मुलाखत- वीरेंद्र तळेगावकर, veerendratalegaonkar @gmail.com
पंधरवडय़ावर येऊन ठेपलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी मोठय़ा आपटीचे तर्क – वितर्क मांडले जात असतानाच बाजारातील दोलायमान स्थितीतही गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन उद्दिष्टांवर नजर ठेवावी, असे सांगताहेत यूटीआय म्युच्युअल फंडचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक संजय डोंगरे. फंडातील गुंतवणुकीसाठी एसआयपीसारखा मार्ग, समभागांबाबत बँक आदी क्षेत्रांचे पर्याय सुचविताहेत संजय डोंगरे..
२०१५च्या सुरुवातीलाच सेन्सेक्स, निफ्टीने ऐतिहासिक पल्ला गाठला. तुमच्या दृष्टिने बाजाराचा प्रवास कसा राहिला?
निश्चितच. देशातील प्रमुख भांडवली बाजारांनी नव्या वर्षप्रारंभीच विक्रमी कामगिरी बजाविली आहे. सेन्सेक्सबाबतच सांगायचे झाले तर वार्षिक तुलनेत तो ३० टक्क्य़ांनी या वर्षांत झेपावला आहे. या कालावधीत देशातील भांडवली बाजारातील विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा ओघही मोठय़ा प्रमाणात वाढला. केवळ समभागातीलच त्यांची गुंतवणूक जवळपास एक लाख कोटी रुपये राहिली आहे.
म्युच्युअल फंड उद्योगाचा प्रवासही तेवढाच उत्साहवर्धक म्हणता येईल का?
हो. २०१४ च्या अखेरच्या, डिसेंबरमध्ये फंड मालमत्ता २१ टक्क्य़ांनी उंचावली. तर २०१५ च्या पहिल्याच महिन्यात ही गुंतवणूक १२ लाख कोटी रुपये अशा ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचली आहे. केवळ फंड व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांची मालमत्ता या कालावधीत वाढली नाही तर फंडांमधील गुंतवणूकदारांची खातीही वाढली आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये या खात्यांनी ४ कोटींचा टप्पाही प्रथमच ओलांडला. यामध्ये समभाग योजना असलेली खाती १२ लाखांहून अधिक वाढली आहेत.
म्युच्युअल फंड क्षेत्र गेल्या वर्षांत नियामकांच्या नव नव्या आदेश, बंधनानेही गाजले..
..अर्थात ते सारे गुंतवणूकदारांच्या हितासाठीच होते. शिवाय त्यामुळे व्यवसायात अधिक पारदर्शकता आली. मोठय़ा १५ शहरांपल्याड आता या क्षेत्रातील गुंतवणूक ओघ वाढू लागला आहे. ३१ टक्क्य़ांनी या भागातून निधी वाढल्याची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली आहे.
अर्थव्यवस्थेच्या सुधाराबाबत खूप अपेक्षा असतानाच काहीशी निराशाजनक आकडेवारी आत्ताच समोर आली आहे. तेव्हा खरेच असे चित्र आहे काय?
गेल्या काही महिन्यांमध्ये आपण पाहिले तर महागाईचा दर हा १० ते १२ टक्क्य़ांपुढे होता. तर ठेवींवरील व्याजदरही ९.५० टक्के वगैरे. गुंतवणुकीबाबत एकूणच वातावरण काहीसे नकारात्मकच होते. गुंतवणूकदारही भांडवली बाजार, म्युच्युअल फंड यांच्याऐवजी मौल्यवान धातू, स्थावर मालमत्ता यासारख्या पर्यायांनाच अधिक पसंती देत होते. मात्र हे चित्र बदलते आहे. आता ८ टक्क्य़ांच्या अर्थ प्रगतीबाबत आपणही आशादायी आहोत. कमी महागाई गुंतवणूकदारांना समभाग, फंड पर्यायांकडे वळवेल. रिझव्र्ह बँकही व्याजदर कपात करेल.
भांडवली बाजाराबाबत जानेवारीच्या सुरुवातीला दिसलेले चित्र आता पुन्हा उमटू लागले आहे. दरम्यान काहीशी अस्वस्थतताही निर्देशांकांच्या घसरणीने निर्माण केली. सेन्सेक्स-निफ्टी अर्थसंकल्पापूर्वी एकदा जोरदार आपटतील, असे अंदाजही व्यक्त होत आहेत!
भांडवली बाजारातील अस्वस्थता काही सांगून येत नाही. त्यात चढ – उतार येतच असतात. बाजार सध्या वरच्या टप्प्यावर आहे. जानेवारी २०१५ मध्ये ऐतिहासिक आकडय़ाला स्पर्श केल्यानंतर मध्यंतरात तो त्यापासून लांबही गेला. भांडवली बाजार म्हटले की अस्थिरता आलीच.
मग सद्यस्थितीत गुंतवणूकदारांनी काय निर्णय घ्यावा?
भांडवली बाजारात प्रत्यक्ष अथवा त्याच्याशी निगडित अप्रत्यक्ष व्यवहार करताना गुंतवणूकदारांनी नेहमी दीर्घकालीन दृष्टिकोन बाळगावा. हा कालावधीत २ ते ३ अथवा ५ वर्षेही असण्यास हरकत नाही. म्युच्युअल फंडांबाबत, एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेन्ट प्लॅन) सारखा पर्याय निश्चितच असावा. बाजारात मध्यंतरात मोठी अस्थिरता आली तरी अशा वेळी (दीर्घ कालावधीत) गुंतवणूकदार फायद्यातच राहतो.
समभाग अथवा क्षेत्रांबाबत तुम्ही काय सुचवाल?
क्षेत्रांबाबत सांगायचे तर अर्थातच पायाभूत सेवा क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल आहे. अर्थव्यवस्थेतील सुधारणांचा प्रगतीपथ पाहता बँक क्षेत्राला यातून अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्राचा प्रवासही आता रुळावर येताना दिसेल. यातून सिमेन्ट कंपन्या लाभार्थी ठरण्याची शक्यता आहे. शिवाय कोळसा क्षेत्रातील समभागांनाही वाव आहे.
दोलायमान स्थितीतही गुंतवणूकदारांचे दीर्घकालीन लक्ष्य हवे
पंधरवडय़ावर येऊन ठेपलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी मोठय़ा आपटीचे तर्क - वितर्क मांडले जात असतानाच बाजारातील दोलायमान स्थितीतही गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन उद्दिष्टांवर नजर ठेवावी

First published on: 16-02-2015 at 01:06 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview virendra talegaonkar