भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणानंतर अनेक म्युच्युअल फंडांनी ‘फिक्स्ड मॅच्युरिटी प्लान’ (एफएमपी) जाहीर केले. एक ते तीन वर्षांच्या या योजना बघून काही गुंतवणूकदारांनी या योजनांमध्ये पसे गुंतवावेत का अशी विचारणा केली. एका बाजूला व्याजदर कोसळणार म्हणत असताना अचानक बँकांनी एक वर्षांच्या बँक मुदत ठेवीवरील व्याजदर वाढविले तसेच म्युच्युअल फंडांनी एफएमपीची घोषणा केली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा संभ्रम वाढणे स्वाभाविक आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदरात कपात केल्यावर गुंतवणूकदारांनी काळजीपूर्वक पावले टाकणे अपेक्षित आहे. सध्या व्याज देणाऱ्या (फिक्स्ड इन्कम) गुंतवणुका करताना काय करावे ते आपण पाहू.
’  मुदत ठेवी : व्याज दर घसरू लागले की दीर्घ मुदतीसाठी बँकेत ठेवी करण्याचा प्रयत्न करावा. सध्या एक वर्षांच्या मुदत ठेवींवर दिला जाणारा व्याज दर तीन ते पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर दिल्या जाणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त आहे. परंतु जास्त पसे एक वर्षांच्या ठेवीत गुंतवणे चांगले नाही. एक वर्षांनंतर व्याजदर खाली आले तर हा पसा अत्यंत कमी दराने तुम्हाला गुंतवावा लागेल. त्यामुळे शक्य असेल तर बँकेच्या मुदत ठेवीत तीन ते पाच वर्षांसाठी पसे गुंतवा. पसे गुंतवत असताना एकच मोठी मुदत ठेव करण्यापेक्षा लहान रकमेच्या अनेक मुदत ठेवी करा. उदाहरणार्थ, पाच लाख रुपये बँकेत ठेवायचे असतील तर पाच लाखाच्या एका मुदत ठेवीपेक्षा एक लाखाच्या पाच मुदत ठेवी करा. मुदतपूर्वी ठेव मोडायची वेळ आली तर सर्व पसे काढावे लागणार नाहीत, आवश्यक तेवढय़ाच रकमेच्या मुदत ठेवी मोडता येतात व उर्वरित रक्कम सध्याच्या व्याजदराने गुंतून राहते. उदाहरणार्थ, तुम्हाला अचानक दोन लाखांची गरज पडली तर तुम्ही एक लाखांच्या दोन मुदत ठेवी मोडू शकता. उरलेल्या तीन ठेवी चालू राहतील. परंतु जर एकच पाच लाखाची मुदत ठेव केली तर दोन लाख घेतल्यावर उरलेले तीन लाख त्यावेळी असलेल्या व्याजदराने गुंतवावे लागतील. घसरत्या व्याजदराच्या काळात नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी अशाप्रकारे पसे गुंतवावे. कारण त्यांच्या बाबतीत अचानक उद्भवणारी आजारपणे अशी परिस्थिती निर्माण करू शकतात.
बँकांच्या मुदत ठेवींच्या बाबतीत जरी दीर्घ मुदतीच्या ठेवी करणे योग्य असले तरी खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या मुदत ठेवीत मात्र एक वर्षांकरिता पसे गुंतवावेत. जास्त व्याजाच्या आमिषाने लहान किंवा अपरिचित कंपन्यांच्या मुदत ठेवींकडे जाऊ नये. त्यात धोका आहे.
’  एफएमपी : तुम्ही उच्च उत्पन्न गटात असलात तर म्युच्युअल फंडाच्या ‘एफएमपी’मध्ये पसे जरूर गुंतवा. एक व तीन वर्षांच्या योजना सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या योजनेत रोखता अशी नसतेच त्यामुळे सर्व पसे दीर्घ मुदतीच्या योजनेत गुंतवू नका. मुदत ठेवी मुदतीपूर्वी मोडता येतात. परंतु या योजनांमध्ये मुदत पूर्व पसे हवे असतील तर या या योजनांची युनिट शेअर बाजारात विकावी लागतात. त्यात पूर्ण पसे मिळतील याची शाश्वती नसते. त्यामुळे मुदतपूर्व गरज भासणार नाही असाच पसा या योजनांमध्ये गुंतवावा. या योजना मुदत ठेवींच्या तुलनेत चांगला करोत्तर नफा देतात त्यामुळे उच्च उत्पन्न गटाकरिता या योजना अत्यंत उपयुक्त आहेत. सध्या एक वर्षांच्या बँक बचत प्रमाणपत्राचे व्याजदर वाढलेले असल्याने एक वर्षांच्या एफएमपीमध्ये पसे गुंतवा.  
’  करमुक्त रोखे : हुडको, इंडियन रेल्वे फायनान्स कोर्पोरेशन यांचे करमुक्त रोखे नुकतेच बाजारात येऊन गेले. मार्चअखेपर्यंत असेच अनेक पर्याय तुम्हाला मिळतील. १०,१५ किंवा २० वर्षांच्या दीर्घ मुदतीकरता खात्रीचे करमुक्त उत्पन्न मिळवण्याकरिता या रोख्यांमध्ये जरूर पसे गुंतवा. हेलकावे खाणारे व्याजदर, पसे बुडण्याची भीती, वेळेवर व्याज मिळेल की नाही या व अशा अनेक धोक्यांवर मात करायची इच्छा असेल तर करमुक्त रोखे हा एक चांगला पर्याय ठरावा. आगामी कर्ज रोखे ७.२५% ते ७.७५% पर्यंत व्याज देऊ करतील अशी अपेक्षा आहे. उच्च उत्पन्न गटातील मंडळींनी या रोख्यांच्या पुनरागमनाची वाट पहायला हरकत नाही. व्याजदर खाली आल्यास या रोख्यांमध्ये भांडवली नफा कमविण्याच्या संधी मिळू शकतात.
’  गिल्ट फंड व इन्कम फंड : तुमची धोका स्वीकारण्याची तयारी असेल तर १२ ते १८ महिन्यांकरिता या फंडांमध्ये पसे गुंतवा. व्याजदर खाली येण्याची अपेक्षा असल्याने येत्या वर्षांत या फंडांकडून करोत्तर १०% पर्यंत उत्पन्न मिळू शकते. पुढील वर्षी भारतात मध्यावधी निवडणुका आहेत. येत्या २८ तारखेला भारताचा अर्थसंकल्प जाहीर होईल. त्यात सरकारने फारच हात सल सोडल्यास सरकारी कर्ज वाढतील व व्याजदरदेखील वाढतील. व्याजदर वाढले तर दीर्घ मुदतीच्या रोख्यांवर भांडवली नुकसान शक्य आहे. त्यामुळे या फंडांमध्ये पसे गुंतवण्यात थोडा धोका आहेच हे विसरू नका.

Story img Loader