प्रत्येकालाच नाविन्याचे आकर्षण असते. हा मानवाच्या मानसिकतेचा एक पलू आहे आणि हे वर्तन पूर्णत: नसíगक आहे. नवीन गाडी खरेदी करताना, दागिने बनविताना किंवा कपडय़ांच्या बाबत हे ठीक आहे. परंतु गुंतवणुकीच्या बाबतीत मात्र ही मानसिकता धोकादायक आहे. कित्येकदा हीच विचारधारा ‘आयपीओ’मध्ये अर्थात प्राथमिक बाजारपेठेत गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करते. हे सत्य आहे की अनेक गुंतवणुकदारांनी ‘आयपीओ’च्या माध्यमातून गुंतवणूक करुन प्रचंड नफा कमावलेला आहे. परंतु प्रत्यक्षातील आकडेवारी पडताळून पाहिली तर गमावलेल्यांची संख्या त्यांच्यापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे.

वेगवेगळया कारणांसाठी कंपन्यांना पशाची गरज भासते. ती पूर्ण करण्याचे मार्ग म्हणजे एक तर कर्ज काढणे किंवा भागभांडवल वाढविणे. भांडवल वाढवायचे असेल तर कंपन्यांना समभागांची प्रारंभिक खुली भागविक्री अर्थात ‘आयपीओ’सारख्या माध्यमाचा उपयोग करावा लागतो. कंपन्यांनी आयपीओद्वारा वाजवीपेक्षा अधिक पसे गोळा करू नये म्हणून त्यांच्यावर अंकुश ठेवणे आवश्यक आहे. पूर्वी ‘कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यूज’ (उउक) या सरकारी विभागाकडून कंपन्यांना आयपीओसाठी मंजूरी घ्यावी लागे. आयपीओचा दर काय ठेवायचा हे सीसीआय ठरवायची. त्या काळात ज्यांनी आयपीओद्वारा गुंतवणूक केली आहे त्यांनी अक्षरश: धो धो पसे कमावले आहेत. बाजारात वेळोवेळी उपलब्ध असलेल्या चढय़ा भावांच्या मोहाला बळी न पडता ज्यांनी आजपर्यंत केवळ बोनस आणि लाभांशाचाच लाभ घेतला आहे ते आज कोटय़धीश झालेले आहेत. नमुन्यादाखल उदाहरणे पाहा-

’ १९६० मध्ये ज्यांनी आयपीओमध्ये १०० बजाज ऑटोचे शेअर्स घेतले आहेत (गुंतवणूक रु. १०,०००) त्यांची आजची गंगाजळी आहे ४३.६१ कोटी रुपये दसादशे परतावा २२.३३%.

’ १९७३ च्या रॅनबॅक्सीमधील १,००० रुपयांच्या गुंतवणुकीचे आज झाले आहेत १७.४४ लाख रुपये. दसादशे परतावा २०.५०%.

’ १९७८ च्या सिप्लामधील १०,००० रुपयांच्या गुंतवणुकीचे आज मोल आहे  १३६.८० कोटी रुपये. दसादशे परतावा ४०.२०%.

’ विप्रोने तर विक्रमच केला आहे. १९८० मधील कंपनीच्या आयपीओमधील १०० समभागाच्या १०,००० रुपयांच्या गुंतवणुकीचे जानेवारी २०१३ मध्ये २४३.३० कोटी रुपये झाले. द.सा.द.शे. परतावा ४५.६२%.

ही आकडेवारी म्हणजे आजची शेअर्सची किंमत झाली. दरवर्षी कंपनीने दिलेले लाभांश वेगळे. कालांतराने ‘सेबी’च्या स्थापनेसह आयपीओ मंजुरीचे अधिकार सेबीकडे आले. नियमात बदल झाले आणि कंपन्यांना आयपीओचा दर बाजारभावानुसार ठेवण्याची मुभा मिळाली. त्यामुळे आज तांत्रिकदृष्या आयपीओ आणि बाजारात सौदे होत असलेले इतर समभाग यामध्ये काहीच फरक राहिलेला नाही. १९९३ पूर्वी इन्फोसिसच्या आयपीओसाठी सीसीआयने ११ रुपयांचा भाव मंजूर केला होता. नंतर १९९३ मध्ये सेबीच्या काळात त्याला ९५ रुपयांची मंजूरी मिळाली. त्यावेळी त्या आयपीओला गुंतवणुकदारांचा पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही आणि आयत्यावेळी अमेरिकन वित्तसंस्थेने हात दिला म्हणून ही भागविक्री तरून गेली. इन्फोसिसने गुंतवणुकदारांना भरभरून दिले यात वाद नाही. १९९३ मधील ९,५०० रुपयांच्या गुंतवणुकीचे आज २.९९ कोटी रुपये असे मोल झाले आहे. या गुंतवणुकीचा द.सा.द.शे. परतावा ४९.६०% असा सज्जड आहे. जर तो आयपीओ ९५ रुपयांऐवजी ११ रुपयांच्या भावाने बाजारात आला असता तर गुंतवणूकदारांचा परतावा ६६.६३% झाला असता.

१९९०-९१ मध्ये आíथक सुधारणा आणि जागतिकीकरणाला सुरूवात झाल्यानंतर भारतीय कंपन्यांना जागतिक स्तरावरील चढाओढीला तोंड देण्यासाठी रचनात्मक स्थित्यंतरे करणे भाग पडले. त्यासाठी अतिरिक्त भांडवलाची गरज भासू लागली आणि ‘राईटस इश्यू’ व ‘आयपीओ’चे प्रमाण वाढले. १९९१-९२ मध्ये भारतीय कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून सुमारे ६,२०० कोटी रुपये जमा केले होते. ती रक्कम १९९४-९५ मध्ये २७,६०० कोटी रुपये झाली. सरासरी ३४.८०% वार्षिक वाढ झाली. या गुंतवणुकीमध्ये बहुतांशी गुंतवणूकदारांनी मार खाल्ला. त्यांनतर आयपीओचे प्रमाण कमी झाले. नव्वदीच्या दशकाच्या शेवटी आयटी आणि डॉट कॉम कंपन्यांची हवा उठली आणि त्या क्षेत्रामधील अनेक कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले. हे वेड इतक्या मोठया प्रमाणात वाढले की कोणी ‘वडापाव डॉटकॉम’ नावाने आयपीओ बाजारात आणला असता तर तोही ‘ओव्हर सबस्क्राईब’ झाला असता. १९९१ ते २००० या दशकातील एकूण आयपीओपकी ५०% हून कमी कंपन्या २००६ पर्यंत बाजारात नोंदणीकृत होत्या. बाकी कंपन्या एक तर दुसऱ्या कंपन्यांमध्ये विलीन झाल्या किंवा चक्क गायबच झाल्या.

२००६-०७ मध्ये पुन्हा एकदा आयपीओची चलती सुरु झाली. यावेळचे वेड होते वित्त, पायाभूत सेवा आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे. नोंदणी झाल्यानंतर चढय़ा भावाने विक्री करून नफा पदरात पाडायचा या उद्देशाने ज्या गुंतवणूकदांरानी या आयपीओमध्ये गुंतवणूक केली त्यापकी बहुतेकांनी स्वत:चे नुकसान करून घेतले. गुंतवणूकदारांना शेवटचा आणि सणसणीत फटका दिला तो २००८ च्या जानेवारीमधील रिलायन्स पॉवरच्या आयपीओने. कंपनीचा आयपीओ बाजारात आला तेव्हा त्या कंपनीचा एकूण नफा होता फक्त १६ लाख रुपये. ‘इश्यू प्राईस’ होती ४५० रुपये प्रति शेअर आणि ५००० पट असा कमालीचा चढा पी/ई रेशो होता. सर्वसामान्य गुंतवणूकदारच नव्हे तर तथाकथित तज्ज्ञ, म्युच्युअल फंडांच्या फंड व्यवस्थापकांनीही त्यात पसे गुंतविले आणि त्या आयपीओने इतिहास घडविला.

या सर्व प्रकारांमध्ये कंपनीच्या व्यवस्थापकांइतकेच किंबहुना त्यापेक्षा जरा जास्तच गुंतवणूकदार बँका सहभागी असतात. आयपीओ बाजारात आणताना कंपन्यांना ते नियुक्त करावे लागतात. त्यांना एक ठराविक शुल्क द्यावे लागते. त्याचबरोबर प्रोत्साहन म्हणून विक्रीच्या रकमेचा काही भागही द्यावा लागतो. या प्रोत्साहनाची जास्तीत जास्त रक्कम मिळावी म्हणून ते आयपीओचा भाव वाढवतात. त्यांना कंपनीच्या आíथक वाटचालीची पूर्ण माहिती असते. परंतु वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे या एकाच उद्देशाने ते गुंतवणूकदारांची दिशाभूल करीत असतात.

१९९१ पासून बाजारात आलेल्या आयपीओपकी इन्फोसिसने गुंतवणूकदारांचा जास्तीत जास्त नफा करून दिला आहे. बाकी कंपन्यांनी काय दिले आहे याचा आढावा घेतला तर या कुटील प्रकाराची नीट कल्पना सहज येते.

जुल २००७ मध्ये एचडीआयएलचा आयपीओ ५०० रुपये भावाने बाजारात आला. सहा महिन्यांमध्ये त्याचा बाजारभाव झाला १,४१२ रुपये. आज ६ वर्षांनंतर त्याचा भाव आहे ४० रुपये. कोलते-पाटील, ब्रिगेड एन्टरप्राइजेस् वगरे कंपन्यांची देखील तीच गत आहे. ऑर्बिट कॉर्पोरेशन, आकृती सिटी यांच्यासारख्या छोटय़ा कंपन्यांनी गुंतवणूकदारांना थोडाफार हात दिला होता. परंतु आज त्याही कंपन्यांमधील गुंतवणूक नुकसानीतच आहे. वित्तीय क्षेत्रातील मोतीलाल ओसवाल, एडेल्वाईज कॅपिटल वगरे कंपन्यांच्या  बाबतीतही तोच प्रकार आहे. आयटी क्षेत्रातील व्हिजुअल सॉप्टवेअर नावाची कंपनी. १० रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या या कंपनीचा भाव १०,००० रुपयांपर्यंत पोहोचला होता. आज त्या कंपनीचा ठावठिकाणाच नाही. त्याचप्रमाणे एकेकाळी बाजारात लोकप्रिय असलेल्या सॉफ्टवेअर सोल्युशन, डीएस्क्यू् सॉफ्टवेअर, पेंटाफोअर मीडिया वगरे कंपन्यांचा आज पत्ताही नाही.

कोणतीही कंपनी आयपीओद्वारा गुंतवणूकदारांकडून जेव्हा पसे जमा करत असते तेव्हा त्याला अनेक कारणे असतात.

१. सध्या आहे तो व्यवसाय वाढवायचा २) नवीन व्यावसाय सुरू करायाचा ३) सुरुवातीच्या काळात ज्या प्रायव्हेट इक्विटीवाल्यांनी कंपनीमध्ये पसे गुंतविले असतील त्यांना नफा बांधून बाहेर पडायची संधी घ्यायची वगरे वगरे. यापकी पहिल्या दोन कारणांसाठी जर कंपनीने पसे जमा केले तर त्यामध्ये सामान्य गुंतवणूकदारांचे हित साधले जाण्याची शक्यता जास्त असते. परंतु तिसऱ्या प्रकारामध्ये मात्र फक्त प्रवर्तकांचे किंवा प्रायव्हेट इक्विटी गुंतवणूकदारांचेच भले साधले जाते.

याचे ताजे उदाहरण म्हणजे मे महिन्याच्या चौथ्या आठवडय़ामध्ये बाजारात आलेला ‘जस्ट डायल’ कंपनीचा आयपीओ होय. या आयपीओद्वारा कंपनीकडे जमा झालेले पसे कंपनीच्या भविष्यातील भरभराटीसाठी नाहीत. आयपीओपूर्वी कंपनीमध्ये ज्यांचे पसे होते ते कंपनीचे प्रवर्तक आणि काही वर्षांपूर्वी कंपनीच्या भरभराटीसाठी ज्यांनी पसे गुंतविले होते त्या प्रायव्हेट इक्विटीच्या गुंतवणूकदारांच्या भल्यासाठी आहेत. आयपीओद्वारा देण्यात येणाऱ्या एकूण शेअर्सपकी १६ टक्के प्रवर्तकांचे आणि ८४ टक्के प्रायव्हेट इक्विटीवाल्या गुंतवणूकदारांचे होते. जे इतर गुंतवणूकदारांना देऊन त्यांनी ८००% पेक्षा जास्त परतावा प्राप्त केला आहे. २०११ च्या जानेवारीमध्ये या कंपनीने सिने-अभिनेता अमिताभ बच्चनला ६२,७९४ शेअर्स १० रुपये भावाने दिले. (आज बाजारभाव रु. ६३०) त्याने ते बाजारात विकले तर नफ्याचे प्रमाण होईल द.सा.द.शे ३७०%. सेबीने ‘सेफ्टी नेट’ म्हणून नवीन कायदा केला आहे त्यामुळे ‘जस्ट डायल’च्या आयपीओच्या गुंतवणूकदारांचे सहा महिने तरी नुकसान होणार नाही. परंतु फायद्याच्या दृष्टीने विचार केला तर इतर गुंतवणूकदार अगोदरच मलई खाऊन बसलेले आहेत.

निष्कर्ष : १९९०-९१ पासूनच्या या इतिहासावर नजर टाकली तर आयपीओमधील गुंतवणूक वरकरणी जरी फायदेशीर दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र तशी नाही. खरे तर ही गुंतवणूक सामान्य गुंतवणूकदारांना बकरा बनविण्यासाठी आहे असे म्हटले तरी त्यात काही वावगे नाही. सर्वसाधारपणे हे आयपीओ तेजीच्या काळात बाजारात आणले जातात. जेणेकरुन सामान्य गुंतवणूकदार त्यासाठी जास्त पसे मोजण्यास राजी होतात. काही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आयपीओने गुंतवणूकदारांचे भले केले आहे.

अशा परिस्थितीत सर्वसाधारण गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूकीचा सुरक्षित मार्ग म्हणजे कंपनीचे भवितव्य खरोखरच चांगले असेल तर आयपीओच्या वेळी जेव्हा अनेक गुंतवणूकदार (कळपापासून वेगळे राहणे ज्यांना शक्य होत नाही असे) त्याकडे आकर्षति झालेले असतात तेव्हा त्यात गुंतवणूक करणे टाळावे. हेच गुंतवणूकदार काही दिवसांनी जेव्हा आपला संयम गमावून बसतात आणि नफ्या-नुकसानीची फिकीर न करता आपल्याकडील शेअर्स विकतात तेव्हा ते रास्त भावाने घ्यावेत. त्यातच फायदा आहे. कमीत कमी, नुकसानीची शक्यता तरी इतरांपेक्षा कमी आहे.

 

 

Story img Loader