फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे, कुंच्या, तोपडी, शेले, शाली,
त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पठणी
नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी.
माझी आजी लग्नामधे ही पठणी नेसली होती
पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती
पठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास
ओळखीची..अनोळखीची..जाणीव गूढ आहे त्यास..
पठणी – शांता शेळके  
मराठी स्त्रीच्या मनात पठणीला खास जागा असते. आणि ती पठणी जर आजीची असेल तर त्याला वेगळे भावनिक मोल असते. शांताबाईनी अशाच एका पठणीचे वर्णन त्यांच्या या कवितेत केले आहे. आज शिफारस करण्यात आलेली कंपनीदेखील आपल्या गुंतवणुकीतील पठणीचे स्थान असलेली अशीच आहे.
प्रकल्प व्यवस्थापन, औद्योगिक उत्पादने, यंत्रसामग्री, माहिती तंत्रज्ञान, अवजड अभियांत्रिकी, वीजनिर्मिती उपकरणे, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, पतपुरवठा, रस्ते बांधणी, म्युच्युअल फंड व्यवस्थापन अशा अनेक व्यवसायात असलेली ही कंपनी आता बँकिंग परवाना मिळविण्याच्याही प्रयत्नात आहे, असे वारंवार ऐकण्यास मिळते. अभियांत्रिकीकडून वित्तीय सेवा व म्युच्युअल फंड व्यवस्थापनापर्यंत केलेली वाटचाल ही बँकिंग व्यवसायाच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे. रिझव्‍‌र्ह बँक जेव्हा बँकिंग व्यवसायासाठी नवीन परवाने देईल तेव्हा या कंपनीला परवाना मिळेल, अशी आशा करावयास हरकत नाही.
१९३८ मध्ये मुंबईत लार्सन आणि टुब्रो या डेन्मार्कच्या दोन अभियंत्यानी हिल्डा लिमिटेड कंपनीची स्थापना केली. सुरुवातीच्या कालावधीत दुग्धप्रक्रिया उद्योगास लागणारी यंत्रसामग्री बनविली जात असे. पुढे दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर डेन्मार्कहून होणारा पुरवठा थांबला. तेव्हा मुंबई बंदरात आलेल्या बोटींची दुरुस्ती केली जात असे. पुढे मिठापूर येथे टाटांचा सोडा अ‍ॅश कारखाना उभारण्यासाठी आलेल्या जर्मन तंत्रज्ञांना दुसऱ्या महायुद्धामुळे देश सोडून जावे लागले. ते काम या कंपनीला मिळून प्रकल्प उभारणी व्यवसायायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. १९४४-४७ या कालावधीत कंपनीने अनेक परदेशी कंपन्याबरोबर सामंजस्य करार केले. यात अमेरिकेची कॅटरपिलर, तसेच बिस्किट, खाद्यपदार्थ, दुग्धव्यवसाय यांच्या युरोपातील यंत्रसामग्री उत्पादकांशी करार होते. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर व्यवसायात असणारी संधी पाहून ७ फेब्रुवारी १९४६ रोजी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो (प्रा.) लिमिटेड कंपनीची स्थापना झाली. १९४८ मध्ये मुंबई उपनगरातील पवई तलावाकाठी असणारा ५५ एकराचा भूखंड कंपनीने विकत घेतला. बाजूचा ‘पवई हिल’ नावाने ओळखला जाणारा डोंगर फोडून तो भूखंड इमारती, कारखाने उभारण्यायोग्य करण्यात आला. साकीनाक्यापासून पवई तलावापर्यंत एक बलगाडी जाईल, इतपतच तेव्हा वाट होती. डिसेंबर १९५० मध्ये लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लिमिटेड असे नाव बदलण्यात आले. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे तीन कारखाने पवई इथे याच काळात उभे राहिले. भारतातील अनेक प्रकल्पांसाठी लागणारी यंत्रसामग्रीची निर्मिती इथेच झाली. म्हणूनच पवईच्या बाजूला जाणे झाले आणि ‘देवळा’चा कळस दिसू लागताच नकळत हात जोडले जातात.
गुंतवणूक करायची कारणे :
* प्रकल्प व्यवस्थापन विभाग (ईपीसी) : खते, पेट्रो – रसायने संकुल, खोल समुद्रातील तेल उत्खनन आदी प्रकल्पांबरोबरच कंपनीचे खोल समुद्रात तसेच जमिनीवर तेल-गॅस वाहून नेणाऱ्या पाईपलाईनचे जाळे आहे. ओएनजीसी, ब्रिटिश गॅस, कतार पेट्रोलियम, शेल या महाकाय कंपन्या या विभागाच्या ग्राहक कंपन्या आहेत.   
* एलटी पॉवर : ही कंपनी कोळसा गॅस व अणुऊर्जेवर आधारित वीजनिर्मिती क्षेत्रात आहे. सहनिर्मिती व स्वतंत्र ऊर्जा निर्मितीसाठी प्रकल्प उभारणी व परिचालन तसेच जपानच्या मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजबरोबर बाष्पक व वीजनिर्मिती उपकरणांची निर्मिती हजिरा येथे केली जाते. १,००० मेगावॅट पर्यंतची संपूर्ण वीजनिर्मिती यंत्रणा – यामध्ये कोळसा वाहतूक यंत्रणा, राख वाहतूक यंत्रणा, यासाठीचे बांधकाम अशा व्यवसायांचा या विभागात समावेश होतो.
* अवजड अभियांत्रिकी विभाग : जगातील पहिल्या तीन अवजड अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये हा समूह येतो. संरक्षण विभाग, पायाभूत सुविधा यात वीजनिर्मिती, तेल उत्खननासाठी लागणारे तरंगते फलाट, तेलवाहू कंटेनर वाहून नेणाऱ्या २०,००० टनपर्यंतच्या बोटी तसेच विविध वायू वाहून नेणाऱ्या बोटी, नाविक दलाच्या पाणबुडय़ा यांची निर्मिती या विभागात होते. कंपनीमार्फत भारतातील पहिल्या अणुइंधन पाणबुडीची उभारणी सुरू आहे.
* बांधकाम विभाग : भारतातील सर्वात मोठा बांधकाम विभाग या कंपनीचा आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, धरणे, रेल्वेचे पुल, महामार्गावरचे पुल, टोल महामार्ग आदीची आखणी, बांधणी व हस्तांतर यामार्फत होते. सध्या चच्रेत असलेल्या मंत्रालयाच्या दोन मजल्याच्या पुनर्बाधणीच्या कंत्राटासाठी कंपनीनेही निविदा भरली होती.
* विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभाग : तेलशुद्धीकरण व पेट्रो-रसायन संकुले, सीमेंट निर्मिती, पोलाद निर्मिती, कारखान्यांसाठी वीजपुरवठा या संकुलातील विविध नियंत्रण व त्यासाठी लागणारी यंत्रणा हा विभाग पुरवितो.

* एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेक : ही कंपनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रकल्प हाताळते. बँकिंग, विमा, ऊर्जा, पेट्रो-रसायने या उद्योगांसाठी ती सेवा पुरवठादार आहे. फॉच्र्युन ५०० मधील अनेक कंपन्या या विभागाच्या ग्राहक आहेत.    
* इतर व्यवसाय : एल अ‍ॅण्ड टी कोमेत्सू ही कंपनी बांधकाम व खाण यंत्रसामग्री तयार करते. यंत्रसामग्री व औद्योगिक उत्पादने या विभागात हायड्रॉलिक यंत्रसामग्री, कॉम्पॅक्टर्स, प्लास्टिक मोिल्डग यंत्रे, विविध प्रकारचे व्हॉल्व्हज्, खाण पोलाद व सीमेंट यंत्रसामग्री दुरुस्तीसाठी लागणारे, विशेष वेिल्डगसाठी लागणारी उपकरणे व मिश्रधातू तयार होतात. अड्को इंडिया ही कंपनी विविध प्रकारचे व्हॉल्व्हज् तयार करते.
* एल अ‍ॅण्ड टी फायनान्स/ एल अ‍ॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स : या उपकंपन्या वित्तीय सेवा देतात. यात म्युच्युअल फंड व्यवसायाचा समावेश होतो. लार्सन अ‍ॅन्ड टुब्रोचे टोल आकारणी तत्त्वावर अनेक रस्तेबांधणी प्रकल्प चालू आहेत तर काही पूर्ण झाले आहेत. या प्रकल्पासाठी भांडवल उभारणी, कर्ज उभारणी आदी कामे ही कंपनी करते.
* एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेक : ही लवकरच स्वतंत्र कंपनी म्हणून बाजारात नोंदली जाईल. त्यावेळी भागधारकांना या कंपनीचे समभाग मोफत मिळतील.
   लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो आपले सर्व व्यवसाय नऊ स्वतंत्र कंपनीत विभागून साधारण वार्षकि रु. ५००० कोटी विक्री असलेले व्यवसाय एकत्र ठेवेल. यापूर्वी दोन पंचवार्षकि योजनांमधून हे धोरण राबविले गेले. आता ही पुनर्रचना शेवटच्या टप्प्यात आली आहे. तेव्हा सहा-आठ महिन्यात त्याला मूर्त रूप आलेले दिसेल. त्यावेळी भागधारकांना या कंपन्यांचे समभाग मिळतील. याविषयी अजून स्पष्ट संकेत कंपनीकडून दिले गेलेले नाहीत. कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल उत्तम लागले आहेत. ३० सप्टेंबर रोजी कंपनीकडे रु. १,५८,५२८ कोटीच्या मागण्या (कंत्राटे) नोंदविण्यात आल्या होत्या. गेल्या १२ महिन्यात या मागण्यात १२% वाढ झाली असून या तिमाहीत नोंदविण्यात आलेल्या मागण्यात ३०% वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीची विक्री रु. १३,१९५ कोटी नोंदविली. ही वाढ प्रामुख्याने प्रकल्प (ईपीसी) या विभागाची १८%  विक्री वाढल्यामुळे आहे.
   पायाभूत क्षेत्र आता मंदीतून बाहेर येत आहे. या क्षेत्राला मोठी भांडवली गुंतवणूक लागते. महागाई कमी झाली तर रिझव्‍‌र्ह बँक विकासाभिमुख धोरण राबवेल, अशी ग्वाही देण्यात आली आहे. याचा प्रत्यक्ष फायदा या कंपनीला होणार आहे. कमी झालेले व्याजदर व पुरेसे खेळते भांडवल याचा फायदा घेत या पुढील तिमाही विक्री २० ते २५% वाढेल. हा शेअर दोन ते तीन वर्ष ठेवण्यासाठी घेण्यासारखा आहे. येत्या २०-२२ महिन्यात आपला आधीचा ११  ऑक्टोबर २००७ दिवशी नोंदलेला रु. ३,४९०.९० चा उच्चांक तो मोडू शकेल. साधारण ५-७% पर्यंत गुंतवणूक या कंपनीत असायला हरकत नाही. उद्याच्या मुहूर्ताच्या सौद्यात हा शेअर घ्याच!    
लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लि.
दर्शनी मूल्य     : रु. २
मागील बंद भाव     : रु. १६२०.९५             (९ नोव्हेंबर)
वर्षांतील उच्चांक :  रु. १७२०
वर्षांतील नीचांक    :  रु. ९६९.१५

Story img Loader