भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) या आयुर्विम्यातील देशातील सर्वात मोठय़ा कंपनीची ही नफ्यासहीत आजीवन विमा पॉलिसी
ठळक वैशिष्टय़े:
१) शून्य ते ६० वर्षांर्पयच्या व्यक्तीला ही पॉलिसी घेता येते.
२) हप्ते भरायचा कालावधी १०, १५ किंवा २० वर्षांचा असतो.
३) वयाच्या ७० वर्षांपर्यंतच हप्ते भरता येतात. (६० वर्षांच्या व्यक्तीला १० वर्षांचाच हप्ते भरावयाचा कालावधी मिळू शकतो.)
४) पॉलिसीची टर्म १०० वजा विमाधारकाचे वय इतकी असते.
५) पॉलिसीच्या हप्ते भरायच्या टर्ममध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला तर विमाछत्र अधिक त्याच्या खात्यामध्ये जमा असलेला बोनस इतकी रक्कम त्याच्या नामनिर्देशकाला प्राप्त होते. त्याने अपघाती मृत्युसाठी जास्तीचे प्रिमियम स्विकारले असेल तर त्या संभावनेमध्ये दुप्पट विमाछत्र आणि बोनस इतकी रक्कम मिळणार.
६) हप्ते भरायच्या टर्ममध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला नाही तर त्याला त्याच्या खात्यामधील बोनसची रक्कम प्राप्त होणार.
७) त्यानंतरच्या वर्षांपासून विमाधारकाच्या वयाच्या शंभर वर्षांपर्यंत त्याच्या विमाछत्राचा ५.५ टक्के इतकी रक्कम त्याला दरवर्षी पेन्शनच्या स्वरुपात मिळत राहाणार.
८) त्या पेन्शनच्या कालावधीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला तर नामनिर्देशकाला विमाछत्राची मूळ रक्कम प्राप्त होणार आणि जर तो १०० वर्षांपर्यंत जगला तर त्याला कंपनी मूळ विमाछत्राची रक्कम देणार.
उदाहरण:
विमाधारकाचे वय ३२ वर्षे.
पॉलिसीची टर्म ६८ वर्षे (१००-३२)
हप्ते भरायची टर्म २० वर्षे.
विमाछत्र २५ लाख रु.
अपघाती मृत्यू अतिरिक्त २५ लाख रु.
वार्षिक प्रिमियम १,२३,०५० रु.
पॉलिसीचे लाभ:
कंपनीकडे प्रिमियम जमा करावयाच्या २० वर्षांच्या कालावधीमध्ये म्हणजे विमाधारकाच्या वयाच्या ५२ वर्षांपर्यंत त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशकाला विमाछत्राचे २५ लाख रु. आणि विमाधारकाच्या खात्यामध्ये जमा असलेला बोनस इतकी रक्कम प्राप्त होणार. हा मृत्यू जर अपघाती असेल तर जास्तीच्या २५ लाख रु.ची प्राप्ती होणार.
विमाधारक जर २० वर्षांची हप्ते भरावयाची टर्म तरून गेला तर त्याच्या खात्यातील बोनसची रक्कम त्याला प्राप्त होणार आणि त्यानंतर त्यांच्या शंभरीपर्यंत विमा कंपनी त्याला दरवर्षी १,३७,५०० रु.ची रक्कम देत राहाणार. त्यानंतर त्याला विमाछत्राचे २५ लाख रु. मिळणार. त्या मधल्या काळात त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशकास २५ लाख रु.ची प्राप्ती होणार.
विश्लेषण:
विमाधारकाने त्याच्या पॉलिसीच्या पहिल्या २० वर्षांमध्ये वार्षिक १,२३,०५० रु. प्रमाणे कंपनीकडे जमा केलेल्या हप्त्यांची एकूण रक्कम होते २४,६१,००० रु. आणि २१ व्या वर्षी कंपनी त्याला त्याच्या नावे जमा असलेला बोनस देते. कंपनीच्या ट्रॅक रेकॉर्डवर नजर टाकली तर वार्षिक बोनसचा दर आहे ४.८ टक्के आणि तो विचारात घेतला तर २० वर्षांची बोनसची एकूण रक्कम होते २४,००,००० रु. म्हणजे कंपनीजवळ जमा असलेल्या रकमेपेक्षाही ६१,००० रु. कमी देते.
त्यानंतरच्या काळामध्ये त्याच्या शंभरीपर्यंत त्याला दरवर्षी १,३७,५०० रु. देते.
या परत मिळणाऱ्या पैशांच्या बाबतीत परताव्याचा दर काढण्यापेक्षा त्याहून जास्तीचा लाभ होऊ शकतो का त्याचा विचार करूया.
एल. आय. सी. ही क्लेम सेटलमेंट रेशिओच्या बाबतीत भारतातील एक नंबरची कंपनी आहे. सदर व्यक्तीने त्या कंपनीची बिननफ्याची प्युअर टर्म पॉलिसी घेतली तर १ कोटी रु.चे विमाछत्र आणि २० वर्षांच्या टर्मसाटी वार्षिक प्रिमियमची रक्कम होते २८,४०० रु. २० वर्षांची एकूण प्रिमियमची रक्कम होते ५,६८००० रु. जीवन तरंगच्या एकूण प्रिमियमच्या तुलनेमध्ये बचत १८९३००० रु. (२४६१०००-५६८०००) ही रक्कम २० वर्षांमध्ये विभागली तर वार्षिक रक्कम होते ९४६५१ रु. समजा ९४६०० रु. ज्यामध्ये आयकरात सूट आहे आणि परतावाही आयकरमुक्त आहे अशा गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये ही ९४६०० रु.ची रक्कम दरवर्षी गुंतविली तर २० वर्षांनी म्हणजे विमाधारकाच्या ५२ व्या वर्षी त्याच्याकडे ५१,४८,९१८ रु.ची गंगाजळी तयार होते. ही रक्कम आयकर वजा जाता निव्वळ ६ टक्केच्या परताव्याच्या पर्यायामध्ये गुंतविली तर विमाधारकाला दरवर्षी आयकर मुक्त असे ३,०८,९३५ रु.चे कायमस्वरुपी उत्पन्न सुरू होते. आणि त्याच्या पश्चात नामनिर्देशकाला ५१,४८,९१८ रु.ची प्राप्ती होऊ शकते.
सदर व्यक्तीने क्लेम सेटलमेंट रेशिओच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कंपनीची अशाच प्रकारची पॉलिसी घेतली वार्षिक प्रिमियमची रक्कम होते १२७३१ रु. वीस वर्षांच्या टर्मची एकूण रक्कम होते २,५४,६२० रु. जीवन तरंगच्या एकूण प्रिमियमच्या तुलनेत बचत २२,०६,३८० रु. प्रमाणे वरील ‘सेफ’ पर्यायामध्ये गुंतविले तर वीस वर्षांनी ५४,४२,८३१ रु.ची गंगाजळी तयार होते. उरलेली २,०६,००० रु. ची रक्कम दरवर्षी १०,००० रु. प्रमाणे आयकर वजा जाता निव्वळ ६ टक्के परतावा मिळणाऱ्या पर्यायामध्ये दरवर्षी गुंतविली तर २० वर्षांनी ३,८९,९२७ रु.ची गंगाजली तयार होते.
अशाप्रकारे सदर व्यक्तीच्या ५२ व्या वर्षी त्याच्याजवळ एकूण (५४,४२,८५१ + ३,८९,९२७) ५८३२७५८ रु.ची आयकर मुक्त अशी पुंजी तयार होते. त्यावर निव्वळ ६ टक्के परताव्याच्या पर्यायामधून वार्षिक ३,४९,९६५ रु.चा कायमस्वरूपी स्त्रोत चालू होऊ शकतो. विमाधारकाच्या मृत्यूनंतर नामनिर्देशकाला ५८,९२,७५८ रु.ची प्राप्ती होऊ शकते.
सदर लेखाचा उद्देश पूर्णत: समीक्षात्मक असून, माहिती त्या त्या वेबस्थळांवरून घेतली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2012 रोजी प्रकाशित
विमा विश्लेषण : जीवन तरंग
भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) या आयुर्विम्यातील देशातील सर्वात मोठय़ा कंपनीची ही नफ्यासहीत आजीवन विमा पॉलिसी

First published on: 06-11-2012 at 03:05 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Insurance analysis jevan tarang