनाच्या पेटंटसाठी कंपनीने अर्ज सादर केला आहे. शिवाय नव्या पिढीच्या जैव-तंत्रज्ञानावर आधारित निरूपण मात्रा कंपनीने यशस्वीरित्या विकसित केली आहे. ज्यामध्ये भाताच्या लोंब्यांमध्ये सापडणाऱ्या नैसर्गिक सिलिकाचा वापर होऊ घातला आहे. प्रतीक्षेत असलेली ही नवीन उत्पादने कंपनीच्या आगामी विस्तार उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या दिशेने भक्कम पाया रचणारी असतील, असे पाथरे यांनी सांगितले.
व्यवसाय विस्ताराच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कंपनीने अलीकडेच कोईम्बतूर, तामिळनाडू येथील कंपनी अधिग्रहित केली आणि त्यांच्या तेथील प्रकल्पातून जैविक खतांचे उत्पादन सुरू केले आहे. शिवाय विद्राव्य खतांच्या विकासासाठी नव्या कंपनीची पायाभरणी या निमित्ताने झाली आहे. सध्या चीनमधून तब्बल ९० टक्क्यांच्या घरात या प्रकारच्या खतांची आयात होते. हे आयात पर्यायी उत्पादन असल्याने त्याला ‘स्वधन’ असे समर्पक नामाभिधान दिले गेले आहे. येत्या काळात देशाच्या सर्व राज्यात अस्तित्व विस्तारून, आंतरराष्ट्रीय स्तरावर वितरण भागीदारीचे प्रयत्न कंपनीने सुरू केले आहेत. सध्या थायलंड आणि युगांडा, केनिया यांसारख्या आफ्रिकी देशांमध्ये स्वरूपची उत्पादने पोहोचली आहेत. व्हिएतनाम, श्रीलंका, नेपाळ, भूतान व बांगलादेशात या संबंधाने प्रक्रिया व वाटाघाटी सुरू आहेत. आगामी काही वर्षांत २० ते २५ टक्के दराने वाढीसह, २०२४ सालात १०० कोटींची उलाढाल आणि सध्याच्या तुलनेत निर्यात दुपटीवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. चालू वर्षांत चांगल्या पर्जन्यमानामुळे ते आवाक्यात असल्याचे दिसून येते, असे पाथरे यांनी स्पष्ट केले.
नाशिक ग्रामीण क्षेत्रातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये समीर पाथरे हिरिरीने सहभाग घेतात. त्यांचे संकेतस्थळ हे शेतीविषयक शिक्षणाचे व्यासपीठ आहेच, शिवाय ‘किसान हेल्पलाइन’ नावाने ते नि:शुल्क मार्गदर्शक वाहिनीही चालवितात. शेती आणि शेतकरी जगला तरच आपला व्यवसायही तग धरेल याची जाणीव ठेवूनच मातीतील हा शोधक पेरा कायम सुरू राहणार आहे.
समीर राजन पाथरे
स्वरूप अॅग्रोकेमिकल्स इंडस्ट्रीज, नाशिक
’ व्यवसाय : जैविक संजीवके, खते, कीटकनाशक
’ कार्यान्वयन : १९९५ साली
’ सध्याची वार्षिक उलाढाल : ८० कोटी रुपये
’ रोजगार : २७० कामगार-कर्मचारी थेट सेवेत
’ संकेतस्थळ : http://www.swaroopagro.com