आरोग्य विमा खासगी क्षेत्राला मुक्त होऊन आता दशकही उलटून गेले आहे. गेल्या वर्षभरात तर नियामक सुधारणेच्या रुपाने या क्षेत्राने अनेक स्थित्यंतरे पाहिली. मिस-सेलिंगपासून छुप्या दरांपर्यंत अनेक समस्यांचा सामनाही करावा लागला. याबाबत क्षेत्राच्या आगामी प्रवासाबाबत सांगताहेत एगॉन रेलिगेअर लाईफ इन्शुरन्सचे मुख्य कार्यचलन अधिकारी यतीश श्रीवास्तव..
सेबी काय किंवा इर्डा काय नियामक यंत्रणांच्या नावाने विमा क्षेत्राने गेल्या काही कालावधीत बरीच मोटे मोडली. हे सारे विमाधारक/ग्राहकांच्या हिताचे असताना अनेक अटी जाचक असल्याची ओरडही या क्षेत्रातून झाली. तुम्हाला हे मान्य आहे का?
कोणतेही नियम हे त्या यंत्रणेच्या, त्या व्यवसायाच्या हिताचेच असतात. याबाबत दुमत नाही. इतर सर्वाप्रमाणे आरोग्य विमासारख्या क्षेत्रानेही नियमांच्या, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे,
इर्डाचे नियमन होते ते बिगर लिक्ड विमा उत्पादनांसाठी. यासाठी कंपन्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये बदल करावे, अशा सूचनाच होत्या. वितरणाच्या मुद्दय़ावर यूलिपसारख्या योजनांही त्यात आल्या.
दुसरे म्हणजे आरोग्यविमा मार्गदर्शक तत्त्वांबाबत सांगायचे झाले तर बदलांबाबत आता सारे स्थिरावले आहे, असेच मी म्हणेन. कंपन्यांनी नव्या बदलात व्यवसाय करण्याची तयारी दर्शविली आहे आणि आता तो अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिने त्यांचे कार्य सुरू आहे.
विमा योजनांच्या ‘मिस-सेलिंग’बाबत खूपच गहजब झाला. या क्षेत्रात असे घडत नव्हते असे तुम्ही म्हणाल काय?
सरसकट तसे म्हणता येणार नाही. त्याचा त्रास कंपन्यांनाही झाला. २००४ ते २०१० दरम्यान असे प्रकार खूपच घडत होते. यामध्ये फंड व्हॅल्यू ही कमी होती. प्रिमिअमपेक्षाही ती कमी असे. ग्राहक हा या व्यवसायाचा गाभा आहे. तेव्हा त्याच्या लाभासाठी उत्पादन बदल, धोरण परिवर्तन हे आलेच. कोणतेही विमा उत्पादन हे साधे सरळ असावे. त्यात अपेक्षित प्रश्नांचे टप्पे कमी असावेत. विमा प्रतिनिधींनाही कमी कालावधीसाठीच अधिक मानधन मिळे. अशाने एखाद्या कंपनीप्रती, उत्पादनापोटी त्याची बांधिलकीदखील लवकरच संपुष्टात येते. आता हा उद्योग मिस – सेलिंग रोखण्याच्या उपाययोजनांच्या फळांची प्रतिक्षा करत आहे. मिस – सेलिंग प्रमाण आता नगण्य आहे.
केवळ विमा अथवा अर्थ क्षेत्रच नव्हे तर एकूणच मंदीचे वातावरण आपण जवळपास दोन तिमाही अनुभवत आहोत. हा प्रवास अर्ध आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धातही असाच राहिल, असे वाटते काय?
नाही. माझ्या मते, चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीपेक्षा दुसरी तिमाही तुलनेने चांगली गेली, असे म्हणावे लागेल. या दरम्यान या उद्योगाची वाढ ८ ते१० टक्क्य़ांची राहिली आहे. पुढील कालावधीतही या क्षेत्राची (विमा) फार मोठय़ा वाढीची आशा नाही. मात्र एकूण चित्र अधिक सकारात्मकच असेल. अगदीच १३ ते १५ टक्के नाही. मात्र १० ते १२ टक्के व्यवसाय वाढ राखण्यास या क्षेत्राला हरकत नाही. एकूणच आर्थिक वर्षांत आरोग्य विमा क्षेत्राची वाढ शाश्वत (सस्टेनेबल) असेल. आणि मग पुढील काळ अधिक विस्ताराचा आपण अपेक्षित करू शकतो.
विमा योजनाही असंख्या असतात. अनेक तर भांडवली बाजाराशीही निगडित असताना. यामुळे ग्राहकांचा पुरता गोंधळ उडतो. अशा स्थितीत तुम्ही नेमक्या कोणत्या योजनांकडे त्यांना आकर्षित कराल?
माझ्या दृष्टिने मुदत उत्पादने (टर्म प्रॉडक्ट) केव्हाही चांगली. योग्य कालावधीसाठी ती उपयुक्त ठरतात. यामध्ये तुम्हाला पुरेसे संरक्षणही मिळते. शिवाय ते खूपच स्वस्तही पडते.  यामध्ये तुम्हाला आरोग्यकवचासह अन्य लाभही मिळतात. तुम्ही म्हणाल, बँकेत कोणत्याही गुंतवणुकीवर हमी मिळते. पण येथे विमा तुम्हाला दिर्घकालीन संरक्षण देते. फक्त यात १० ते १५ वर्षांसाठी गुंतवणूक असावी. तुम्ही केवळ तीन ते सात वर्षांपर्यंत यासाठी विचार करून चालत नाही. विमा योजनांची तुलना तुम्ही इक्विटी अथवा म्युच्युअल फंडांशी करू शकत नाही. त्यात बचत असली तरी यात संरक्षण आहे. गुंतवणूक हमीसारखाा दावा त्यात केला जात नाही.
एगॉन रेलिगेअर ही तशी खासगी विमा क्षेत्रातील नव्या फळीतील कंपनी. वरिष्ठ अधिकारी म्हणून नियमन बदलाच्या पाश्र्वभूमिवर तुम्ही तीबाबत काय सांगाल?
आधीच म्हटल्याप्रमाणे नियमन हे व्यवसायाचा मुख्य स्त्रोत असलेल्या विमाधारकांसाठीच आहेत. त्यातील बदल हे काळानुसारच, किंबहुना परिस्थितीजन्यतेमुळेच आले आहेत. आम्हीदेखील आमच्या विमाधारकांना एक संधी यानिमित्ताने देत आहोत. याअंतर्गत गेल्या वर्षभरात मोडकळीस (लॅप्स) आलेल्या योजना पूर्वपदावर आणण्याची विशेष मोहिम आम्ही सुरू केली आहे. यानुसार प्रिमिअम भरून कोणत्याही दंड अथवा शुल्काशिवाय धारकांना त्यांची विमा योजना पुन्हा सुरू करता येणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या यो मोहिमेद्वारे २५,००० पॉलिसी आणि २५ कोटी रुपयांचे प्रिमिअमचे उद्दीष्ट आम्ही राखत आहोत.
२००९ मध्ये व्यवसाय प्रारंभ करणाऱ्या आमच्या कंपनीची ३५ टक्के विमा विक्री ही तब्बल ३५ टक्के इंटरनेटच्या माध्यमातूनच होते. एकेकाळी आघाडीच्या १० शहरांमध्ये अस्तित्व असलेल्या कंपनीचे स्थान (विमाधारक) ३५ ते ४० शहरांमध्ये तर देशभरात एकूण १७२ शहरांमध्ये आहे.

Story img Loader