१ एप्रिल हा दिवस जगभरात मुर्खाचा दिवस समजला जातो. गुंतवणुकीच्या व्यवहारांमध्येही, विशेषत: जर ती अपयशी ठरली असेल तर गुंतवणूकदाराला आपण मूर्ख बनलो अशी भावना होते. या गोष्टीला अनेकदा अज्ञानाच्या बरोबरीने गुंतवणूकदारांची मानसिकतासुद्धा तेवढीच जबाबदार आहे. बाजारात भाजी घेताना ती किडलेली, वाळलेली नसल्याची खातरजमा करून घेणारे विमा, म्युच्युअल फंड यांच्या खरेदीचे निर्णय अंधपणे घेतात. त्याच बरोबरीने गुंतवणूक सल्लागाराला त्याच्या श्रमाचा सुयोग्य मोबदला दिला तर आडमार्गाने पसे कमाविण्यासाठी तोदेखील अयोग्य उत्पादन ग्राहकाच्या माथी मारणार नाही..
धरून परावी आस, प्रेत्न सांडी सावकास।
निसुगाईचा संतोष, मानी, तो येक मूर्ख।।
२-१-१७
(जो दुसऱ्यावर भरवसा ठेवून प्रयत्न करणे हळूहळू सोडून देतो व आळसात संतोष मानतो तो एक मूर्ख)
रात्रंदिवस करी श्रवण, न सांडी।
आपले अवगुण, स्वहित आपलें आपण, नेणे तो येक पढतमूर्ख।। २-१०-३०
(जो दिवसरात्र चांगल्या उपदेशांचे श्रवण करत असूनही, आपले अवगुण सोडत नाही, आपले हित कशात आहे हे जाणीत नाही तो एक महामूर्ख)
माझे आजोबा रोज दासबोधाचा एक समास वाचाल्याविना अन्न ग्रहण करीत नसत. तो त्यांच्या गुरुनिष्ठेचा भाग होता. दासबोधामध्ये दुसऱ्या दशकात समर्थानी मूर्खलक्षणावर विवेचन केले आहे. यातील पहिला समास मूर्खलक्षण तर तर दहावा समास पढतमूर्ख लक्षण आहे. वरील ओव्या याच दशकातील. समर्थानी वर्णन केलेली मुर्खाची लक्षणे अर्थविषयक व्यवहाराला तंतोतंत लागू पडतात. १ एप्रिल हा जगभरात मुर्खाचा दिवस म्हणून ओळखला जातो. दुसऱ्याला मूर्ख ठरविण्याचा मुक्त परवाना असलेला दिवस. एखाद्या दिवशी गंमत म्हणून कोणाला मूर्ख ठरविल्यास कोणी हरकत घेणार नाही. परंतु चुकीचे निर्णय घेतल्यामुळे वर्षभर रोजच कोणी ना कोणी मूर्ख ठरत असतो. आर्थिक जगतात उपलब्ध असलेल्या सेवा – बँकिंग, म्युच्युअल फंड, विमा या ग्राहकांच्या विविध गटातील असमान गरजा भागविण्यासाठी लोकांसाठी तयार केलेली प्रमाणित उत्पादने (सेवा) असतात. या सेवांची वैशिष्टय़े आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमत ठरलेली असते. विम्यासारख्या सेवांमध्ये जोखमीवर त्याचे मूल्य ठरत असते. एखादी गरज नसलेली सेवा विकत घेतली तर त्यासाठी जास्तीचे मूल्य मोजावे लागते. हे समजून न घेता सेवा विकत घेतल्यास आपली फसवणूक झाली असा समज होतो. परंतु आपण विकत घेत असलेल्या सेवेचे शुल्क, त्यांची वैशिष्टय़े आधीपासून समजून घेतली तर असे वाटणार नाही. युनिटिलक्ड विम्याच्या अनेक पॉलिसींमध्ये विमा कंपन्या सुरुवातीची तीन – चार वर्षांत भरलेल्या हप्त्यामधून आपले सेवाशुल्क कापून घेतात. बहुसंख्य ग्राहकांना ही गोष्ट माहीत नसते विमा खरेदीदार ही गोष्ट विचारात न घेता पहिली पाच वष्रे विम्याचा हप्ता भरतात व पाच वर्षांनंतर आपण भरलेल्या हप्त्यापेक्षा विकत घेतलेल्या सर्व युनिटची किंमत कमी आहे हे लक्षात येताच उर्वरित काळासाठी हप्ता भरत नाहीत. किंवा पॉलिसी पाच वर्षांनंतर विमा कंपनीला विकतात. खरा परतावा पाच वर्षांनंतरच चालू होतो. गुंतवणूक फायद्यात येण्यास आठ वर्षांहून अधिक काळ लागतो. हे समजून न घेतल्याने असे होते. युनिटलिन्क्ड योजनांमधून कधी बाहेर पडायचे, तत्कालीन बाजाराची स्थिती पाहून उपलब्ध पर्यायांपकी रोखे व शेअर यापकी कुठल्या पर्यायाचा कसा व केव्हा वापर करायचा हे गुंतवणूकदाराने समजून घेणे आवश्यक आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे २००८ मध्ये ज्यांनी युनिटलिन्क्ड योजना घेतल्या त्यांची ही गुंतवणूक अजून तोटय़ात आहे. या गुंतवणुका फायद्यात येण्यास अजून दोन वष्रे लागतील. वरवर पाहता समान आर्थिक कौटुंबिक पाश्र्वभूमी असणाऱ्यांचे प्रत्यक्षात आर्थिक नियोजन किती वेगळे असते ते पुढील उदाहरणाने पाहू –
डॉ. सीता व गीता (नावे बदललेली) उत्तम आर्थिक स्थितीतल्या दोन एकाच वयोगटातील महिला. डॉ सीता यांना पतीच्या विम्याचे ५० लाख रुपये वयाच्या ४८ व्या वर्षी मिळाले तर गीता यांना राहते घर व एक दुकान वारसा हक्काने वाटय़ाला आले.
खरे तर डॉ. सीता यांच्या सर्व कौटुंबिक आर्थिक जबाबदाऱ्या ही विमा पॉलिसी खरेदी केल्यापासून पाच – सहा वर्षांत संपणार आहेत. मुलांची शिक्षणे संपून ती स्वतच्या पायावर उभी राहणार होती. तेव्हा १५ वर्षे इतक्या मोठय़ा विमाछत्राची गरज नाही.
याला वित्तीय नियोजनात ‘Over Insured’ अशी संज्ञा आहे. PMS योजनेत पसे गुंतविण्याऐवजी डॉ. सीता यांनी म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांमध्ये SIP करून उर्वरित ५०% रक्कम म्युच्युअल फंडाच्या मुदतबंद योजनांमध्ये (FMP) गुंतवायला हवी होती.
मोटारीसाठी घेतलेले कर्ज हा कर नियोजनाचा एक भाग आहे. डॉ. सीता आणि गीता यांच्या वित्तीय नियोजनात एक मुख्य फरक म्हणजे डॉ. सीता यांच्याकडे गुंतविण्यासाठी एकरकमी पसा उपलब्ध होता. तर दर महिन्याला गीता यांना त्यांचा पगार व दोन दुकाने व एक घर यांच्या भाडय़ापोटी येणाऱ्या रकमेतून गुंतवणूक करायची होती.
घरासाठी व दुकानासाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यासकट इतर खर्च करून गीता यांच्या हातात दरमहा रु. ७५,००० शिल्लक राहतात.
गीता यांनी PPF खाते उघडून दरमहा ८,००० रुपये या खात्यात भारतात. म्युच्युअल फंडांच्या चार योजनांमध्ये प्रत्येकी रु. १०,००० ची SIP केली आहे. दर महिन्याला वेगवेगळ्या मुदतीच्या FMP मध्ये रु. २५,००० गुंतवीत आहेत.FMP मधील गुंतवणुकीमुळे गुंतवणुकीत द्रवता राहते तीन – चार महिन्यांनी हातात ठराविक रक्कम पडते. गीता यांचे शिस्तबद्ध नियोजन असल्यामुळे इतर ग्राहकांपेक्षा गीता यांच्या परताव्याचा दर २-२.५% सरस आहे.
वित्तीय नियोजक व विमा विक्रेता यांच्या भूमिका काय आहेत, त्या कशा वेगळ्या ते सवडीने पुढे पाहू. आपल्या गरजा ओळखून वित्तीय ध्येयनिश्चिती करून योग्य नियोजन केल्यास वर उल्लेखलेली समर्थाची मुर्खाची लक्षणे लागू होणार नाहीत. ग्राहकांना वित्तीय ध्येय निश्चित करून योग्य मार्गदर्शन करणे हे जितके महत्त्वाचे तितकेच वित्तीय सल्लागाराला त्याचा योग्य मोबदला देणे हेही महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीसाठी फक्त योग्य गुंतवणूक माध्यम निवडून भागत नाही तर योग्य वेळी नफा कमावून बाहेर पडणेही महत्त्वाचे असते. योग्य वित्तीय सल्लागाराची निवड, वास्तवाचे भान ठेवून परताव्याची केलेली अपेक्षा व आपल्या गरजांची ओळख या त्रिसूत्रीच्या आधारावर आपले वित्तीय लक्ष (Financial Goal) सहज गाठू शकू, याची खात्री बाळगा.