‘ब्लू स्टार लिमिटेड’ ही भारतातील प्रमुख अभियांत्रिकी कंपनी आहे. ही कंपनी संपूर्ण इमारतीची वातानुकूलन यंत्रणा, खोलीत लावण्याची वातानुकूलन यंत्रे, व्यापारी तत्त्वावर अन्न साठविण्यासाठी वापरले जाणारे ‘डीप फ्रिजर’, ‘बॉटल कूलर’, ‘मल्टि कूलर’, ‘आयस्क्रिम कूलर’, औद्योगिक वापरासाठी असणारे ‘प्रोसेस चिलर’ आदी उत्पादने तयार करते. या व्यतिरिक्त ही कंपनी विविध प्रकल्पांसाठी निविदा भरून देशात तसेच विदेशात प्रकल्प पूर्ण करत असते. संपूर्ण इमारतींसाठी वापरली जाणारी वातानुकूल यंत्रणा अर्थात ‘सेन्ट्रलाईज्ड एअर कंडीशिनग’ या उत्पादन प्रकारची ही भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. या प्रकारची उत्पादने इस्पितळ, मल्टीप्लेक्स, मॉल, व्यापारी संकूल येथे वापरली जातात. कंपनीचे कारखाने महाराष्ट्रात ठाणे व वाडा, गुजरातमध्ये भरुच, दादरा, नगर हवेली व हिमाचल प्रदेशात कुलू मानली येथे आहेत. कंपनी मध्य पूर्वेकडील देशात प्रमुख निर्यातदार असून कतार व दुबई येथे कंपनीची विक्री कार्यालये आहेत. २०१२-१३ या आíथक वर्षांत कंपनीची विक्री २,८०० कोटी रुपये होती. गेल्या वर्षांत विक्री ३,००० कोटी रुपयांचा टप्पा पार करणे अपेक्षित आहे.
गेल्या काही वर्षांपासून कंपनीने आपल्या धोरणात बदल केला असून उत्पादन केंद्रित न राहता ईपीसी प्रकल्पातून महसूल मिळविण्यासाठी कंपनीने आखलेल्या धोरणाचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. या विभागाच्या विक्रीत वाढ दिसत आहे. हा विभाग एमईपी अर्थात ‘मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल प्लंिबग’ या नावाने ओळखला जातो. मोठय़ा संकुलांसाठी अग्निशमन यंत्रणा, पाणी पुरवठा व मलनि:सारण यासाठी लागणारे नलिकांचे जाळे, विद्युत पुरवठा यंत्रणा यांचा यात समावेश होतो. दोन वर्षांपूर्वीच कंपनीने ८० कोटी रुपये मोजून डी. एस. गुप्ता कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अधिग्रहण केले. ही कंपनी आता ‘ब्लू स्टार इलेक्ट्रो मॅकॅनिकल लिमिटेड’ म्हणून ओळखली जाते. या उप कंपनीने २०१२-१३ या आíथक वर्षांत १०० कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण केले असून कंपनीकडे ३०० कोटी रुपयांच्या मागण्या प्रलंबित आहेत. तर आणखी ३०० कोटी रुपयांची कंत्राटे वाटाघाटींच्या पातळीवर असून त्यातील प्रगतीनुसार पुरवठय़ाचे करार करण्यात येतील.
सध्या कंपनीची ७५ टक्के विक्री ‘एचव्हीए’ अर्थात ‘हिटिंग, व्हेन्टिलेशन, एअर कंडीशिनग’ विभागातून तर २५ टक्के विक्री एमइपी विभागातून होते. कंपनीच्या ‘एचव्हीए’ विभागाची विक्री मागील पाच वर्षांत १७ टक्के चक्रवाढ दराने वाढत आहे. त्यातही ‘रूम एअर कंडीशनर’ या उत्पादन गटात कंपनीचा वाटा ७ टक्के असून २०१६ पर्यंत कंपनीने आपला वाटा ९ टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २०१२-१३ मध्ये कंपनीचा इपीसी विभाग – जो प्रामुख्याने प्रकल्प हाताळतो – तो अर्थव्यवस्थेतील मंदीने बाधित झाला होता. या विभागाची विक्री २२.१३ टक्क्याने घसरली.
या विभागाचे ग्राहक प्रामुख्याने औद्योगिक कंपन्या व व्यापारी आस्थापने असतात. मागील वर्षांचे निकाल एप्रिल-मे दरम्यान जाहीर होतील तेव्हा विक्रीत सुधारणा झालेली दिसेल. कंपनीच्या कुिलग प्रोडक्ट्स विभागाची तिसऱ्या तिमाहीची विक्री मागील वर्षांच्या तिमाहीच्या तुलनेत ७.८ टक्क्याने घसरली आहे. भारतात साधारणत: हा हिवाळी हंगाम असल्यामुळे हवा थंड राखणाऱ्या उत्पादनांना उठाव कमीच असतो. यावर्षी वीज कार्यक्षमता निकषांमध्ये १ जानेवारीपासून बदल झाले आहेत. याचा फायदा एक प्रमुख उत्पादन म्हणून ‘ब्लू स्टार’ने करून घेतला असून आपल्या उत्पदनांच्या किंमती ७ ते ९ टक्क्यांनी वाढविल्या आहेत.
वाढत्या महागाईमुळे ग्राहकांच्या खर्चात वाढ झाल्यामुळे हातात शिल्लक कमी राहत असल्या कारणाने व कंपनीची उत्पादने ‘चैन’ या गटात मोडत असल्यामुळे मागील तिमाहीत कंपनीच्या विक्रीवर विपरित परिणाम झाला. कंपनीच्या प्रकल्प विभागातील ‘इलेक्ट्रिफिकेशन’ ‘इंडस्ट्रिअल सिस्टीम्स’ या उत्पादनात अनेक आयात केलेले सुटे भाग वापरले जातात. रुपयाच्या नकारात्मक विनिमय दरामुळे अनेक प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली. तर काही प्रकल्प रेंगाळले. याचा परिणाम या उत्पादन प्रकारांची नफाक्षमता कमी होण्यावर झाला आहे. आता रुपयात सुधार येत असल्यामुळे या व्यवसायावर सकारात्मक परिणाम दिसून येईल.
कंपनीने नफा वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. एअर कंडीशिनगसाठी वापरण्यात येणाऱ्या नळ्या, केबल, वायरच्या किंमती तांब्याच्या किंमतीतील चढ – उतारांवर ठरतात. याचा नकारात्मक परिणाम कंपनीच्या नफ्यावर होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून कंपनीने तांब्याच्या कंपनीवर नजर ठेवून त्यातील जोखीम कमी करण्यासाठी विशेष कक्ष सुरु केला असून हा कक्ष गरजेनुसार आवश्यक तेव्हा तांब्याची डेरिव्हेटीवमध्ये (व्यवहार मंच) खरेदी – विक्री करतो.
जानेवारी २०१३ नंतरच्या सर्व करारात किंमतवाढीचे कलम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘प्रोजेक्ट मॉनेटिरग सेल’ची (प्रकल्प नियंत्रण कक्ष) स्थापना करण्यात आली असून एखाद्या प्रकल्पाला लागणारे खेळते भांडवल नियंत्रित करण्याची जबाबदारी या सेलवर आहे. विविध प्रकल्पाच्या प्रगती व ग्राहकांकडून केलेल्या कामाचे पसे यावरच लागणारे भांडवल कंपनीद्वारे मंजूर केले जाते. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पात भांडवल गुंतून पडत नाही.
कंपनीच्या इपीसी विभागाच्या व्यवसायाचा मोठा हिस्सा माहिती तंत्रज्ञान उद्योगाकडून येतो. कंपनीचा २ लाख ते ७ लाख चौरस फूट क्षमतेच्या इमारतींना वातानुकूल यंत्रणा पुरवठा करण्याचा अनुभव असून सिस्को ओरॅकल, मायक्रोसॉफ्टसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या या ‘ब्लू स्टार’च्या ग्राहक आहेत. अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारत असल्यामुळे या तिमाहीत कंपनीला हैदराबाद, बंगळुरु पट्टय़ात मोठी कंत्राटे अपेक्षित आहेत. ग्राहकोपयोगी उत्पादनांसाठी मोठी मागणी दृष्टीपथात नसली तरी व्यापारी तत्त्वावर वापरले जाणारे ‘डीप फ्रीझर’ व याच उत्पादन गटातील अन्य उत्पादनांची मागणी संथ परंतु स्थिर वेगाने वाढत आहे. मागील संपूर्ण वर्षीची या उत्पादन गटाची नफा क्षमता ८.५ टक्क्यांहून अधिक तर चालू वर्षांसाठी या उत्पादन गटाची नफाक्षमता १० टक्क्यापेक्षा अधिक असेल. १ जानेवारीपासून पाच तारे असलेली उर्जा कार्यक्षम यंत्रे चार तारेची झाली. तीन तारे असलेल्या यंत्रांचा एकूण विक्रीत साधारणत: ५० टक्के वाटा असतो. कंपनीने १ एप्रिलपासून आपल्या उत्पादनाच्या किंमतीत सात ते नऊ टक्के वाढ केली आहे. कंपनीचे ‘िवडो एसी’चे ‘स्प्लिट एसी’शी प्रमाण २५ : ७५ असून हे प्रमाण नफाक्षमता १० टक्क्यांपेक्षा अधिक टिकवून ठेवणारे आहे.
अर्थव्यवस्थेतील मंदीने बाधित कंपनीचा इपीसी विभाग – जो प्रामुख्याने प्रकल्प हाताळतो – त्याची विक्री २०१२-१३ मध्ये २२.१३% घसरली. तथापि कंपनीची ७५% विक्री ‘एचव्हीए’ अर्थात ‘हिटिंग, व्हेन्टिलेशन, एअर कंडीशिनग’ विभागातून होते आणि गेल्या पाच वर्षांत ती १७% चक्रवाढ दराने वाढत आहे. त्यातही ‘रूम एअर कंडीशनर’ या उत्पादन गटात कंपनीचा वाटा ७% असून २०१६ पर्यंत कंपनीने आपला वाटा ९% करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
दर महिन्याच्या प्रघाताप्रमाणे चालू एप्रिल महिन्याच्या अतिथी विश्लेषकपद ‘मायक्रोसेक कॅपिटल’ या दलाल पेढीत समभाग संशोधक आणि या विषयांत सात वर्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या नेहा माजेठीया भूषविणार आहेत. त्या ‘सीएफए’ (सर्टिफाईड फायनान्शियल अॅडव्हाजर) असून त्यांनी एमएस-फायनान्स ही पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. सुरुवातीच्या काळात त्या सीएमसी या टीसीएसच्या उपकंपनीत ‘बिझिनेस अॅनालिस्ट’ (व्यवसाय विश्लेषक) म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर आयएनजी वैश्य बँकेत, त्यानंतर बीएनपी पारिबामध्ये त्यांनी ‘प्रायव्हेट क्लायंट ग्रुप’ विभागात मोठी गुंतवणूक असलेल्या ग्राहकांसाठी गुंतवणूक सल्लागार म्हणून काम केले आहे. सध्या ‘मायक्रोसेक कॅपिटल’मध्ये त्या अभियांत्रिकी, पोलाद, खनिकर्म या उद्योगक्षेत्रांतील कंपन्याच्या समभागांचे संशोधन करतात. वाचकांनी आपले गुंतवणूकविषयक प्रश्न त्यांना त्यांच्या ई-मेलवर पाठवावेत. या प्रश्नांना त्या उत्तरे देतील.