नोकरी, व्यवसाय किंवा धंदा या उपजिविकेच्या मुख्य साधनांबरोबर आपली गुंतवणूक हा आपला जोडधंदा झाला पाहिजे. सुरुवातीस गुंतवणुकीपासून उत्पन्न जास्त नसेल. नंतर वयानुसार नोकरीव्यवसायातील उत्पन्नवाढीमुळे गुंतवणूक वाढेल आणि उत्पन्नही वाढू लागेल.-
गुंतवणूक करताना आपला दृष्टिकोन कसा असावा?
‘अर्थ वृत्तान्त’च्या वाचक अलिबागच्या मिलन दिघे यांनी हा प्रश्न विचारला आहे.
आपण सर्वजण बचत खात्यात रक्कम जमा झाली की कोठे तरी गुंतविण्याचा विचार करतो; परंतु गुंतवणूक हा आपला जोडधंदा आहे, असा विचार आपण करीत नाही.
पुष्कळदा व्यावसायिक आपल्या मूळ धंद्याबरोबर एक जोडधंदा करीत असतात. मुख्य धंदा हे उत्पन्नाचे प्रमुख साधन असते. त्या धंद्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलेले असते. त्याच्या जोडीने जोडधंद्याला जास्त महत्त्व दिले जात नाही. तो व्यवसाय उत्पन्नाचे साधन नसतो, पण मुख्य व्यवसायात मंदी आली किंवा मुख्य व्यवसायात स्पर्धा वाढू लागली की फायदा कमी होऊ लागतो. अशा वेळेस जोडधंद्यावर लक्ष केंद्रित करून त्यापासून जास्त उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला जातो.
त्याच पद्धतीत आपली नोकरी किंवा व्यवसाय किंवा धंदा हे आपले उपजीविकेचे मुख्य साधन असते, त्याचबरोबर आपली गुंतवणूक हा आपला जोडधंदा झाला पाहिजे. सुरुवातीस गुंतवणुकीपासून उत्पन्न जास्त नसेल. नंतर वयानुसार नोकरीव्यवसायातील उत्पन्नवाढीमुळे गुंतवणूक वाढेल व उत्पन्न वाढू लागेल.
यासाठी खालील मुद्दे लक्षात ठेवणे गरजेचे आहे-
१) अभ्यास :
व्यवसाय म्हटला की, त्याचा अभ्यास करणे ओघानेच येते. ज्या क्षेत्रातील आपल्याला काहीही माहिती नाही अशा क्षेत्रात आपण व्यवसाय करण्यास जात नाही. गुंतवणूक हे एकच क्षेत्र आहे जेथे सर्वाचा मुक्त संचार असतो. म्हणून प्रत्येकजण दुसऱ्याला आपल्या कुवतीनुसार सल्ला देत असतो आणि अशा सल्ल्यातूनच आपण आपले समज/ गैरसमज घट्ट करत असतो. मग आपण इतरांना किंवा आपल्या मुलांना तेच मार्गदर्शन करतो. उदा. शेअर बाजार म्हणजे सट्टाबाजार. आणि हे सांगत असतानाच दुसऱ्या मित्राच्या सांगण्यावरून किंवा ब्रोकरच्या सांगण्यावरून वस्तुविनिमय बाजारात काही पिंपे कच्चे तेल खरेदी करून बसलो असतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कशा निर्धारित होतात याचा काहीही अभ्यास नसतो.
अभ्यास किती असावा- मर्यादा नाही, पण निदान गुंतवणूक एजंट चुकीची किंवा आपल्या सोयीची नसलेली योजना गळ्यात मारतो आहे हे समजण्याइतपत तरी असावा.
२) शिस्तबद्ध दृष्टिकोन :
गुंतवणूक करताना शिस्त हवीच. आपल्या उत्पन्नातील ठराविक रक्कम दरमहा बाजूला काढून गुंतवली गेलीच पाहिजे असे बंधन आपण आपल्यावरच घालून घेतले पाहिजे. अन्यथा मागील महिन्यात २५०००/- रुपये बचत, चालू महिन्यात रु. ५०००/- आणि पुढील महिन्यात रु. १०,०००/- बचत होते. यासाठी दरमहा ठराविक रक्कम नक्की वाचविणार असे ठरवून गुंतवणूक केल्यास खर्चावर नियंत्रण येते. यासाठी सोपा उपाय बँकेत दरमहा आवर्ती जमा योजना किंवा म्युच्युअल फंडांच्या सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट योजनेत दरमहा गुंतवणुकीच्या तारखा नक्की करणे म्हणजे फक्त उरलेली रक्कम खर्चासाठी वापरता येते.
३) वार्षिक ताळेबंद :
सर्व व्यावसायिक, कंपन्या आपला ताळेबंद दरवर्षी ३१ मार्चला बनवतात. त्याप्रमाणे आपण आपला ताळेबंद बनविल्यास मागील तीन किंवा पाच वर्षांचा तौलनिक अभ्यास करता येतो. आपल्या गुंतवणुकांमध्ये किती वाढ झाली. व्याज किंवा वृद्धीमुळे वाढ किती झाली. अपेक्षेपेक्षा जास्त-कमी वाढ असल्यास काय बदल करणे गरजेचे आहे, याचा आनंद घेता येतो. ताळेबंद न बनविल्यास गुंतवणुकांमध्ये वाढ झालेली समजेल; परंतु मागील पाच वर्षांत वाढ ३० टक्के दरवर्षी होणे अभिप्रेत असताना वाढ १० टक्के झाली असा तुलनात्मक अभ्यास करता येणार नाही.
४) जोखीम आणि पुनर्गुतवणूक :
आपल्या वयोमानानुसार जोखीमयुक्त गुंतवणूक हळूहळू कमी करत आणावी. निवृत्तीच्या सुमारास आपण किती जोखीम घेऊ शकतो, याचा अंदाज घेऊन त्यानुसार गुंतवणूक करावी. नोकरीव्यवसाय करीत असताना गुंतवणुकांपासून दरमहा उत्पन्नाची गरज नसते. तरीसुद्धा गुंतवणुका दरमहा व्याजाच्या योजनेत करून, त्यातून विजेची बिले भरणे, सोसायटीचे दरमहा भाडे देणे, इ. खर्च भागवले जातात. हे खर्च आपल्या पगारातून सहज भागवता येतात; परंतु मानसिक समाधानासाठी आपण चुकीच्या पद्धतीत गुंतवणुका करतो, त्याऐवजी व्याज न घेता पुनर्गुतवणूक केल्यास व्याजावर व्याज जास्त दराने मिळू शकते.
५) घरातील सर्वाचा सहभाग :
आपल्या गुंतवणुकांमध्ये आपल्या घरातील सर्वाचा सहभाग असावा. म्हणजे आपल्या वैवाहिक जोडीदाराचा आणि मुलांचासुद्धा. आपला हा जोडधंदा आहे. व्यापारी आपला व्यवसाय जसा पुढच्या पिढीकडे सोपवितात, तसेच आपल्या गुंतवणुका आपल्या पश्चात पुढील पिढीकडे जाणार असतात. त्यांना सर्व व्यवहारांची माहिती झाल्यास व्यवहार सांभाळणे सोपे जाते. खूपदा माझे ग्राहक मला सांगतात की, मुलांना लहानपणापासून कसे काय सांगायचे. मुलांना सर्व गोष्टी समजत असतात. आपण न सांगितल्याने पाहिजे त्या समजत नाहीत आणि नको त्या बरोबर समजतात.
समजा, तुम्ही दुसऱ्या शहरात घर घेतले. तुम्ही शेजारी, मित्रमंडळी, नातेवाईकांना मुलांच्या समोर कौतुकाने सांगता, इतके स्क्वेअर फूट जागा आहे. आम्हाला खूप स्वस्तात अमुक भावाने जागा मिळाली. आता भाव इतके वाढले आहेत. मुलांना गुणाकार येतो. तुम्ही किती पैसे गुंतविले हे त्यांना समजते, पण जे कळायला हवे ते तुम्ही सांगत नाही. म्हणजे ५० लाखांच्या जागेसाठी रुपये २५ लाख कर्ज घेतले आहे. महाग गाडी खरेदी केली तर इतर मित्रांकडून गाडय़ांच्या किमती समजतात, पण त्यासाठी घेतलेले कर्ज तुम्ही सांगितले नाहीत तर समजणार नाही.
तुम्ही मुलांना सर्व गुंतवणुका समजावून सांगा व पुढे ‘यातील ही रक्कम आमच्या वृद्धापकाळातील सोय आहे’ हेसुद्धा समजावून सांगा. मुले मोठेपणीसुद्धा समजूतदारपणा दाखवितात. माझ्या मित्राच्या मुलाला शिक्षणासाठी परदेशी जायचे होते. मित्राने आपले सर्व व्यवहार मुलांना दाखविले होते. परिस्थितीचा अंदाज असल्याने त्या मुलाने परदेशी जाण्याचा आपला विचार बदलला.
६) निवृत्तीनंतर :
मूळ धंदा चालत नसेल तर व्यावसायिक जसा जोडधंद्यावर लक्ष केंद्रित करतो, त्याप्रमाणे निवृत्तीनंतर गुंतवणूक हा जोडधंदा असेल तरच तो मूळ धंदा होईल, अन्यथा निवृत्तीनंतर मिळालेली ग्रॅच्युईटी व फंड मासिक व्याज योजनेत गुंतवून घरी शांत बसतो असे सांगावे लागेल. माझा एक ग्राहक नोकरी करताना त्या वेळच्या उत्पन्नानुसार नवीन घर खरेदी करत असे. दर आठ ते दहा वर्षांनी कर्ज काढून नवीन घर घेऊन भाडय़ाने देत असे. निवृत्तीपर्यंत त्याची चार घरे झाली. आज त्याला पेन्शनसारखे भाडे मिळते आणि ते महागाईनुसार वाढतच जाते. शिवाय जागांच्या किमती भरमसाठ वाढल्याने मुदलात वाढ झाली आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा