या सदरातील विवरणांत दिलेल्या गुणोत्तरांविषयी माहिती द्यावी, अशी वाचकांची विनंती आहे. शेअर निवडताना कुठली गुणोत्तरे तपासून पाहावीत आणि ती का महत्त्वाची आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बहुतांशी गुंतवणूकदार केवळ टिप्सवर शेअर खरेदी करत असतात. खरेदी केल्यानंतर शेअर आपटल्यावर टीप देणारे गायब होतात. ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचविलेले शेअर्स हे फंडामेंटल अॅनालिसिसवर आधारित असतात. त्यामुळे बहुतांशी शेअर्समधील गुंतवणूक ही दीर्घकालीन असली तरच फायद्याची ठरण्याची शक्यता जास्त.
गुंतवणुकीच्या निकषातील एक महत्त्वाचा निकष म्हणजे त्या शेअरचे पुस्तकी मूल्य होय. पुस्तकी मूल्य = भरणा झालेले भागभांडवल (इक्विटी) + राखीव रक्कम (रिझव्र्ह) भागिले एकूण शेअर्सची संख्या.
जितके पुस्तकी मूल्य जास्त तितकी कंपनी आíथकदृष्टय़ा सशक्त. इथे पुनर्मूल्यांकित (revalued) रिझव्र्ह नसावेत. पुस्तकी मूल्याशी संबंधित अजून एक गुणोत्तर म्हणजे किमतीशी पुस्तक मूल्याचे गुणोत्तर. हे काढण्यासाठी शेअरचा बाजारभाव भागिले प्रति शेअर पुस्तकी मूल्य असा फॉम्र्युला आहे. हे गुणोत्तर बाजारभावाशी निगडित असल्याने ते जितके जास्त तितका शेअर महाग असे मानता येईल.
आपण खरेदी करीत असलेला शेअर हा महाग आहे का किंवा कंपनी आíथकदृष्टय़ा कितपत सशक्त आहे हे वरील गुणोत्तरांवरून कळते. किंवा शेअर्सचे पुस्तकी मूल्य खूप जास्त दिसत असेल तर ती कंपनी बोनस शेअर्स देण्याची शक्यता अधिक असे अनुमान काढायला हरकत नाही. अर्थात शेअर खरेदी करताना सर्वच गुणोत्तरे तपासणे आवश्यक असल्याने केवळ पुस्तकी मूल्याचा निकष लावून गुंतवणूक योग्य ठरणार नाही.
खरे तर जानेवारीचा महिना म्हणजे निकाल पाहून खरेदी करायची वेळ. बहुतांशी कंपन्यांचे आíथक निष्कर्ष या महिन्याच्या शेवटापर्यंत जाहीर होतील. मात्र काही कंपन्यांकडून उत्तम कामगिरी अपेक्षित असल्याने ते शेअर्स आपण निकालाची वाट न पाहता खरेदी करीत असतो. किर्लोस्कर समूहाची किर्लोस्कर न्यूमॅटिक ही अशीच एक कंपनी. शंतनुराव किर्लोस्करांनी १९५८ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीने गेल्या ५७ वर्षांत इंजिनीयिरगखेरीज रेफ्रिजरेशन, एअर कॉम्प्रेसर्स, एअर कंडिशिनग, हायड्रॉलिक पॉवर ट्रान्समिशन, कॉम्प्रेसर गॅस इ. अनेक नावीन्यपूर्ण व्यवसायांत आपले स्थान निश्चित केले आहे. गेल्या काही वर्षांत सीएनजी आणि कॉम्प्रेशन सिस्टीममधील एक आघाडीची कंपनी म्हणून किर्लोस्कर न्यूमॅटिक ओळखली जाते. देशातील सर्व रिफायनरीजना रेफ्रिजेरशन पुरवणारी किर्लोस्कर न्यूमॅटिक ही एकमेव कंपनी आहे. गेल्या वर्षी मंदीमुळे कंपनीचे आíथक निकाल तितकेसे आकर्षक नव्हते. मात्र अपेक्षेप्रमाणे यंदा कंपनीने आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या तिमाहीत तर कंपनीने उलाढालीत ३८% वाढ दाखवून ७.३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. कंपनीच्या कामगिरीत भरीव वाढ होण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत कंपनीने तेल आणि वायू क्षेत्रात कॉम्प्रेशनमध्ये विकसित केलेले तंत्रज्ञान आता फळ देऊ लागेल. भारताखेरीज उत्तर पूर्व आणि आखाती देशांत आपले तंत्रज्ञान पुरवणारी किर्लोस्कर न्यूमॅटिक आता इतर देशांतही सल्लागार म्हणून काम करीत आहे. गेली दोन वष्रे आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानात गुंतवणूक करून कंपनीने उत्तम प्रतीचे ट्रान्समिशन गिअर्स उत्पादन करण्यातही यश मिळवले आहे.
मार्च २०१४ मध्ये ३४८ रुपयांना सुचविलेला या शेअरच्या बाजारभावात वाढ होऊन तो ८००च्या वर गेला आहे. मात्र सध्या बाजार खूपच अनिश्चित असल्याने हा शेअर ७०० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कुठलेही कर्ज नसलेली किर्लोस्कर न्यूमॅटिक योग्य वाटते.
stocksandwealth@gmail.com