श्रीकांत कुवळेकर ksrikant10@gmail.com
मागील पंधरवडय़ात या स्तंभामधून रशिया आणि युक्रेनमधील युद्धपूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर खाद्य आणि खनिज तेल महागाईबाबत संभवणाऱ्या शोचनीय परिस्थितीची कल्पना दिली होती. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये युद्ध टाळण्याची थोडीशी आशा जिवंत होती. परंतु गेल्या दहा दिवसांत परिस्थिती संपूर्ण बदलली आहे. खरे तर युद्ध चालू होऊन परिस्थिती आता हाताबाहेर गेली आहे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. युद्ध दोन देशांमध्ये चालले असले तरी आजच्या जागतिक परावलंबित्वाच्या जमान्यात सर्वच देश त्यात कमी-अधिक प्रमाणात भाजून निघत आहेत. दोन तीन वर्षे करोनाचे घाव सोसून अर्थव्यवस्था रुळावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच भारतासहित अनेक देशांना युद्धामुळे महागाई नावाच्या अधिक भयंकर संकटाचा सामना करावा लागत आहे.
खनिज तेलाकडून शंभरी पार केली जाण्याची शक्यता मागील लेखात व्यक्त केली होती. पण आत्ताच ते १२० डॉलरजवळ पोहोचले असून जागतिक परिस्थितीचा विचार करता अजून १०-२० डॉलरची वाढ हा केवळ उपचार राहिला आहे. एकंदरीत पाहता सर्वच कमॉडिटीजच्या किमती शब्दश: गगनाला भिडल्या आहेत. तर युद्धाचे शेपूट लांबतच चालले असल्यामुळे नेमकी परिस्थिती काय राहील याबाबत अंदाज व्यक्त करणे देखील शक्य राहिलेले नाही. कमॉडिटी बाजारातील परिस्थिती आयातनिर्भर अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांचे कंबरडे मोडणार आहे. भारताबद्दल बोलायचे तर खाद्यतेलातील महागाईबाबत पुरेशी जनजागृती झालेली असली तरी पोलाद, अल्युमिनियम, तांबे, निकेल, जस्त यांसारख्या धातूंच्या ५० ते ८० टक्के वाढलेल्या किमती पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्याना चांगल्याच मारक ठरणार असून परवडणाऱ्या घरांच्या किमती तसेच दररोजच्या जीवनातील वस्तूंच्या किमती देखील प्रचंड महाग होण्याची लक्षणे आहेत.
मुळात जगण्यासाठी किमान आवश्यक असणाऱ्या अन्नपदार्थाच्या किमती देखील जागतिक बाजारामध्ये आजवरचे सर्व विक्रम मोडताना दिसत असल्यामुळे जगातील ३०-३५ कोटी लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्नच निर्माण झालेला आहे. त्या तुलनेने भारतात परिस्थिती नक्कीच सुखावह आहे. याचे आर्थिक फायदे नाहीत, परंतु निदान याचे श्रेय तरी देशातील १५ कोटी शेतकऱ्यांना द्यायलाच लागेल. जगातील प्रमुख अन्न गहू आणि तांदूळ आहे. गव्हाच्या किमतीमध्ये अक्षरश: आग लागली आहे. मागील सहा महिन्यांत गव्हाच्या किमती जागतिक बाजारात ८० टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. मागील चार महिन्यांत त्या ६० टक्क्यांनी वाढलेल्या असल्या तरी मागील केवळ तीन आठवडय़ांत त्या ५० टक्के वाढल्या आहेत. रशिया आणि युक्रेनमधून गव्हाचा पुरवठा बंद झाल्यामुळे आणि त्यात लवकर सुधारणा होण्याची शक्यता नसल्यामुळे देखील ही तेजी आलेली आहे. त्या तुलनेत भारतात आजही घाऊक किंमत केवळ २०-२५ टक्के एवढीच वाढली असून आज चांगला गहू २३-२४ रुपये किलो किमतीमध्ये उपलब्ध आहे. तांदळाच्या किमती त्या मानाने फारशा वाढलेल्या नाहीत. डाळी आणि इतर धान्ये अजूनही परवडणाऱ्या भावात उपलब्ध आहेत. परंतु २०० दशलक्ष टन या विक्रमी उत्पादन पातळीपलीकडे जाऊनही दुधाच्या किमती देशात सतत वाढत आहेत.
खाद्यतेलामध्ये अजूनच विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील अनेक वर्षे सोयाबीन, मोहरी आणि सूर्यफूल तेलांमध्ये भेसळीसाठी मोठय़ा प्रमाणात वापरात असलेले पाम तेल आज या तेलांपेक्षा कितीतरी अधिक महाग झाले असल्यामुळे पामतेलात सोयातेल भेसळ करावे लागेल अशी परिस्थिती आहे. किरकोळ बाजारात मागील आठवडय़ाभरात खाद्यतेलाच्या किमती लिटरमागे २०-३० रुपये एवढय़ा प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. सहकारी भांडार तसेच अनेक ऑनलाइन बाजार खाद्यतेलाच्या प्रति ग्राहक खरेदीवर देखील मर्यादा घालताना दिसत आहेत.
परंतु वर दिलेल्या परिस्थितीला जर कुणी महागाईचा आगडोंब म्हणत असेल तर जरा थांबा. कारण येऊ घातलेल्या परिस्थितीला मग वणवाच म्हणावा लागेल. जरा विचार करा, भारतात पेट्रोल आणि डिझेलची शेवटची भाववाढ सुमारे चार महिन्यांपूर्वी झाली होती. त्यानंतर अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या किमती कृत्रिमपणे स्थिर ठेवल्या गेल्या आहेत. या काळात खनिज तेल ६७ डॉलर प्रतििपप वरून ८०-८५ टक्के वाढलेले आहे. १० मार्चला निवडणुकांचा निकाल लागल्यावर पेट्रोल, डिझेल, आणि स्वयंपाकाचा गॅस याच्या किरकोळ किमतींमध्ये एका नाही तर दोन-तीन टप्प्यांमध्ये निदान १२-१५ रुपये प्रति लिटर वाढ करावीच लागेल. अन्यथा सरकारी तेल कंपन्यांना प्रचंड आर्थिक तोटा सोसावा लागेल. एकदा का ही वाढ झाली की त्या अनुषंगाने वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये त्याचा परिणाम दिसेल.
केवळ अन्नपदार्थाच्या महागाईची आकडेवारी जागतिक पातळीवर प्रसारित करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि शेती संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मासिक अहवालानुसार फेब्रुवारी महिन्यात, म्हणजे युद्धपूर्व काळातच जागतिक अन्न महागाई निर्देशांक आजवरचे सर्व विक्रम मोडून १४०.७ अंकांवर पोहोचला आहे. फेब्रुवारीमध्ये यात सर्वात जास्त वाटा खाद्यतेले आणि डेअरी उत्पादनांचा राहिला असून इतरही पदार्थाचाही हातभार त्याला लागलेला आहे. मार्चमध्ये हाच आकडा अजून किती वाढेल याची सध्यातरी कल्पनाच केलेली बरी.
सरकारी महागाईचे आकडे हे बऱ्याचदा खरी परिस्थिती दर्शवत नाहीत. परंतु वरील आकडेवारीवरून येऊ घातलेल्या परिस्थितीचे आगाऊ आकलन होऊ शकेल. त्यामुळे थोडेसे फिल्मी वाटले तरी म्हणायला हरकत नाही की ‘महागाई.. अभी बाकी हैं दोस्तों.’ नाही म्हणायला भारतामध्ये खाद्यतेले वगळता फळे, भाजीपाला, धान्ये इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन देशाच्या विविध भागांत मोठय़ा प्रमाणावर होत असल्यामुळे तुलनात्मकदृष्टय़ा परिस्थिती आपसूकच नियंत्रणाखाली राहते. नाही तर आपलीही धडगतच नसती.
खाद्यतेलामध्ये विचित्रच परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील अनेक वर्षे सोयाबीन, मोहरी आणि सूर्यफूल तेलात भेसळीसाठी वापरात येणारे पाम तेल आज या तेलांपेक्षा कितीतरी अधिक महाग झाले आहे आणि पामतेलात सोयातेल भेसळ करावे लागेल
अशी परिस्थिती आहे. किरकोळ बाजारात मागील आठवडय़ाभरात खाद्यतेलाच्या किमती लिटरमागे २०-३० रुपये एवढय़ा प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत.
लेखक वस्तू बाजार विश्लेषक
अस्वीकरण : कमॉडिटी बाजार हा मुख्यत: जोखीम व्यवस्थापनासाठी असून वरील लेख या गोष्टीचे महत्त्व आणि त्यातील गणित विशद करून सांगण्यासाठी आहे, लेखाला गुंतवणुकीचा सल्ला मानण्यात येऊ नये.