एसबीआय इमर्जिग बिझनेसेस फंड
अन्य फंडांच्या तुलनेत हा फंड समभागकेंद्रित गुंतवणूक करीत असल्याने, जोखीम स्वीकारून अधिक परतावा मिळवून देणारा फंड आहे. फंडाचे हे धोरण पाहता, जे जोखीम स्वीकारून डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडापेक्षा अधिक परतावा मिळवू इच्छितात, अशा गुंतवणूकदारांसाठी हा फंड आदर्श ठरावा.
शुक्रवारच्या (६ मे) मुंबई लोकसत्तामध्ये ‘ काळीपिवळी’ची संख्या निम्म्यावर’ हा मथळा असलेली बातमी प्रसिद्ध झाली होती. वातानुकूलित, प्रीपेड, अॅप आधारित भाडे स्वीकारणाऱ्या टॅक्सी यांच्यामुळे पारंपरिक टॅक्सी व्यवसायासमोर अनेक आव्हाने उभी राहिली. या अव्हानांना सामोरे जाताना काळ्यापिवळ्या टॅक्सी फायद्यात चालविणे कसे कठीण झाले आहे याचे वर्णन करणारी ही बातमी होती. सध्याच्या काळात पारंपरिक टॅक्सी व्यवसाय हा लयाला जाणारा व्यवसाय आहे. आधुनिक व्यवस्थापनाने नफ्यातून तोटय़ात जाणारा व कालांतराने लयाला जाणारा व्यवसाय या संक्रमणाला ‘बिझनेस लाईफ सायकल’ अशी एक संज्ञा दिली गेली आहे. उद्योग व्यवसाय गरजेनुसार जन्माला येतात, वाढतात व उद्योगांचा अस्त होतो. जगभरात याची प्रचीती देणारी अनेक उदाहरणे सापडतात. वर उल्लेख केलेल्या बातमीसोबत वापरलेले चित्र प्रीमियर पद्मिनीचे होते. कारण मुंबईच्या रस्त्यावर काळ्या पिवळ्या रंगातील प्रीमियर पद्मिनी टॅक्सी मोठय़ा संख्येने आढळतात. व काळीपिवळी म्हटले की समोर ‘प्रीमियर पद्मिनी’चेच चित्र उभे राहते. प्रीमियर ऑटोमोबिल ही कंपनी बंद झाली नसती तर आजही टॅक्सी मालकांची व चालकांची पसंती ‘प्रीमियर पद्मिनी’लाच असती. मागील काही दशकांपर्यंत प्रीमियर ऑटोमोबिल ही भारतातील एक आघाडीची प्रवासी वाहन उत्पादक होती. एकेकाळी प्रीमियर पद्मिनीसाठी पाच वर्षांची प्रतीक्षायादी असे. या गोष्टीवर कदाचित आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही. आज मारुतीसारखी कंपनी वर्षांला १० लाख वाहनांचे उत्पादन करते. त्या काळात देशातील आघाडीची वाहन उत्पादक प्रीमियर कंपनी पद्मिनीच्या वर्षांला ४५,००० मोटारी बनवत होती. वाहन विकत घेण्याच्या ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेची दखल न घेतल्याने एकेकाळी प्रवासी वाहन व्यवसायाचे नेतृत्व करणारी आणि ८०च्या दशकात सेन्सेक्समध्ये स्थान असलेली कंपनी आज लयाला गेलेली दिसते. जगभरात भारतातील वाहन उद्योगाचा विस्तार हा एक अभ्यासाचा विषय आहे.
महाराष्ट्राच्या पुणे जिल्’ात शासनाने वाहन उद्योगासाठी ‘ऑटो क्लस्टर’ची स्थापना केली. वाहन उद्योगाचा पाया विस्तारूनसुद्धा महाराष्ट्रातील ‘प्रीमियर’सारखी कंपनी लयाला गेली. ज्या काळात ‘प्रीमियर’चा अस्त होत होता त्याच काळात इन्फोसिससारखी आजची लार्ज कॅप कंपनी जन्माला आली. ‘प्रीमियर’ अस्ताला चालली आहे हे अनेक निधी व्यवस्थापकांच्या गावीही नव्हते. ९०-९४ दरम्यान यूटीआयच्या अनेक योजनांनी प्रीमियर ऑटोमोबिलला त्यांच्या गुंतवणुकीत स्थान दिले होते. आजच्या स्मॉल कॅप उद्याच्या मिड कॅप व आजच्या मिड कॅप उद्याच्या लार्ज कॅप असल्या, तरी दरम्यानच्या संक्रमण काळात अनेक कंपन्या लयाला जातात. सुरुवातीच्या काळात कंपन्यांची वेगाने वाढ होते. पुढे वाढीचा वेग मंदावतो क्वचित प्रसंगी वाढीचा वेग घटतोदेखील. या आवर्तनाला ‘बिझनेस लाईफ सायकल’ असे म्हणतात. ‘बिझनेस लाईफ सायकल’चे सुरुवात (स्टार्ट-अप), वेगाने वाढ (रॅपिड ग्रोथ), परिपक्वता (मॅच्युरिटी) व अंत (डिक्लाइन) असे चार टप्पे आहेत. ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडा’च्या ४ एप्रिलपासून प्रसिद्ध होत असलेल्या सुधारित यादीत ‘घर वापसी’ केलेला एसबीआय इमर्जिग बिझनेसेस फंड हा ‘बिझनेस लाईफ सायकल’च्या पहिल्या दोन टप्प्यातील कंपन्यांतून गुंतवणूक करणारा फंड आहे.
एसबीआय इमर्जिग बिझनेसेस फंड हा बिझनेस सायकल फंड आहे. हा फंड प्रामुख्याने स्मॉल कॅप व मिड कॅप धाटणीच्या कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणारा फंड आहे. केलेली गुंतवणूक लयाला जाण्याचा तसेच स्मॉल व मिड कॅप धाटणीच्या कंपन्या बंद पडण्याचा धोका लार्ज कॅप प्रकारच्या कंपन्यांहून अधिक असल्याने मिड व स्मॉल कॅप कंपन्यांची निवड गुंतवणुकीसाठी करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. बीएसई ५०० हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. बीएसई ५०० या निर्देशांकाचा पी/ई १९ आहे व बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकाचा पी/ई २३ आहे. फंडाच्या पोर्टफोलिओचा पी/ई हा संदर्भ निर्देशांकापेक्षा स्मॉल कॅप निर्देशांकाकडे झुकलेला असल्याने एकाच वेळी मोठी रक्कम न गुंतविता पाच ते सात वर्षांच्या कालावधीत केलेली ‘सिप’ आकर्षक परतावा देऊ शकेल. फंडाच्या गुंतवणुकीत ३१ मार्च २०१६च्या गुंतवणूक पत्रकानुसार २० कंपन्यांच्या समभागातून गुंतवणूक केली आहे. एसबीआय इमर्जिग बिझनेसेस फंड हा मुख्यत्वे मिड कॅप धाटणीच्या कंपन्यातून गुंतवणूक करीत असला, तरी पी अँड जी हायजीन अँड हेल्थकेयर आणि एचडीएफसी बँकसारख्या निवडक लार्ज कॅप प्रकारच्या कंपन्यांतून फंडाने गुंतवणूक केली आहे. फंडाची ४०.४० टक्के गुंतवणूक पहिल्या पाच कंपन्यांतून असून पहिल्या दहा गुंतवणुकांचे एकत्रित प्रमाण ६०.३२% आहे. काही फंड गुंतवणुकीत वैविध्य आणून जोखीम कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अन्य फंडांच्या तुलनेत हा फंड समभागकेंद्रित गुंतवणूक करीत असल्याने, जोखीम स्वीकारून अधिक परतावा मिळवून देणारा फंड आहे. फंडाचे हे धोरण पाहता, जे जोखीम स्वीकारून डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडापेक्षा अधिक परतावा मिळवू इच्छितात, अशा गुंतवणूकदारांसाठी हा फंड आदर्श ठरावा.
फंडाची पहिली एनएव्ही ११ ऑक्टोबर २००४ रोजी जाहीर झाली. प्राथमिक विक्रीत पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना फंडाने आजवर २१.३६% परतावा दिला आहे. मागील दोन वर्षांत अनेक ‘मिड कॅप’ कंपन्यांच्या समभागांचे भाव वधारल्याने एसबीआय इमर्जिग बिझनेसेस फंडाच्या परताव्याचा दर मिडकॅप फंड समूहात अन्य फंडांच्या परताव्याच्या दराहून अधिक ठरला. तर मार्च २०१५ नंतरच्या काळात या फंडाच्या एनएव्हीतील घट संदर्भ निर्देशांकाहून कमी होती. संदर्भ निर्देशांकाने ३ वर्षे, ५ वर्षे व १० वर्षे कालावधीत अनुक्रमे ११.४५%, ७.३५% व ७.७५% परतावा दिला आहे. याच कालावधीसाठी एसबीआय इमर्जिग बिझनेसेस फंडाने अनुक्रमे १८.५१%, १८.५०% व १०.५६% परतावा दिला आहे. मागील ४० पैकी ३४ तिमाहीत फंडाची परतावा कामगिरी पहिल्या पाच क्रमांकात राहिलेली आहे. ३ वर्षे व ५ वर्षे परताव्याच्या चलत सरसरीत एसबीआय इमर्जिग बिझनेसेस फंडाने आयडीएफसी प्रीमियर इक्विटी, एचडीएफसी मिड कॅप या फंडांना मागे टाकले आहे. जे धाडसी गुंतवणूकदार आहेत व अधिक परतावा मिळविण्यासाठी अधिक जोखीम स्वीकारण्यास न डगमगणाऱ्या गुंतवणूकदारांनी या फंडाचा आपल्या गुंतवणुकीत समावेश अवश्य करावा.
shreeyachebaba@gmail.com