कायद्याच्या चौकटीत राहून घरातल्या सदस्यांच्या नावे उत्पन्नाचे विभाजन केले तर प्राप्तिकर वाचतो. पण त्याच बरोबर ‘क्लिबग ऑफ इन्कम’च्या तरतुदीही लक्षात घ्याव्या लागतात. नाहीतर प्राप्तिकराच्या तिप्पट दंड भरावा लागतो याचा वसंतरावांनी आणि अलकावहिनींनी अनुभव घेतला होता.
त्या अनुभवानंतर (मागच्या लेखात लिहिल्या प्रमाणे) वसंतरावांनी अलका वहिनींना दिलेले ‘कौटुंबिक कर्ज’ DATTARAY-KALEअलका वहिनींनी गुंतवले आणि त्या गुंतवणुकीमधून त्यांना वेगळे उत्पन्न सुरूही झाले. हे सर्व कायद्याच्या चौकटीत बसणारे होते.
पण तरीही अलका वहिनींच्या नावे काही वर्षांनी पुन्हा एकदा प्राप्तिकर खात्यामधून उत्पन्नाचा स्रोत विचारणारी नोटीस आलीच. अशी नोटीस आल्याचे अलका वहिनींनी त्यांच्या ‘अहों’ना सांगितले. पण विचलित न होता, अगदी शांतपणे!
‘प्राप्तिकर खात्यामधून पुन्हा नोटीस आली आहे आणि तू इतक्या थंडपणे कशी सांगते आहेस? कोणत्या तारखेला प्राप्तिकर कार्यालयात जायचय?’
अलका वहिनीनी तारीख सांगितली.
‘अरे बापरे! मी त्या दिवशी ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईबाहेर आहे! आता काय करायचं? आपल्या वतीने त्या नोटीसला उत्तर द्यायला कुणी त्या क्षेत्रातला तज्ज्ञ जाऊ शकतो का हे मित्राला विचारतो.’
अलका वहिनी त्यांना म्हणाल्या, ‘अहो, जरा शांत व्हा. कुणालाही प्राप्तिकर खात्याच्या ऑफिसमध्ये पाठवायची गरज नाही. आणि तुम्हीही नििश्चतपणे ऑफिसच्या कामाला बाहेरगावी जाऊन या. मी स्वत: नोटीसला उत्तर द्यायला जाते.’
त्यांच्या या उत्तराने वसंतरावांना आश्चर्य वाटून त्यांनी विचारले ‘खरंच? तू हे सांभाळू शकशील? ’
‘रिलॅक्स! तुम्ही टेन्शन घेऊ नका. ऑफिसच्या कामावर लक्ष केंद्रित करा!’ अलका वहिनींनी त्यांना आश्वस्त केले.
वसंतराव ऑफिसच्या कामाला बाहेरगावी गेले खरे. पण त्यांचे सारे लक्ष इकडे नोटीसचे काय झाले असेल? असेसमेंट कशी होईल? किती दंड भरावा लागेल? याकडे लागले होते. ते अधून मधून अलका वहिनींना एसएमएस करून विचारणाही करायचे. इकडे अलकावहिनी प्राप्तिकर खात्याच्या ऑफिसमध्ये गेल्या आणि संबंधित अधिकाऱ्याशी त्यांचे बोलणेही झाले. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. तिकडे वसंतराव परतीच्या प्रवासात आणि नोटीसचे काय झाले असेल या चिंतेने अस्वस्थ! त्यांनी शेवटी अलका वहिनींना फोन करायचा ठरवलं. आणि पाहतात तर काय मोबाईल फोनला नेटवर्क नाही..काही वेळाने सेल फोनची विजेरीही डिस्चार्ज झाली. ते तशाच अस्वस्थतेत घरी पोचले. आणि आल्या आल्या त्यांनी अधीरपणे अलका वहिनींना नोटीसबाबत काय झालं म्हणून विचारलं!
अलका वाहिनी घडलेली हकीकत सांगू लागल्या- ‘त्या प्राप्तिकर अधिकाऱ्याने मला विचारलं तुम्ही कुठे काम करता? मी त्यांना म्हणाले मी गृहिणी आहे. त्यावर त्यांनी विचारलं मग तुम्ही घरी शालेय विद्यार्थासाठी खाजगी टय़ूशन्स वगरे घेता का? मी नाही म्हणाले. माझ्या या उत्तरावर त्यांनी विचारलं मग तुमच्या नावावर विविध कंपन्यामधील रोखे, मुदत ठेवी /बँकांमध्ये मुदत ठेवी अशी गुंतवणूक कशी? तुम्हाला भेट स्वरुपात काही रक्कम देऊन तुमच्या मार्फत तुमच्या मिस्टरांनी तुमच्या नावावर गुंतवणूक केली असेल तर हे सर्व उत्पन्न कलम ६४ अंतर्गत त्यांच्या उत्पन्नात समाविष्ट करावे लागेल. आणि त्यावर त्यांना व्याज, दंड भरावा लागेल. मी त्यांना सांगितलं की, ‘तसं काही केलेलं नाही. हे सर्व उत्पन्न मी निर्माण केले आहे. माझे मिस्टर गेली अनेक वष्रे मला दर महिन्याला काही रक्कम घर खर्चासाठी देत आहेत. बचत/ काटकसर करून त्यामधील रक्कम जसजशी वाचत होती, तसतशी ती मी विविध गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवत गेले. आणि हा त्या उत्पन्नाचा स्रोत आहे. तुम्हाला तर माहित आहेच गेली अनेक वष्रे मी दर महिन्याला जमा-खर्च लिहिते आहे. ती डायरीही मी घेऊन गेले होते. ती डायरी मी त्यांना दाखवली. आणि बँकेच्या पास बुक मधल्या एंट्रीजही दाखवल्या.’
‘अग, पण तुझे हे स्पष्टीकरण त्या प्राप्तिकर अधिकाऱ्याने मान्य केले का?’ वसंतरावांनी विचारले.
‘अहो, त्यांनी मान्य करणे भागच होते. कारण मी जे केलं ते कायदेशीर आहे. कायद्यामध्येच तशी तरतूद आहे. आणि हो, त्यांनी नुसते मान्यच नाही तर माझे कौतुकही केले म्हटलं!’ अलका वाहिनी अभिमानाने उत्तरल्या.
‘काय सांगतेस काय? अशी कुठली तरतूद आहे?’ वसंतरावांनी कुतूहलाने विचारले. आणि मग अलका वहिनींनी माहित करून घेतलेली आणि मुख्य म्हणजे अमलात आणलेली तरतूद वसंतरावांना सांगितली.
‘पतीने आपल्या पत्नीला घर खर्चासाठी दरमहा जी रक्कम दिली असेल त्यामधून बचत केलेल्या रकमेला ‘पिन मनी’ (Pin Money) म्हणतात आणि अशा ‘पिन मनी’ रकमेची त्याच्या पत्नीने जर गुंतवणूक केली तर त्यापासून निर्माण होणारे उत्पन्न पतीच्या उत्पन्नात समाविष्ट न होता म्हणजेच क्लब न होता पत्नीचेच धरले जाते. R.B.N.J. Naidu Vs. CIT 29 ITR 194
या खटल्यामधे तसा निर्णयच झाला आहे. त्यामुळे हे उत्पन्न कलम ६४ अंतर्गत तुमच्या उत्पन्नात क्लिबग ऑफ इन्कमच्या तरतुदीखाली क्लब होण्याचा आणि ते दडवलेले उत्पन्न म्हणून धरण्याचा प्रश्नच नव्हता. मी या तरतुदीचा फायदा घेतला आणि घरात माझ्या नावावर गुंतवणूक उत्पन्न चालू राहिले. माझे एकूण उत्पन्न २,५०,००० रुपयाच्या खाली असल्याने प्राप्तिकर अधिकाऱ्याने असेसमेंट करून शून्य (nil) प्राप्तिकर असेस केला आणि नोटीस रद्द केली. ही घ्या बर्फी, तोंड गोड करा.’
वसंतरावांनी बर्फीचा तुकडा तोंडात टाकला आणि कौतुकाने म्हणाले,‘ओह! दॅट्स ग्रेट!! मला खरंच तुझा अभिमान वाटतो.’
क्लिबग ऑफ इन्कम होऊ नये पण घरातल्या घरात उत्पन्न येण्यासाठी ‘पिन मनी’च्या गुंतवणुकीचा कसा उपयोग करता येतो हे तुमच्या लक्षात आले असेल. आता हे नियोजन झाले विवाहित दाम्पत्याच्या बाबतीत! पण ज्यांचे लग्न ठरले आहे पण अजून झाले नाही अशा होऊ घातलेल्या जोडप्यालाही गुंतवणूक नियोजन करून क्लिबग ऑफ इन्कम होऊ न देता घरातल्या घरातच उत्पन्न राहावे आणि प्राप्तिकर वाचावा यासाठी प्राप्तिकर कायद्यातच एक तरतूद आहे. ती तरतूद कोणती हे ‘लग्नाची बेडी पडण्यापूर्वी..’ या पुढच्या लेखात जरूर वाचा.
लेखक, प्राप्तिकर नियोजन सल्लागार
dattatrayakale9@yahoo.in

Story img Loader