दसरा सरला की दिवाळीचे वेध लागतात आणि दिवाळी म्हटली की नवीन खरेदी आलीच. कपडे, सोने याच्या जोडीला शेअर बाजारदेखील लक्ष्मीपूजन व मुहूर्ताचे सौदे करून आपल्या पद्धतीने दिवाळी साजरी करीत असतो. या वर्षी तर बाजार सार्वकालिक उच्चांकाच्या नजीक आहे. म्हणून या वर्षीची दिवाळी ही बाजारासाठी खासच! मागील वर्षांपासून दिवाळीच्या मागेपुढे ‘अर्थ वृत्तान्त’सुद्धा दिवाळीसाठी विशेष खरेदी सुचवीत असतो. या वर्षी दसरा व दिवाळी हे दोन्ही सण ऑक्टोबर महिन्यात आले आहेत. म्हणून गतवर्षीप्रमाणेच आम्ही विश्लेषकांना त्यांनी मागील वर्षभरात अभ्यासलेल्या कंपन्यांपकी एका कंपनीची निवड करण्यास सांगितले. असे आठ विश्लेषक आपल्या पसंतीच्या कंपन्या घेऊन येत आहेत ‘अतिथी विश्लेषक’ म्हणून..
आरएस सॉफ्टवेअर
(बीएसई कोड – ५१७४४७)
रु. ६९७.३०
वार्षिक उच्चांक/नीचांक :
रु. ८३० / रु. १३८.८०
दर्शनी मूल्य : ” १०
पी/ई : १४.४५
आरएस सॉफ्ट : ‘अलिबाबा पर्वा’च्या उदयाचा लाभार्थी
आरएस सॉफ्टवेअर ही ‘अर्थ वृत्तान्त’च्या वाचकांसाठी नवीन कंपनी नाही. परंतु ज्यांनी आधीच या कंपनीत १३०-१३५ रुपये दरम्यान गुंतवणूक केली त्यांच्यासाठी व ज्यांची बस चुकली त्यांच्यासाठीदेखील या कंपनीची नव्याने शिफारस करता येईल. ही कंपनी १९९१ मध्ये सुरू झाली. कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या रोख रकमेचे व्यवहार (Online Payment) करणे, संगणक प्रणाली तयार करणे हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. ‘क्लाऊड कॉम्युटिंग’ या क्षेत्रातील ती एक प्रमुख कंपनी आहे. कंपनीचा व्यवसाय अधिक स्पष्ट करून सांगायचा तर एखाद्या बँकेचे परिचलन हाताळणारे इन्फोसिसचे ऑरेकलसारखी मुख्य संगणक प्रणाली असते. याच जोडीला क्रेडिट कार्डचे पसे वळते करणे, एखाद्या संस्थेकरिता देणगी स्वीकारणे, मोबाइलची देयके स्वीकारणे, सरकारी अनुदाने थेट खात्यात जमा होणे इत्यादीसाठी रक्कम स्वीकारण्यासाठी एक ‘पेमेन्ट गेटवे’ असावा लागतो. त्यासाठी लागणारी यंत्रणा हाताळणी करण्याचे काम आरएस सॉफ्टवेअर करते. हे काम जोखमीचे असल्याने व बँकेच्या मुख्य संगणक प्रणालीशी संबंध येणारे असल्याने बँका सहसा नवीन पुरवठादारापेक्षा आरएस सॉफ्टवेअरसारख्या अनुभव असलेल्या पुरवठादारास प्राधान्य देतात. एखादी संगणक प्रणाली पुरविण्यापूर्वी चाचणी, विक्रीपश्चात सेवा संगणक प्रणालीची निगा, परिचालन या सर्व क्षेत्रांत या कंपनीने लौकिक मिळविला आहे. दोन कंपन्या अथवा बँका यांच्यात होणारे विलीनीकरण होते तेव्हा ‘पेमेन्ट गेटवे’ची पुनर्रचना केली जाते. अर्थव्यवस्थेत वाढणारे ऑनलाइ व्यवहारांचे प्रमाण कंपनीसाठी व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध करून देणारे आहे. उदाहरण देऊन सांगायचे तर सेबीने प्रत्येक मालमत्ता व्यवस्थापन कंपनीला (म्युच्युअल फंड) आपली उत्पादने ऑनलाइन पद्धतीने विकत घेण्याची सुविधा सक्तीचे केले आहे. ही मुदत येत्या एका महिन्यात संपेल. यासारख्या परिस्थितीत प्रत्येक मालमत्ता व्यवस्थापन कंपनीस ‘पेमेन्ट गेटवे’ असणे सक्तीचे झाले आहे. आज नळाद्वारे वायू, मोबाइलची देयके अथवा रिचार्ज हे ऑनलाइन पद्धतीने होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. या प्रत्येक व्यवहारासाठी एका ‘पेमेन्ट गेटवे’ची आवश्यकता पडते. ही परिस्थिती कंपनीसाठी व्यवसाय विस्तार करण्याची संधी उपलब्ध करून देणारी आहे. आणखी एक उदाहरण म्हणजे, जेव्हा ‘लोकसत्ता’सारखे दैनिक ‘सर्व काय्रेषु सर्वदा’सारखा उपक्रम राबवते तेव्हा मोठय़ा प्रमाणावर देणगीदारांचे धनादेश जमा होतात. आजपासून तीन ते पाच वर्षांनी प्रत्येक संस्थेच्या खात्यात थेट रक्कम जमा होणे शक्य होईल. यामुळे मोठय़ा संख्येने जमा होणाऱ्या धनादेशांची हाताळणी टाळणे शक्य होईल. आज तरुणाच्या देशात तरुणाईचा कल हा ऑनलाइन व्यवहार करण्याकडे आहे. ऑनलाइन पोर्टल ‘अलिबाबा’च्या नुकत्याच झालेल्या खुल्या समभाग विक्रीला मिळालेला प्रतिसाद हे वाढत्या ई-कॉमर्स व्यवहारांचे द्योतक आहे. प्रत्येक ई-कॉमर्स व्यवहार करणाऱ्या कंपनीला ‘पेमेन्ट गेटवे’ची आवश्यकता असते व ही आवश्यकता आरएस सॉफ्टवेअर पूर्ण करते. म्हणूनच आम्ही या कंपनीची दिवाळी खरेदीसाठी शिफारस करत आहोत.
बी. अनिल कुमार
info@firstcallindia.com
(कुमार हे ‘फर्स्ट कॉल रिसर्च’ या समभाग संशोधन संस्थेत समभाग विश्लेषक आहेत.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा