देशातील १०,००० एकर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा वाडिया समूहाच्या कंपन्या, वाडिया कुटुंबियांचे ट्रस्ट यांच्या मालकीच्या आहेत. कधी काळी कापडाची प्रमुख गिरणी अशी ख्याती असलेली ‘बॉम्बे डाइंग’ ही कंपनी आज मुंबईतील एक प्रमुख मालमत्ता विकासक आहे. परळ, शिवडी, नायगांवसारख्या मध्य मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागा कंपनी टप्प्या-टप्प्याने विकसित करीत आहे. मुंबईतील जागेला सोन्याचा भाव असल्यामुळे कंपनीचे भविष्यदेखील उज्ज्वल आहे.
मुंबई गं नगरी बडी बाका.. जशी रावणाची दुसरी लंका.. वाजतो ग डंका
परळापासून सरळ रस्ता भायखळ्याच्या पुलावरचा
तिथून पुढे खालचा लागलं उभा पारशी
बटाटय़ाची चाळ तुला कायम सांभाळ तिथं बांधुनिया पवळे जपून चाल.. घाईघाईत होतिल हाल
धर हात सावरी तोल (हा पठ्ठे बापुचा बोल)
अगं ही मुंबई.. पाहिली मुंबई..
– शाहीर पठ्ठे बापूराव
(श्रीधर कृष्ण कुलकर्णी)
माणसाचे आपल्या जन्मभूमीवर आणि कर्मभूमीवर प्रेम असते. याच भावनेतून आपला व्यवसाय, आपल्या शहराच्या नावाने सुरु करण्याची परंपरा मोठी आहे. जम्मू काश्मीर बँकेपासून तामिळनाडू न्यूज पिट्रपर्यंत आणि आसाम कंपनीपासून गुजरात नर्मदा फर्टिलायझपर्यंत अशी उदाहरणे पाहायला मिळतात. बँक ऑफ महाराष्ट्र, बॉम्बे डाइंग इतकेच नव्हे तर बलरामपुर चीनी मिल्स, चेंबूर पाताळगंगा पाईपलाईन लि. (सध्याची रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर) वगैरे एखाद्या गावाच्या नावाने सुरुवात होणाऱ्या कंपन्या मुंबई शेअर बाजारात पाहायला मिळतात.
जी गोष्ट व्यवसायाची तीच कलाकृतीची. कवी बोरकर ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’सारख्या कविता लिहून जातात तर सांगलीच्या वाळवा तालुक्यात जन्मलेल्या पठ्ठे बापूरावांना कर्मभूमी मुंबईवर लावणी रचण्याची स्फुर्ती होते. ‘दोन लक्ष आम्ही लावणी केली’ असे पठ्ठे बापूराव लिहून गेले. या लावणीत मुंबईतील परळ, भायखळा, खडापारशी अशा प्रसिद्ध ठिकाणांचा उल्लेख आला आहे. मुंबई महापालिकेने त्यांच्या शाहिरीचा गौरव म्हणून मुंबईतील एका प्रमुख रस्त्याला ‘शाहीर पठ्ठे बापूराव मार्ग’ असे नाव दिले आहे.
आजची कंपनी आपल्या मुंबईच्या नावाने असलेली आणि सध्या रावणाच्या लंकेसारखी असणारी म्हणून सुरुवात या लावणीने. वाडिया समूहाची स्थापना १९७९ मध्ये या कंपनीने झाली. घराघरांत पलंगपोस व उशीच्या अभ्यासासाठी माहित असलेली ही मुंबईतील एक प्रमुख कापडाची गिरणी होती, असे आज म्हणावे लागते. काळाच्या ओघात कंपनीने सुती वस्त्रोद्योगाबरोबरच कृत्रिम धागे, नागरी विमान वाहतूक, बांधकाम या क्षेत्रात जम बसविला. कंपनीचा ५५.६% महसूल मालमत्ता विकासातून १९% वस्त्र उद्योगातून तर २५.४ कृत्रिम धाग्यांच्या उत्पादनाच्या विक्रीतून येते. एक प्रमुख मालमत्ता विकासक असलेल्या या कंपनीस नजीकच्या भविष्यातील अपेक्षित रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याज दरकपातीचा फायदा नक्कीच होईल. म्हणून २९ जानेवारी रोजी संभाव्य व्याजदर कपातीचा फायदा होणाऱ्या उद्योगातील कंपन्या सूत्रात बसणारी ही कंपनी. ‘बॉम्बे रिअ‍ॅलिटी’ ही बांधकाम व्यवसायासाठी स्थापन केलेली बॉम्बे डाइंगची उपकंपनी आहे. ही कंपनी या वाडिया समुहासाठी कामधेनु ठरली आहे. वाडिया समुहाकडे मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी जागा असून कंपनी ही जमीन विकसित करणार आहे. मुंबईत वरळी, शिवडी, प्रभादेवी, नायगाव इथे गृहबांधणी प्रकल्प व व्यावसायिक इमारतींचे प्रकल्प चालू आहेत. सध्या चालू असलेल्या प्रकल्पात शिवडी येथील ‘आयलंड सिटी सेंटर’ व नायगांव दादर येथील ‘वाडिया सिटी सेंटर’ या मुख्य प्रकल्पांचा समावेश होतो. ‘आयलंड सिटी सेंटर’ येथे तिसऱ्या अती उंच मनोऱ्याचे काम प्रगतीपथावर आहे. तर ‘वाडिया सिटी सेंटर’ यात हॉटेल, गृहबांधणी, व्यावसायिक, सभागृह यांचा समावेश होतो. यातील नायगाव येथील िस्प्रग मिल बांधकामाच्या संदर्भातली कंपनीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून कंपनीने सर्वोच्च न्यायालयात त्याविरुद्धचा अर्ज दाखल केला आहे. याच समुहाचा भाग असलेल्या ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा बंगळुरू येथे असलेला सहा एकरांच्या भुखंडाचा विकास बॉम्बे रियालिटी करणार आहे.
पूर्वी मुंबईत वरळी येथे असलेली कापड गिरणी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे स्थलांतरित केली आहे. सध्या हा विभाग तोटय़ात आहे. यामध्ये नसíगक धाग्यांपासून बनविलेली वस्त्रे, यात टॉवेल, पलंगपोस, उशीचे अभ्रे यांचा समावेश होतो. कंपनीला वस्त्रोद्योगामधील प्रगत तंत्रज्ञान वापरण्यासाठी (Technology Upgrading Fund Scheme) या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या योजनेखाली वस्त्रोद्योग व्यवसाय रु. २,५०० कोटी खर्चून अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसविण्यात येत असून एप्रिल २०१३ पासून नवीन यंत्रसामुग्री वापरून उत्पादनास प्रारंभ होईल. तर कृत्रिम धाग्यांच्या व्यवसायात (पॉलिस्टर स्टेपल फायबर) शुटींग-शर्टिंग, साडय़ा यांचा समावेश होतो. हा कारखाना रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा येथे आहे. (हा व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीजला विकण्याच्या वाटाघाटी चालू असल्याच्या बातम्या अधून मधून येत असतात.) कंपनी ‘गो एयर’ या नाममुद्रेखाली स्वस्त नागरी विमान वाहतूक २००५ पासून व्यवसाय करते. वाडिया कुटुंबीय, बॉम्बे डाइंग व ब्रिटानिया इंडस्ट्रीज व इतर या कंपनीचे भागधारक आहेत. भारतातल्या २२ ठिकाणांहून रोज १०० उड्डाणे प्रवाशांची ने-आण करत असतात. भारतातल्या नागरी विमान वाहतूक कंपन्यांत २००७ पासून सर्वात जास्त क्षमता वापरणारी (Load Factor) असा लौकिक असलेल्या कंपनीची ९५% विमाने वेळेवर ये-जा करतात हाही लौकिक कंपनीने प्राप्त केला आहे. सध्या बॉम्बे डाइंग एका संक्रमणातून जात आहे. विविध विभागांच्या विक्रीचे प्रमाण दरवर्षी बदलत आहे. आíथक वर्ष २०११ पेक्षा २०१२ मध्ये मालमत्ता विकास व्यवसायातून मिळणारा महसूल दुप्पट झाला आहे. येत्या दोन वर्षांत वस्त्रोद्योग विभाग संचित तोटा भरून फायद्यात येईल आणि बांधकाम प्रकल्प पूर्ण होऊन रोख प्रवाह (Cash Flow) सुधारेल. या कंपनीवर असेलेले मोठे कर्जाचे ओझे हा विश्लेषकांचा नेहमीचा आक्षेप राहिला आहे. परंतु कंपनीने आखलेल्या योजनांनुसार येत्या काही वर्षांत ‘गो एअर’च्या समभागाची प्राथमिक खुली विक्री, अर्थसंकल्पात बांधकाम क्षेत्रात प्रत्यक्ष परदेशी गुंतवणुकीस मुभा मिळण्याची शक्यता लक्षात घेता कंपनीला ‘बॉम्बे रिअ‍ॅलिटी’ची ‘जीडीआर’ किंवा त्यावेळी जो मार्ग सगळ्यात जास्त फायद्याचा असेल त्या मार्गाने भांडवल उभारणी करून कर्जाचा भार कमी करता येईल.  कर्जाचे ओझे कमी होऊन व्याजाच्या खर्चात बचत होईल. याचा परिणाम प्रती समभाग मिळकत आर्थिक वर्ष २०१५ मध्ये २०-२२% वाढलेली आहे. आज सर्वसाधारण आर्थिक गुणोत्तरे असलेला समभाग दोन ते तीन वर्षे ठेवण्यासाठी घेतल्यास ३५-४५% आवर्ती दराने नफा मिळू शकतो. रु. १३९.८५ या कारकिर्दीतील सर्वोच्च भाव नोंदवून खाली येणे व निर्देशांक २०,००० च्या वर बंद होणे या दोन कारणाने ही खरेदी जोखमीची ठरू शकते. ही शक्यता लक्षात घेऊन ही खरेदी करावी.    
  बॉम्बे डाइंग अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग
दर्शनी मूल्य            :    रु. २
मागील बंद भाव     :    रु १२६.०५ (१८ जानेवारी)
वर्षांतील उच्चांक     :    रु. १३९.९५
वर्षांतील नीचांक     :    रु. ७३.१८
अपेक्षित भाव            :    रु. १६८

Story img Loader