मागील अभ्यासवर्गामध्ये आपण लाँग कॉल स्ट्रिप केव्हा खरेदी करावा हे पाहिले. जेव्हा बाजाराची दिशा तेजीची असते तेव्हा लॉंग कॉल स्ट्रिप खरेदी करावा, त्याचप्रमाणे इतरही मुद्दे जे मागील लेखांमधून नमूद केले आहेत जसे ध्वनित अस्थिरता, महत्त्वाचे होऊ घातलेले निर्णय इत्यादीचा विचार करावा हे अधोरेखित केलेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लाँग कॉल स्ट्रिपमध्ये आपण विविध स्ट्राइकचे कॉल विकत घेतो, कारण आपला दृष्टिकोन तेजीचा असतो. आज आपण लाँग कॉल लॅडरचा अभ्यास करू.

या डावपेचामध्ये आपण एक जवळचा कॉल खरेदी करतो व त्याच्या पुढील म्हणजे ओ.टी.एम.चा एक कॉल विकतो व त्याच्या पुढील आणखी एक डीप ओ.टी.एम. कॉल विकतो म्हणजे एका कॉलच्या खरेदीसमोर दोन कॉल विकतो.

कोणतेही डावपेच घेतले असता, जर तोटा होत असल्यास, आशेच्या अधीन राहून मोठा तोटा न करता वेळीच झाला तेवढा तोटा सहन करून डावपेचामधून बाहेर पडावे.

वाचकांच्या हे लक्षात आले असेल की, या डावपेचामध्ये अमर्याद नफा असणारा एक लाँग कॉल आहे ज्यामध्ये तेजी असता नफा होईल; परंतु अमर्याद तोटा देणारे दोन शॉर्ट कॉल आहेत म्हणजे मंदी झाली असता नफा होईल. त्यामुळे आपला दृष्टिकोन मंदीचा असला पाहिजे.

अशा वेळी आपण खालील डावपेच वापरू शकता (अर्थात तोटा होत असल्यास आता तरी बाजारात मंदी येईल असा आशावाद न ठेवता तोटा पत्करून बाजारातून बाहेर पडणे शहाणपणाचे असते; परंतु शेअर बाजारामधून नफा कमावणे हा तंत्राचा खेळ कमी व मनाचा खेळ जास्त असल्याने सामान्यत: लोक तोटा मान्य न करता आशा ठेवून बाजारात मोठा तोटा करून बसतात)

लाँग कॉल लॅडर (Long Call Ladder)

तांत्रिकदृष्टय़ा लाँग कॉल लॅडर म्हणजे एकाच करारसमाप्तीचे ए.टी.एम. किंवा जरासा ए.टी.एम. कॉल विकत घेणे व त्याच करारसमाप्तीचे वेगवेगळ्या पातळीचे वेगवेगळ्या स्ट्राइकचे दोन कॉल एकाच वेळी विकणे.

एखाद्या व्यक्तीची अशी ठाम समजूत असेल की, बाजारात मंदी येईल व सध्या असलेली तेजी तत्कालीन आहे तेव्हा त्या व्यक्तीने लाँग कॉल लॅडर थोडय़ा वेगळ्या पद्धतीने घेण्यास हरकत नाही.

केव्हा घ्यावा: जेव्हा बाजाराची मुख्य दिशा मंदीची असेल, पण तत्कालीन कारणामुळे सध्या तेजी असेल व वेगा (५ीॠं)च्या संकल्पनेमुळे अस्थिरतासुद्धा वाढणार असेल, तेव्हा प्रथम आपण एक ए.टी.एम. कॉल विकत घ्यावा, जेव्हा बाजाराची दिशा मंदीमध्ये परावíतत झाल्या झाल्या अवरोध पातळीच्या किमतीमध्ये भाव आल्यास त्या किमतीनुसार एक ओ.टी.एम. कॉल विकावा व त्याच वेळी आणखी एक डीप ओ.टी.एम. कॉल विकावा.

डेल्टा परिणाम – निर्देशांक/शेअर्स वर गेल्यास खरेदी केलेल्या कॉलची किंमत वाढते व डेल्टा सकारात्मक होईल. एकदा एक ओ.टी.एम. व दुसरा डीप ओ.टी.एम. कॉल विकले की डेल्टा नकारात्मक होईल, पण जसजशी समाप्ती जवळ येईल व जर शेअर्सची किंमत विकत घेतलेल्या स्ट्राइकच्या कॉल जवळ असेल तर पुन्हा डेल्टा सकारात्मक होईल.

वेगा परिणाम – अस्थिरता वाढल्यास कॉलची किंमत वाढते. जसजशी समाप्ती जवळ येईल व जर शेअर्सची किंमत विकत घेतलेल्या स्ट्राइकच्या कॉल जवळ असेल तर पुन्हा वेगा सकारात्मक राहील.

थिटा परिणाम – दिवसागणिक कॉलची किंमत कमी होते. जसजशी समाप्ती जवळ येईल व जर शेअर्सची किंमत विकत घेतलेल्या स्ट्राइकच्या कॉल जवळ असेल तर पुन्हा थिटा परिणाम सकारात्मक राहील.

नफा : मर्यादित

तोटा: अमर्यादित

केव्हा बाहेर पडावे: बाजार/शेअर्स दिशा लवकरात लवकर मंदीची म्हणजेच बेअरिश होत नसल्यास किंवा मुख्य दिशा तेजीची वाटत असल्यास तोटा घेऊन बाहेर पडावे किंवा अगोदरच ठरवलेला तोटा किंवा फायदा झाल्यास बाहेर पडावे.

उदाहरणार्थ :  दिनांक २४.१२.२०१५ रोजी टाटा स्टील या कंपनीचा विचार करता, या शेअरमध्ये मंदीमध्ये दिसून येते. कारण चीनमध्ये कमॉडिटी बाजारातील नरमाईच्या परिस्थितीने जानेवारीमध्ये जाहीर होणारा तिमाही निकाल नकारात्मक असण्याची शक्यता असल्याने मुख्य दिशा मंदीची आहे; परंतु काही दिवसांसाठी तेजी असू शकते व टाटा स्टीलचा आजचा भाव २६४ असता मी जानेवारी करारसमाप्तीचा एक २६० या स्ट्राइकचा कॉल अधिमूल्य रुपये १३.१५ ला विकत घेत आहे व जेव्हा टाटा स्टीलचा भाव रुपये २७० होईल तेव्हा जानेवारीचा स्ट्राइक २७० व स्ट्राइक २८० चा प्रत्येकी एक असे दोन कॉल विकेन तेव्हा या कॉलची किंमत अनुक्रमे रुपये १०.५० व ६.२० असेल. त्याच वेळी माझ्या २६० या कॉलची किंमत १६.३५ झालेली असेल. वरीलप्रमाणे उल्लेख केलेल्या किमती या येणाऱ्या चार दिवसांमध्ये डेल्टाच्या, थिटाच्या, वेगाच्या संकल्पनेनुसार अंदाजे काढण्यात आलेल्या आहेत. जर आता मंदी येऊन शेअर्सचे भाव खाली गेल्यास माझा निव्वळ नफा रुपये ३.५० प्रति शेअर झालेला असेल (२७० कॉल विक्री अधिमूल्य मिळकत रुपये १०.४५ अधिक २८० कॉल विक्री अधिमूल्य मिळकत रुपये ६.२०, अशी एकंदर मिळकत १६.६५ वजा २६० कॉल खरेदी अधिमूल्य रुपये १३.१५ निव्वळ मिळकत रुपये). म्हणजे या डावपेचातील एकूण नफा (३.५० ७ २०००) रुपये ७००० असेल.

या डावपेचास रेशो स्प्रेडसुद्धा म्हणता येईल.

(समाप्त)

primeaocm@yahoo.com

(केवळ विकल्पाचे तंत्र व डावपेचांची माहिती देण्याकरिता सदर उदाहरणाचा उल्लेख आला आहे. चालू बाजारातील उदाहरणही केवळ संकल्पना समजून सांगण्यासाठी आहे. कृपया वाचकांनी माझा लेखकाचा सल्ला व खरेदीची शिफारस आहे असे समजू नये. योग्य सल्लागाराकडून मार्गदर्शन घेऊनच व्यवहार करावा.)

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about call log ladder
Show comments